1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. 3 killed in horrific accident at Mahur Ghat

शारदीय नवरात्रोत्सवात भाविकांवर काळाने घाला घातला! माहूर घाटात भीषण अपघात 3 जणांचा मृत्यू

नांदेड जिल्ह्यातील माहूरच्या केरोळी घाटात टेम्पो १०० फूट खोल दरीत कोसळून तीन भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर चालकासह तिघे जण जखमी झाले आहे. ही भीषण दुर्घटना आज,१६ ऑक्टोबर रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली.
 
मिळालेल्या माहितीनुसार यवतमाळ येथील सहा भाविक रेणुका मातेच्या दर्शनासाठी माहूरला गेले होते. दर्शन आटोपून परतताना पहाटे सुमारे ५ वाजता त्यांचा टेम्पो घाटातील धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने सुमारे १०० फूट खोल दरीत कोसळला.
 
अपघात कसा झाला?
श्री रेणुका मातेचे दर्शन घेऊन पहाटे ५ च्या सुमारास यवतमाळकडे परतत असताना, घाटातील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयामागील पहिल्या तीव्र नागमोडी वळणावर हा अपघात झाला. समोरून वेगाने आलेल्या एका वाहनाचा तीव्र प्रकाश डोळ्यांवर पडल्याने चालकाची नजर अंधारली. समोरील धडक टाळण्याच्या प्रयत्नात वळणावर संरक्षक भिंत किंवा क्रॅश बॅरियर नसल्याने टेम्पो थेट १०० फूट खोल दरीत कोसळला. यामध्ये राहुल सुधाकरराव ठाकरे, प्रीतम रामराव प्रधान, बाबाराव ज्ञानोबा टेकाम या तिघांचा मृत्यू  झाला तर चालक प्रतीक अरविंद अडकिने आणि केबिनमधील दत्ता मनोहर मेश्राम व यशवंत अरविंद पाटील यांना दुखापत झाली. त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वृत्तानुसार गाडीच्या मागील मोकळ्या हौद्यात बसलेले तिघेजण गाडी दरीत गडगडताना बाहेर तीक्ष्ण दगडांवर फेकले गेले, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने दरीतून जखमींना व मृतदेहांना बाहेर काढले. शारदीय नवरात्रोत्सवाचा सोहळा सुरू असतानाच परतीच्या प्रवासात भाविकांवर काळाने घातलेल्या या घालामुळे यवतमाळ आणि माहूर परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे.
पुढील लेख
साडेचार वर्षांच्या चिमुकलीला अखेर न्याय मिळला; मालेगाव रेप -हत्येप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा