गुरूवार, 23 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

पुरोगामी महाराष्ट्रासाठी जामनेरची घटना लांछनास्पद!

जळगांव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील वाकडी गावांत कथित सवर्ण व्यक्तीच्या विहिरीत पोहायला गेल्याने मातंग समाजाच्या किशोरवयीन मुलांना पट्ट्याने व काठीने मारहाण करून त्यांची नग्न धिंड काढली गेली.ही पुरोगामी महाराष्ट्रासाठी अतिशय लांछनास्पद घटना आहे. प्रगतीशील महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे अतिशय तीव्र शब्दांत आम्ही निषेध करत आहोत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
 
दलितांवर व शेतकऱ्यांवर अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठ्या संख्येने वाढ झाली असून कायद्याचा कोणताही वचक राहिलेला नाही. त्यामुळेच या प्रतिगामी व मनुवादी विचारसरणीला खतपाणी मिळून अशा घटना सर्रास घडू लागल्या आहेत. कुठल्याही दबावाला बळी न पडता या किशोरवयीन मुलांना मारहाण करून धिंड काढणाऱ्या व त्याचे चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या ईश्वर बळवंत जोशी व प्रल्हाद ऊर्फ सोन्या लोहार यांना तातडीने अटक करून कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी भावना आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.