शनिवार, 23 सप्टेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 मार्च 2023 (11:55 IST)

दर्शन सोलंकीची सुसाइड नोट सापडली, मृत्युपूर्वी विद्यार्थ्यांशी वाद झाल्याचा उल्लेख

12 फेब्रुवारी 2023 रोजी आयआयटी बॉम्बेचा केमिकल इंजिनीअरींगचा विद्यार्थी दर्शन सोलंकी याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. दर्शन सोलंकीने आत्महत्या केल्याचंही वृत्त आहे. तसंच दर्शन दलित विद्यार्थी असल्याने त्याचा मानसिक छळ झाल्यानेच त्याने आत्महत्या केली असा आरोप विविध संघटनांकडून करण्यात येत आहे. आता दर्शनने लिहिलेली सुसाइड नोटही पोलिसांना समोर आली आहे.
 
पोलिसांच्या विशेष पथकातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने बीबीसी मराठीला दिलेल्या माहितीनुसार, "दर्शन सोलंकीच्या वसतीगृहातील खोलीमधून एक लेटर मिळाले आहे. यातील हस्ताक्षर दर्शनचेच असल्याचं त्याच्या आईने आम्हाला सांगितलं होतं. लेटरमध्ये काही विद्यार्थ्यांची माहिती आहे. एका डिस्प्यूटचाही उल्लेख आहे. आम्ही विद्यार्थ्यांची पुन्हा चौकशी करणार आहोत."यासंदर्भात चौकशी करण्यासाठी 13 फेब्रुवारी 2023 रोजी आयआयटी बॉम्बेने अंतरिम चौकशी समिती नेमली होती. या समितीने आता आपला अहवाल संस्थेला सादर केला होता. त्यावेळी विद्यार्थ्यांसोबत कुठलाही वाद झाल्याचा उल्लेख आयआयटीने केला नव्हता.
 
या चौकशी समितीच्या अहवालानुसार, 'विविध कोर्समधील दर्शनची शैक्षणिक कामगिरी सेमिस्टरच्या सेकंड हाफनंतर खालावली. त्याच्या खालावत जाणाऱ्या शैक्षणिक कामगिरीचा त्याच्यावर गंभीररित्या परिणाम झाला असावा.' अशी शक्यता आयआयटी बॉम्बेच्या अंतरिम चौकशी अहवालात वर्तवण्यात आली आहे.
 
12 फेब्रुवारीला दर्शन आपल्या वींगमेट्ससोबत शॉपिगला जाणार होता. यासाठी तो तयारही झाला होता. त्याच्या वडिलांनी त्याच्या अकाऊंटवर पैसे ट्रांस्फर केले होते असं अहवालात म्हटलं आहे.
 
'कुटुंबासोबत झालेल्या फोन कॉल्सनंतर आणि आत्महत्येच्या घटनेपूर्वी नेमकं काय झालं की त्याने असं दुर्देवी टोकाचं पाऊल उचललं याची माहिती मिळालेली नाही,' असंही चौकशी अहवालात स्पष्ट केलं आहे.
 
आयआयटी बॉम्बेच्या अंतरिम चौकशी अहवालात नेमकं काय म्हटलं आहे, यातील काही मुद्दे पाहूयात,
 
दर्शन सोलंकीने 20 ऑक्टोबर 2022 पासून आयआयटी पवई कॅम्पसमध्ये शैक्षणिक वर्षं सुरू केलं. यानंतर चार महिन्यातच दर्शन सोलंकीचा मृत्यू झाल्याचं समोर आलं.
 
आयआयटी बॉम्बेचे संचालक सुभासीस चौधरी यांनी 13 फेब्रुवारी 2023 रोजी प्राध्यापक नंद किशोर, प्रा. सुवर्ण कुलकर्णी, प्रा. भरत अडसूळ, सीबीराज पिलाय यांच्यासह आयआयटी बॉम्बेतील प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांची 12 जणांची समिती नेमली.
 
या समितीने आपला चौकशी अहवाल नुकताच संस्थेकडे सादर केला आहे.
 
या चौकशीसाठी समितीने कॅम्पसमधील एकूण 79 जणांशी संवाद साधला आणि त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत मिळालेल्या माहितीच्या आधारे समितीने आपला चौकशी अहवाल आता सादर केला आहे.
 
या 79 जणांमध्ये 11 विंग मेट्स, 7 टिचिंग असिस्टंट, 9 टीचर्स, 2 मेंटर्स, 11 मित्र परिवार, 13 सुरक्षा कर्मचारी आणि इतर अशा एकूण 79 जणांशी संपर्क साधल्याचं अहवालात म्हटलं आहे.
 
अहवालानुसार - शैक्षणिक परिस्थिती
आयआयटी बॉम्बेच्या अंतरिम समितीच्या अहवालानुसार, 79 जणांच्या चौकशीनंतर किंवा त्यांच्याशी बातचीत केल्यानंतर समितीला आढळलं की, विविध कोर्समध्ये दर्शनाला कमी गुण मिळाले होते. तसंच PH117 या परीक्षेसाठी दर्शन सोलंकी एंड सेमिस्टरमध्ये गैरहजर राहिला असं या अहवालात स्पष्ट केलं आहे.
 
HS 109 वगळता इतर सर्व विषयात दर्शनाला खूप कमी गुण होते. त्याला विविध विषयांमध्ये मिळालेल्या गुणांमधून असं दिसून येतं की, दुस-या सेमिस्टरच्या दुस-या भागानंतर त्याची शैक्षणिक कामगिरी खालावत गेली.
 
अहवालानुसार, दर्शनाच्या मित्र परिवाराने समितीला सांगितलं की, त्याने शिक्षणात अधिक रस घेतला नाही, शैक्षणिक वेळेतही तो हॉस्टेलमध्ये थांबणं पसंत करत होता. तो सातत्याने क्लासमध्ये गैरहजर राहत होता, अधिक झोपत होता आणि त्याला काही महिने रिलॅक्स रहायचं होतं.
 
परीक्षेसाठी आपण पुरेसे तयार नाही असंही तो सांगायचा असं त्याच्या मित्रपरिवारीने समितीला सांगितल्याचं अहवालात म्हटलं आहे.
 
दर्शनला आम्ही अभ्यास करण्यासाठी आणि परीक्षेसाठी प्रोत्साहित करायचो, असं त्याच्या काही मित्रांनी आणि रुममेटने सांगितलं आहे. तसंच त्याला लेक्चर्स समजून घेणं कठीण जात होतं. तसंच शैक्षणिकदृष्ट्या इतर कामगिरीबाबत आणि इतर अनुभवांबाबतही उल्लेख या अहवालात आहे.
 
अहवालानुसार- कॅम्पसमधील सर्वांसोबत असलेलं संबंध
अहवालानुसार, समितीला अनेकांनी सांगितलं की दर्शन एकटं राहणं पसंत करायचा. यामुळे तो इंट्रोवर्ट आहे असंही अनेकांना वाटलं.
 
आपल्या विंगमधील लोकांसोबत सुरुवातीला त्याला संकोच वाटत होता परंतु नंतर तो त्यांच्यासोबत बोलत होता. त्याचे सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध होते कारण तो त्यांच्यासोबत बाहेर जात होता असं समितीला वाटतं.
 
दर्शन सोलंकीचा मृत्यू 12 फेब्रुवारी 2023 रोजी झाला.
 
11 फेब्रुवारी 2023 रोजी त्याच्या सेमिस्टर परीक्षेचा शेवटचा दिवस होता. या दिवशी तो आपल्या मित्रांसोबत चेस आणि क्रिकेट खेळला असंही अहवालात म्हटलं आहे.
 
तसंच 12 फेब्रुवारीला शॉपिंगला जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ग्रुपमध्ये आणि 13 तारखेला इमॅजिकामध्ये जाण्यासाठी तयार केलेल्या ग्रुपमध्येही दर्शन होता. परंतु 14 फेब्रुवारीचं त्याचं आणि त्याच्या वडिलांचं घरी परतण्याचं तिकिट आधीच काढल्याची कल्पना त्याला होती याचाही उल्लेख अहवालात आहे.
 
दर्शन सोलंकीला त्याच्या हॉस्टेलमध्ये भेटण्यासाठी केवळ त्याचे काही कुटुंबातील सदस्य यायचे अशीही नोंद आहे. इतर कोणीही त्याला भेटण्यासाठी आलेलं नाही असंही अहवालात स्पष्ट केलं आहे.
 
अशा प्रकारच्या अनेक नोंदी अहवालात नमूद करण्यात आल्या आहेत.
 
'जातीभेदा'बाबत अहवालात काय म्हटलंय?
 
समितीने दर्शनचे मित्र, विंगमेट्स, शिक्षक, मेंटोर, हॉस्टेलचे कर्मचारी, SC/ST प्रवर्गातील वरिष्ठ, कुटुंबातील काही सदस्य आणि इतर संबंधित सर्वांशी चर्चा किंवा मुलाखत घेतली.
 
वरील सर्वांना समितीने एक विशिष्ट प्रश्न केला. दर्शनने कधीही, कुठेही, केव्हाही जाती विषयक भेदभावासंदर्भात सांगितलं होतं का, किंवा तुम्हाला कधी याबद्दल काही जाणवलं का, किंवा शंका आली का?
 
समितीने म्हटलंय की, यापैकी कोणीही कुठल्याही प्रकारचे डिस्क्रिमिनेशन दर्शनबाबत झाल्याचं आम्हाला सांगितलेलं नाही. दर्शन किंवा त्याच्या मित्रांपैकी कोणीही कधीही यासंदर्भातील कोणताही उल्लेख केलेला नाही असं समितीने म्हटलं आहे.
 
यापैकी दर्शनचे तीन मित्र जे SC/ST प्रवर्गातील आहेत त्यांनीही समितीला असा अनुभव कधीही कॅम्पसमध्ये आलेला नाही असं स्पष्ट केलं असं समितीचं म्हणणं आहे.
 
दरम्यान, यापैकी त्याच्या एका मित्राने समितीला सांगितलं की, 'दर्शन आपल्या कास्ट आयडेंटिटीबाबत संवेदनशील होता.'
 
केवळ दर्शनाच्या बहिणीने समितीला सांगितलं की, दर्शन सोलंकीने कळवलं होतं की कॅम्पसमध्ये काही मुलांना जाती आधारित भेदभावासंदर्भातील विषयांना सामोरं जावं लागतं. आणि त्यालाही असा अनुभव आलेला आहे. परंतु तो म्हणायचा की तो अॅडजस्ट आणि मॅनेज करेल. समितीने बहिणीला विशिष्ठ एखाद्या घटनेबद्दल विचारलं परंतु तशी विशिष्ठ घटना त्यांनी सांगितली नाही असं अहवालात म्हटलं आहे.
 
समितीने सांगितलं की, दर्शनाच्या वडिलांनी आणि काकांनीही जातीविषयक भेदभाव होत असल्याविषयी दर्शनने काहीही सांगितलं नाही असं समितीला सांगितलं.
 
कॅम्पसमधील आंबेडकर पेरियार फुले स्टडी सर्कल ( Appsc) या समुहातील विद्यार्थ्यांनी समितीसमोर विद्यार्थ्यांना जाती विषयक भेदभावाला सामोरं जावं लागतं यासंदर्भात विविध मुद्दे मांडले. परंतु यापैकी कोणीही दर्शनला प्रत्यक्षात भेटलेलं नाही किंवा त्यांना दर्शन अशा कोणत्याही संबंधित विषयाला सामोरं जात होता याची थेट माहिती नाही असं समितीचं म्हणणं आहे.
 
SC- ST प्रवर्गातील एका वरिष्ठ विद्यार्थ्याची ऑडियो क्लिप समितीला या समुहाकडून देण्यात आली. तसंच दर्शनने कधीही SC/ST सेल यांना संपर्क साधलेला नव्हता असंही अहवालात म्हटलं आहे. विद्यार्थी कल्याण समितीलाही त्याने संपर्क साधला नसल्याचं समितीचं म्हणणं आहे.
 
वरील माहितीच्याआधारे, 'दर्शन सोलंकीच्या बहिणीचं म्हणणं वगळता त्याला आयआयटी बॉम्बेमध्ये असताना जातीविषयक भेदभाव झाल्याचं थेट कुठेही सिद्ध होत नाही,' असा दावा समितीने आपल्या अहवालात केला आहे.
 
अहवालानुसार - 12 फेब्रुवारी 2023 - घटनेच्या दिवशी
समितीने म्हटलंय की, दर्शन 12 फेब्रुवारीला वींगमेट्ससोबत शॉपिंगला जाणार होता. वींगमेट्सने त्याच्या खोलीत त्याला पाहिलं त्यावेळी तो बेडवर होता आणि त्याचा लॅपटॉप सुरू होता. दिवसभर काय करायचं याची चर्चा कॉरिडॉरमध्ये सुरू होती. यात दर्शन सुद्धा होता. दुपारचं जेवण हॉस्टेलमध्ये करून सगळे बाहेर जाणार होते असं ठरलं होतं.
 
समितीने म्हटल्यानुसार, यानंतर त्याच्या कुटुंबियांसोबत त्याचे फोन कॉल्स झाले. या फोन कॉलवरील संवादाची माहिती समितीने पोलिसांकडे मागितली आहे.
 
अहवालातील समितीचा निष्कर्ष
अहवालानुसार, समितीला मिळालेल्या वरील सर्व माहितीनुसार, विविध कोर्समधील दर्शनची शैक्षणिक कामगिरी सेमिस्टरच्या सेकंड हाफनंतर खालावली.
 
'त्याच्या खालावत जाण-या शैक्षणिक कामगिरीचा त्याच्यावर गंभीररित्या परिणाम झाला असावा.' अशी शक्यता आयआयटी बाॅम्बेच्या अंतरिम चौकशी अहवालात वर्तवण्यात आली आहे.
 
12 फेब्रुवारीला दर्शन आपल्या वींगमेट्ससोबत शाॅपींगला जाणार होता. यासाठी त्याने तयारीही केली होती. त्याच्या वडिलांनी त्याच्या अकाऊंटवर पैसे ट्रांस्फर केले होते. 'कुटुंबासोबत झालेल्या फोन काॅल्सनंतर आणि आत्महत्येच्या घटनेपूर्वी नेमकं काय झालं याची माहिती समितीला मिळालेली नाही.' असंही चौकशी अहवालात स्पष्ट केलं आहे.
टेलिफोनीक संवाद, फाॅरेन्सिक रिपोर्ट, पोस्टमार्टेम रिपोर्ट या सगळ्याची माहिती हाती नसताना समिती कोणत्याही अंतिम निष्कर्षापर्यंत पोहचू शकत नाही की नेमक्या कोणत्या कारणाने दर्शनने दुर्देवी टोकाचं पाऊल उचललं असंही समितीने अहवालात स्पष्ट केले आहे. तसंच समितीला मिळालेल्या माहितीच्या आधारे दर्शनचा मृत्यू आत्महत्या केल्याने झाला असावा असं समितीला वाटतं.
 
तसंच या समितीने अशा प्रकारच्या इतरही ब-याच बाबी आपल्या अहवालातून स्पष्ट केल्या आहेत.
 
'चौकशी समिती पारदर्शक नाही'
दरम्यान, ही चौकशी समिती पारदर्शक आणि स्वायत्त नसल्याचं आंबेडकर पेरियार फुले स्टडी सर्कल (Appsc) या संघटनेचं म्हणणं आहे. समिती स्थापन करण्यात आल्यानंतर संघटनेने ही प्रतिक्रिया दिली होती.
 
या समितीत संस्थेच्या बाहेरील एकही सदस्य नाही जो संस्थेच्या चुकीवर नि:पक्षपातीपणे बोट ठेऊ शकेल असंही या संघटनेचं म्हणणं आहे.
 
दरम्यान, दर्शन सोलंकीने आत्महत्या केली असून त्याला जातीविषयक भेदभावाला सामोरं जावं लागल्याची शक्यता विविध संघटनांकडून वर्तवली जात आहे. यापैकी आयआयटी बॉम्बेतील आंबेडकर पेरियार फुले स्टडी सर्कल यांनाही याप्रकरणी चौकशीची मागणी केली होती. तसंच शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षणाच्या आधारावर दलित विद्यीर्थ्यांना वेगळी वागणूक मिळते असाही या समुहातील विद्यार्थ्यांचा दावा आहे.
 
4 मार्च 2023 रोजी मुंबईतील आझाद मैदानावर या प्रकरणी आंदोलन सुद्धा करण्यात आलं. तसंच दर्शनाच्या कुटुंबियांनी न्याय व्हावा अशी मागणी केली आहे.
 
Published By- Priya Dixit