शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 एप्रिल 2021 (15:11 IST)

मि. इंडिया जगदीश लाड याचे वयाच्या 34 व्या वर्षी कोरोनामुळे निधन

तुम्हाला जर असा गैरसमज झाला असेल की मला काही होऊ शकत नाही आणि मी एकदम फिट आहे, तर थोडे थांबा, या महामारीला हलक्यात घेऊ नका, कारण तुम्ही म्हणत असाल की मी फिट आहे माझी चांगली बॉडी आहे तर तसे नाही. बॉडी बिल्डिंगमधील सर्व सर्वोच्च खिताब जिंकणारा मराठमोळा बॉडीबिल्डर जगदीश लाड याचे निधन झाले आहे. अवघ्या 34 वर्षाचा जगदीश होता. त्याने बडोद्यात अखेरचा श्वास घेतला. जगदीशच्या निधनाने बॉडीबिल्डिंग विश्वात हळहळ व्यक्त होत आहे.
 
गेल्या वर्षी बडोद्यात नवी मुंबईत राहणाऱ्या जगदीशने व्यायमशाळा सुरु केली होती. त्यानिमित्ताने तो बडोद्यात असायचा. जगदीशला गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.
 आज अखेर त्याचे निधन झाले आहे.
 
जगदीश स्पर्धेसाठी उभा राहिला की पदक निश्चित असायचे कारण त्याची पिळदार यष्टि ही सर्वांना आकर्षित करायची. जगदीश त्यासाठी अपार मेहनतही करायचा रोज सकाळी उठून दोन तास व्यायाम, प्रोटीन्ससाठी चांगला डाएट, चिकन, अंडी, मटण रोजच्या रोज जगदीशच्या आहारात असायच्या.
 
कमी वयात जगदीश लाडने बॉडीबिल्डिंगला सुरुवात केली होती. नवी मुंबई महापौर श्रीचा खिताब त्याने जिंकला होता. त्याने महाराष्ट्र श्रीमध्ये जवळपास चार वेळा सुवर्णपदकाची कमाई केली होती. त्याचबरोबर दोन वेळा मिस्टर इंडिया स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरले होते. तसेच मुंबईत झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्याने कांस्य पदक मिळवले होते.
 
महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोशिएशन आणि मुंबई असोशिएशनने त्याच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. बॉडीबिल्डिंग विश्वाचे एक नावाजलेला चेहरा गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. पण त्याचबरोबर आपण फिट असल्याचा तोरा मिरवणाऱ्या लोकांनाही सावध करुन गेला आहे.