शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 5 सप्टेंबर 2022 (20:13 IST)

अमित शाहांच्या मुंबई दौऱ्याचे 4 अर्थ, म्हणाले, 'उद्धव ठाकरेंना जागा दाखवा'

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दरवर्षीप्रमाणे लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी मुंबईत दौरा केला. मात्र, महाराष्ट्रातील सत्तांतरानंतरचा अमित शाहांची ही पहिली मुंबई-भेट असल्यानं या दौऱ्याला राजकीयरित्या महत्त्व प्राप्त झालं.
 
काल (रविवार, 4 सप्टेंबर) रात्री अमित शाह मुंबईत दाखल झाले. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते.
 
या दौऱ्यादरम्यान अमित शाहांनी मुंबई भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत बोलताना अमित शाहांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला.
 
अमित शाह म्हणाले, "राजकारणात सगळं काही सहन करा, मात्र धोका सहन करू नका. जे धोका देतात त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. मुंबईतल्या राजकारणावर वर्चस्व केवळ भाजपचं असावं. आता वेळ आली आहे की उद्धव ठाकरेंना जागा दाखवली पाहिजे."
 
पदाधिकाऱ्यासंमोर बोलताना शाह पुढे म्हणाले, "भाजपने कधीच छोटा भाऊ-मोठा भाऊ म्हटले नाही. शिवसेनेनेच युती तोडली. शिवसेनेने आपल्या जागा पाडून आपल्या पाठीत खंजीर खुपसला. तुम्ही नरेंद्र मोदींच्या नावावर, देवेंद्र फडणवीसांच्या कामावर मतं मागितली आणि जिंकून आले. तुम्ही जनतेचा विश्वासघात केला."
 
मुंबईतल्या राजकारणावर वर्चस्व केवळ भाजपचं असावे, असं आवाहनही त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना केलं.
 
खरंतर अमित शाह हे गणेशोत्सवानिमित्त मुंबईतच येत असतात. मात्र, आधी नमूद केल्याप्रमाणे यावेळी त्यांच्या मुंबई दौऱ्याला राज्यातील सत्तांतराची पार्श्वभूमी आहे.
 
आपण या बातमीतून अमित शाहांच्या मुंबई दौऱ्याचे अर्थ शोधण्याचे प्रयत्न करणार आहोत.
 
1) महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर पहिला मुंबई दौरा
शिवसेनेत एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आलं. या सत्तांतरानंतर पहिल्यांदाच अमित शाह मुंबईत आले. या सत्तांतराचा आनंद अमित शाह यांच्या देहबोलीवर दौऱ्यादरम्यान दिसून येत होता.
 
'लालबागच्या राजा'च्या दर्शनानंतर त्यांनी आशिष शेलार यांच्या वांद्रे मतदारसंघातील गणेशोत्सव मंडळाची भेट घेतली. याठिकाणी अमित शाह शेलार यांच्या कुटुंबीयांना देखील भेटले.
 
एकनाथ शिंदे यांचं बंड, त्यांच्यासह 39 आमदारांनी उद्धव ठाकरेंचं समर्थन मागे घेणं, भाजपशासित राज्यात (सुरत, गुवाहटी आणि गोवा) आसरा घेणं आणि शेवटी भाजपसोबत राज्यात सत्ता स्थापन करणं हे सारं काही भाजपशी पडद्यामागे होणाऱ्या राजकीय रणनितीनुसार सुरू होतं, असं राजकीय विश्लेषक सुद्धा सांगतात.
 
महत्त्वाचं म्हणजे या राजकीय खेळीचे खरे सूत्रधार अमित शाह होते, असंही विश्लेषण केलं जातं.
 
त्यामुळे अमित शाह यांच्या या यशस्वी राजकीय खेळीनंतर त्यांचा हा पहिला मुंबईत दौरा आहे आणि म्हणूनच तो राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.
 
2) मिशन मुंबई
गणेशोत्सवनिमित्ताने या गाठीभेटी झाल्यानंतर अमित शहा थेट भाजपच्या बैठकीसाठी रवाना झाले. देवेंद्र फडणवीस यांचं सरकारी निवासस्थान 'सागर' या बंगल्यात अमित शाह नियोजित कार्यक्रमानुसार तब्बल दोन तास थांबले. इथे शाह यांच्या उपस्थितीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
 
या बैठकीत त्यांनी मुंबई महापालिका जिंकण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांसमोर व्यक्त केला. तसंच, उद्धव ठाकरेंना जमीन दाखवण्याची भाषा केली.
 
राज्यात भाजपकडून सुरू झालेली तयारी पाहता भाजप यावेळी मुंबई आणि औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीकडे विशेष लक्ष देत आहेत. कारण या दोन्ही महानगरपालिका शिवसेनेचा (उद्धव ठाकरेंसाठी) बालेकिल्ला आहेत.
 
मुंबई आणि औरंगाबाद शिवसेनेचा गड मानला जातो आणि या गडांना खिंडार पाडण्याची तयारी भाजपकडून सुरू झाल्याचं दिसते.
 
याबाबत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे म्हणतात की, "उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना एवढ्या बॅकफूटवर गेली असली तरी मुंबई महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून शिवसेना बाऊन्सबॅक करू शकते, याची जाणीव भाजपलाही आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत मुंबई महापालिका काबिज करायची, हा उद्देश दिसतो. त्यामुळे भाजप सगळी शक्ती पणाला लावतील, यात शंका नाही."
 
"आता शिवसेनेला महाराष्ट्रातून संपवायचं असेल, तर हाच तो क्षण आहे म्हणजे मुंबई महापालिकेतून शिवसेनेची सत्ता संपवायची, हे भाजपला ठाऊक आहे. जर बीएमसीमधून शिवसेनेला बाहेर काढलं नाही, तर महाविकास आघाडीचा प्रयोग पुढे जोमानं महाराष्ट्रात सुरू होईल," असंही अभय देशपांडे म्हणतात.
 
तर ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी म्हणतात की, "2017 साली अगदी काठावर जागा मिळाल्यानं भाजपची मुंबई महापालिकेतील सत्ता हुकली होती. आता जेव्हा कधी मुंबई महापालिकेची निवडणूक होईल, तेव्हा पूर्ण ताकद भाजप लावेल. यातून शिवसेना आणि बीएमसी हे गणित बदलायचा मानस भाजपचा दिसून येतो. त्याचीच सुरुवात एकनाथ शिंदेंना फोडून, उद्धव ठाकरेंचं सरकार पाडून केली गेलीय."
 
3) राज ठाकरे आणि शिंदे गटाची भूमिका
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपची युती होणार का? हा प्रश्न गेल्या दोन वर्षांत वारंवार उपस्थित करण्यात आला. मनसेने आपली राजकीय भूमिका हिंदुत्ववादाकडे नेली, आपल्या पक्षाच्या झेंड्यात त्यानुसार बदल केले आणि त्याही पुढे राज ठाकरे सातत्याने भाजपच्या नेत्यांना भेट राहीले.
 
महत्त्वाचं म्हणजे अमित शाह यांच्या दौऱ्याआधी काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी त्यांना भेट दिली. या भेटी राजकीय नव्हत्या, असं जरी दोन्ही पक्षांकडून सांगण्यात येत असलं तरी मुंबई महानगरपालिकेसाठी आणि इतर ठिकाणीही मनसे आणि भाजपमध्ये युती होणार का? किंवा मनसेची नेमकी या निवडणुकीत काय भूमिका राहील? हे अमित शाह यांच्या दौऱ्यात निश्चित होईल असंही जाणकार सांगतात.
 
शिवाय, पडद्यामागे राज ठाकरे आणि अमित शहा यांच्यात काही चर्चा होऊ शकते असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे.
 
राज ठाकरेंची थेट अमित शाहांसोबत बैठक झाली नसली, तरी मनसेबाबत अमित शाह यांच्याशी भाजपच्या राज्यातील नेत्यांची चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे या दौऱ्यात त्यासंबंधी चर्चा झाली असल्यास, मुंबई महापालिका किंवा आगामी इतर निवडणुकांमध्ये राज्यात आणखी वेगळी समीकरणं दिसून येऊ शकतात.
 
4) उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका
अमित शाह यांनी मुंबई भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत शिवसेनेचे पक्षप्रमुख यांच्यावर जोरदार निशाणा साधला. या बातमीच्या सुरुवातीला अमित शाह यांची या बैठकीतली वक्तव्यं नमूद केली आहेत. त्याप्रमाणे, अमित शाह हे उद्धव ठाकरेंना कडाडून विरोधाच्या भूमिकेत दिसून येत आहेत.
 
याबाबत बीबीसी मराठीनं राजकीय विश्लेषकांना विचारलं असता, अभय देशपांडे म्हणाले की, "पुढे जाऊन पुन्हा महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढली जाऊ शकते. त्यामुळे मुंबई महापालिकेत शक्य तितकं शिवसेनेचं खच्चीकरण करण्याचा उद्देश असू शकतं. मग राज ठाकरेंना शक्ती देणं असो किंवा एकनाथ शिंदेंना ताकद देतील. आता भाजप आणि उद्धव ठाकरेंमधील कडवटपणा येत्या निवडणुकीच्या काळात पराकोटीला गेलेला आपल्याला दिसून येईल."
 
तसंच, सुधीर सूर्यवंशी म्हणाले की, "दोन-अडीच वर्षांपासून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात जे महाराष्ट्रात सरकार होतं, ते अनेक पद्धतीने पाडण्याचा प्रयत्न झाला. पण तसं काही झालं नाही. शेवटी त्यांनी लोटस ऑपरेशनचा भाग म्हणून शिवसेनाच फोडली. यावरून हे दिसतं की, त्यांचा राग शिवसेना आणि त्यातही उद्धव ठाकरेंवर आहे."
 
"जर फक्त सरकार बनवायचं असतं, तर काँग्रेस-राष्ट्रवादीलाही फोडलं असतं. पण त्यांनी शिवसेनेलाच निशाणा बनवला. 'उद्धव ठाकरे वजा शिवसेना' असं करण्याचंच भाजपनं ठरवल्याचं दिसून आलं," असंही सुधीर सूर्यवंशी म्हणाले.
 
आता मुंबई महापालिका निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाल्यानंतर कोणती नवी समीकरणं जुळतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कारण अमित शाह या मुंबई दौऱ्यात नेमके काय निर्णय घेऊन गेलेत आणि काय रणनिती आखून गेलेत, हे स्पष्ट होईल.
 
बीबीसी मराठीचे प्रतिनिधी मयुरेश कोण्णूर यांचं विश्लेषण :
"मुंबई महापालिका जिंकण्याची भाजपाची ईर्षा कधीच लपून राहिली नाही आहे. ती नेहमीच, विशेषतः 2017 पासून, अधिक त्वेषानं मांडली गेली आहे. पण यंदाचं महत्व म्हणजे अमित शाह यांनी महापालिका निवडणुकीची सगळी सूत्रं हाती घेतली आहेत. आजच्या भेटीतून, भाषणातून हे स्पष्ट दिसतं आहे.
 
"अमित शाह यांची प्रतिमा भाजपाचे चाणक्य अशी आहे. ते एखाद्या निवडणुकीची जबाबदारी विजयानंच पूर्ण करतात असं म्हटलं जातं. त्यामुळे ते अध्यक्ष झाल्यानंतर अशा अनेक राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आली जिथं कधीही भाजपानं सत्तेचं स्वप्न पाहिलं नव्हतं.
 
"यंदा मिशन मुंबई तर शाहांनी वैयक्तिक मिशन केल्याचं चित्रं आहे. त्यासाठी महाराष्ट्रात घडून आलेल्या संत्तांतरामागे त्यांची प्लॅनिंग असल्याचं म्हटल गेलं. त्यांच्या परवानगीशिवाय मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. त्यांनी जाहीरपणे सांगितल्यावर देवेंद्र फडणवीसांना सरकारमध्ये सामील व्हावं लागलं. आणि आता, ते स्वतः मिशन मुंबई सुरू करायला मुंबईत आले.
 
"शिवाय उद्धव ठाकरेंसोबत शाहांनी वैयक्तिक शत्रुत्व घेतलं आहे असं दिसतंय. आजच्या भाषणातून ते दिसतं आहे. 'उद्धव ठाकरेंना जमीन दाखवा' इथपासून ते 'धोक्याचं राजकारण चालत नाही' इथपर्यंत त्यांनी उद्धव यांच्यावर थेट टीका केली. सेनेनं शाहांवर शब्द मोडल्याचा आरोप केला होता.
 
"पण या सगळ्याकडे देवेंद्र फडणवीस कसं पाहतात हेही महत्वाचं आहे. मागच्या मुंबई निवडणुकीत पक्षाचं नेतृत्व त्यांनी केलं होतं आणि ८२ नगरसेवक निवडून आणले. सध्या भाजपा महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते तेच आहेत. पण आता शाह सगळी सूत्रं हाती घेतांना दिसत आहेत. फडणवीसांना उपमुख्यमंत्री केल्यानंतर त्यांचे समर्थक अमित शाहांवर नाराज झाले होते."