शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 8 जून 2023 (13:55 IST)

कोल्हापूर : 'ज्या स्टेटसमुळे तणाव निर्माण झाला, ते ठेवणारे तरूण अल्पवयीन; 36 जण ताब्यात'

"सध्या कोल्हापुरातील स्थिती सामान्य आहे. सध्या इथं 2 एसआरपीएफच्या तुकड्यांसह मोठा फौजफाटा शहर आणि जिल्ह्यात तैनात करण्यात आला आहे.
 
या प्रकरणी तीन पोलीस स्टेशनमध्ये तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात 36 जणांना तब्यात घेण्यात आलं आहे. त्यातील 3 तरूण अल्पवयीन आहेत," असं कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितलं आहे.
 
कोल्हापूर पोलिसांनी आज (8 जून) पत्रकार परिषद घेऊन सर्व परिस्थितीची माहिती दिली.
 
“स्टेटस ठेवणाऱ्या ज्या पाच जणांना अटक करण्यात आलेली आहे ते कॉलेजला जाणारे तरुण आहेत. सर्वजण अल्पवयीन आहेत. एकमेकांची स्टेटस त्यांनी कॉपी केली. त्यांना ते इंटरनेटवरून मिळाल्याचं कळतंय, आम्ही सध्या त्यांच्या मोबाईलचं अनॅलिसिस आहे. त्यांना कुणी फूस लावली होती याचासुद्धा आम्ही तपास करत आहोत,” असं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितलं आहे.
 
कुणी बाहेरून येऊन शहराची शांतात बिघडवली आहे का, हे तपासण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातल्या सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे, अशी माहितीसुद्धा महेंद्र पंडित यांनी दिली आहे.
 
औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचं कथितरित्या उदात्तीकरण करणारे स्टेटस ठेवल्याच्या आरोपावरून कोल्हापुरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
 
मंगळवार (6 जून) सायंकाळपासून या प्रकरणावरून कोल्हापुरात तेढ निर्माण झालेला असून काही ठिकाणी तोडफोडीच्या घटना घडल्या.
 
काही संघटनांनी यावरून कोल्हापूर बंदचीही हाक दिली. यादरम्यान हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं.
 
त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठी चार्ज केला. तसंच, अश्रुधूराच्या नळकांड्याही काही ठिकाणी फोडण्यात आल्या.
 
या प्रकरणात पोलिसांनी स्टेटस ठेवल्याच्या आरोपांवरून 6 जणांना अटक केली आहे.
 
"कोल्हापुरात सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे, कोणीही कायदा सुव्यवस्था खराब होईल असे करू नये, कोणीही कायदा हातात घेऊ नये, कायदा हातात घेतल्यावर कारवाई होणार. कायदा हातात घेण्याचं समर्थन केलं जाणार नाही. औरंगजेबाचं उदात्तीकरण कोणीही करू नये", असं महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
 
दरम्यान, इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय कोल्हापूर प्रशासनाकडून घेण्यात आला असून त्यादृष्टीने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
 
सध्या कोल्हापूर शहरातील परिस्थिती नियंत्रणात येत आहे, अशी माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी (7 जून) दिली. सद्यस्थितीत कोल्हापुरात तणावपूर्ण शांतता आहे.
 
नेमकं काय घडलं?
मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा कोल्हापुरात साजरा करण्यात आला.
 
याच दिवशी शहरातल्या तिघा संशयितांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचं कथितरित्या उदात्तीकरण करणारे स्टेटस ठेवले.
 
या स्टेटसवर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतला. काही वेळात हे स्टेटस संपूर्ण शहरात व्हायरल झाले.
 
यानंतर, सायंकाळच्या सुमारास शहरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यासमोर हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते हे एकत्रित येऊ लागले.
 
व्हॉट्सअप स्टेटस ठेवणाऱ्या तरुणांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी संबंधित कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती.
 
दरम्यान, पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी, असं म्हणत आक्रमक झालेल्या जमावाने स्टेटस ठेवणाऱ्या तरुणांच्या निवासस्थानी धाव घेतली.
 
मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करून जमावाला पुन्हा पोलीस ठाण्याकडे आणलं. दरम्यान, काही कार्यकर्त्यांनी परिसरातील वाहनांची तोडफोड करत दगडफेकीचा प्रयत्न केला.
 
त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. तर काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
 
कोल्हापूर बंदची हाक
शिवराज्याभिषेक सोहळा पार पडत असताना अशा प्रकारचे स्टेटस ठेवण्याचा उद्देश काय, असा सवाल करत हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
 
शाहू पोलीस ठाण्यासमोर यावेळी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी काही वेळ ठिय्या आंदोलनसुद्धा केलं.
 
अखेर, हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी कोल्हापूर बंदची हाक दिली. सर्व कार्यकर्त्यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकत्र यावं, असं आवाहन त्यांच्याकडून करण्यात आलं होतं.
 
या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित हा बंद मागे घेण्याचं आवाहन केलं कार्यकर्त्यांनी त्यास प्रतिसाद दिला नाही.
 
अखेर, शहरातल्या कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी कोल्हापूर पोलिसांकडून जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे.
 
या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळपासूनच कोल्हापूर शहरांमध्ये चौकाचौकांत आणि विशेषतः स्टेटस ठेवणारे तरुण राहत असलेल्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
 
7 जूनचा घटनाक्रम
हिंदुत्ववादी संघटनांनी आज (बुधवार, 7 जून) कोल्हापूर बंदची हाक दिलेली आहे. त्यामुळे, सकाळपासून संबंधित कार्यकर्ते आक्रमक भूमिकेत दिसून आले.
 
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सकाळपासून कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली होती.
 
परिसरात आधीपासूनच प्रचंड पोलीस बंदोबस्त सकाळपासून तैनात करण्यात आला होता. सकाळी दहा वाजेपर्यंत शिवाजी महाराज चौकामध्ये हजारोंच्या संख्येने हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा जमाव जमला.
 
स्टेटस ठेवणाऱ्या तरुणांना तत्काळ अटक करावी आणि ताब्यात घेण्यात आलेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना सोडावं, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात येत होती.
 
यादरम्यान पोलीस आणि कार्यकर्त्यांच्या मध्ये धक्काबुकी होऊन तणाव निर्माण झाला.
 
यानंतर जमाव संतप्त होऊन दगडफेक सुरू झाली. पोलिसांनी लाठीचार्ज करत, तसंच अश्रूधराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र वातावरण चिघळून शहरात इतर ठिकाणीही दगडफेकीच्या घटना घडल्या.
 
पोलीस अधीक्षक धर्मेंद्र पंडीत यांनी जमावाला शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.
 
संबंधित स्टेट ठेवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सध्या कोल्हापूर विद्यापीठाच्या परीक्षा सुरू असून सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी बंद मागे घ्यावा, असं आवाहन पंडीत यांनी केलं आहे.
 
राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया
कोल्हापूर शहरातील आंदोलन चिघळल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांच्याही यावर प्रतिक्रिया येत आहेत.
 
कोल्हापूरचे भाजपाचे नेते व राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू समाजाचे दैवत आहेत. जर कोणी महाराष्ट्राच्या भूमीत औरंगजेब आणि टिपू सुलतान याचे उदात्तीकरण करत असेल तर ते खपवून घेणार नाही. शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. आपण पोलीस प्रमुखांकडून याची संपूर्ण माहिती घेत असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं.
 
याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “औरंगजेबची भलावण करणाऱ्यांना महाराष्ट्रात माफी नाहीच. पोलीससुद्धा कारवाई करत आहेत. त्याचवेळी जनतेने सुद्धा शांतता पाळावी, कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही, ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.”
 
या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहविभागाला दिलेल्या आहेत.
 
शरद पवार यांनीही या प्रकरणी प्रतिक्रिया दिली. छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असताना पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
 
यावेळी ते म्हणाले, राज्यात संगमनेर व कोल्हापूर येथे पुन्हा सामाजिक तणावाच्या घटना घडल्या. कोल्हापूर येथील आंदोलनाची बातमी टिव्हीवर पाहिली. कोणीतरी मोबाईलवर मेसेज पाठवतो. त्यावरुन लगेच रस्त्यावर उतरुन अशा घटनेला धार्मिक स्वरुप देणे योग्य नाही. सत्ताधाऱ्यांनी अशा गोष्टीला प्रोत्साहित करणे योग्य नाही. राज्यात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे. पण जर राज्य सरकारच या प्रकरणात लोकांना उचकवू लागले आणि दोन समाजात, दोन जातींमध्ये कटुता निर्माण करू लागले तर हे काही चांगले लक्षण नाही.
 
गेल्या काही दिवसांत दंगलीसदृश्य घटना घडल्या. मात्र, या घटना त्या-त्या परिसरातच मर्यादित राहिल्या. ही चांगली गोष्ट आहे. मात्र, हे जाणूनबुजून घडवले जात आहे. उदाहरणच घ्यायचे तर छ. संभाजीनगरमध्ये कोणी तरी औरंगजेबाचा फोटो दाखवला. तर, त्यावरून पुण्यात आंदोलन करायचे काय कारण आहे, असा सवाल शरद पवार यांनी विचारला आहे.