गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 28 ऑगस्ट 2022 (11:04 IST)

मूठभर लोक म्हणजे समाज नव्हे- संभाजीराजे

sambhaji raje
"फेसबुकवर लिहिणारे आणि मीडियावर बोलणारे राजकीय नेत्यांच्या दावणीला बांधलेले काल आलेले मूठभर लोक म्हणजे समाज नव्हे. शेतशिवारात राबणारा शेतकरी, विविध क्षेत्रांत मेहनतीने काम करणारा कष्टकरी, देशाच्या उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न पाहणारा विद्यार्थी आणि या सर्वांचे पालनपोषण करणाऱ्या माझ्या माता भगिनी म्हणजे माझा मराठा समाज आहे," असं वक्तव्य माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले.
 
"पंधरा वर्षे मी त्यांच्यासोबत राहून, तळागाळात काम करून, समाजासाठी लढा देऊन, स्वतःच्या राजकीय भवितव्यापेक्षा नेहमीच समाजाच्या भल्याचा प्रथम विचार करून त्यांचा विश्वास, प्रेम आणि पाठबळ कमावले आहे, ते कुठल्या स्वयंघोषित नेत्यांमुळे कमी होणार नाही," असे मत संभाजीराजे यांनी फेसबुक पोस्टद्वारे मांडले आहे.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अन्य महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (27 ऑगस्ट) आयोजित करण्यात आलेल्या मराठा आरक्षणाविषयक बैठकीत मराठा नेत्यांमधील मतभेद समोर आले. या बैठकीत आम्हाला बोलूच दिले नसल्याचा आरोप काही मराठा नेत्यांनी केला. तर छत्रपती संभाजीराजेंचं नेतृत्वच मान्य नसल्याची भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी घेतली.
 
"माझे प्रामाणिक कार्य पाहून कित्येक संघटनांनी, लोकांनी अनेकवेळा माझ्याकडे नेतृत्व दिले, पण कधीही मी स्वतःहून हे नेतृत्व स्वीकारले नाही. नेता म्हणून मिरवले नाही. माझा राजवाडा, घरदार सोडून वैभवसंपन्न जीवनशैली सोडून मी कित्येक महिने समाजासाठी राज्यभर फिरत असतो," असे म्हणत मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत माझा लढा सुरूच राहील, अशी भूमिका संभाजीराजे यांनी घेतली आहे.