रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 29 ऑगस्ट 2024 (09:06 IST)

शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मागितली माफी, राणे-ठाकरे समोरासमोर

ajit pawar
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे.
 
बुधवारी (28 ऑगस्ट) या किल्ल्यावर भाजपचे नेते नारायण राणे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे कार्यकर्ते आपसांत भिडले.
 
दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याने या किल्ल्यावर तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.
 
सत्ताधारी महायुती आणि विरोधक महाविकास आघाडी या दोन्हींमध्ये धुमश्चक्री पाहायला मिळाली. यावेळी कार्यकर्त्यांकडून प्रचंड घोषणाबाजी झाली.
 
या घटनेच्या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीने येत्या रविवारी मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सरकारला 'जोडे मारा' आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागितली माफी
2023च्या नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं.
 
बुधवारी (28 ऑगस्ट) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुतळा पडल्याबद्दल माफी मागितली.
 
लातूर जिल्ह्यातील जाहीर सभेत ते म्हणाले की, "मी महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेची माफी मागतो. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत असून वर्षभरात त्यांचा असा पुतळा कोसळणे हा आपल्या सर्वांसाठी धक्कादायक आहे."
 
मात्र, अवघ्या आठ महिन्यांत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर कामाचा दर्जा आणि पुतळ्याच्या अनावरणातील घाई यावरून राज्य सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे.
 
छ. शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला
हा पुतळा नौदलाने उभारला होता आणि वाऱ्याने कोसळला असल्याचे स्पष्टीकरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले होते. लवकरात लवकर नवीन पुतळा उभारण्यात येईल असे देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.
 
मात्र, निव्वळ आठ महिन्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा कोसळल्यामुळे त्याच्या कामाच्या दर्जावरून आणि या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी केलेल्या घाईवरून विरोधकांनी सरकारवर धारेवर धरलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज या किल्ल्याला भेट दिली आणि तिथे ठिय्या आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.
 
आदित्य ठाकरे यांच्यासोबत अंबादास दानवे आणि वैभव नाईक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे नेते जयंत पाटीलदेखील होते.
 
या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून नारायण राणे समर्थकांनीही घोषणाबाजी करुन विरोध करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याबरोबर निलेश राणेदेखील होते. पोलिसांकडून दोन्ही गटांशी बातचित करुन हा गोंधळ थांबवण्याचा प्रयत्न केला गेला असला तरी तो अयशस्वी ठरताना दिसला.
 
यावेळी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील हे गोंधळ टाळून सामोपचाराने मार्ग काढण्यासाठी निलेश राणे यांच्यासमवेत चर्चा करतानाही दिसले.
 
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, "फक्त आठ महिन्यांपूर्वी बांधलेला राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला. हा पुतळा पडला नसून महाराष्ट्राचा स्वाभिमान पडला आहे."
 
जयंत पाटील म्हणाले, "मुख्यमंत्री म्हणतात प्रचंड वेगाने वारे वाहत होते. त्यामुळे पुतळा पडला. तसं असतं तर दोन-तीन झाडे पडली असती; पण तसं न होता फक्त पुतळा पडला, याचा अर्थ पुतळ्याचे काम सदोष होतं. अपरिपक्व माणसाला पुतळ्याचं काम देण्यात आलं. दीड-दोन फुटांचे पुतळे तयार करणाऱ्या व्यक्तीला 35 फुटाच्या पुतळ्याचे काम दिले."
 
"सरकार म्हणतंय पुतळा नेव्हीने बांधला आहे. सरकारला हात झटकून चालणार नाही, यात सरकार जबाबदारी ही सरकारची आहे. नेव्हीच्या लोकांनी फक्त पुतळा तिथे बसवला. हा शिल्पकार कोणी शोधला? कोणी नेव्हीला त्याची माहिती दिली? तो कल्याणचाच कसा? या पुतळ्याचे टेंडर काढले गेले नाही मग त्यालाच कसे कंत्राट मिळाले? या सर्व गोष्टींची चौकशी व्हायला पाहिजे," अशी मागणी जयंत पाटील यांनी यावेळी केली.
 
महाविकास आघाडीची पत्रकार परिषद
दरम्यान, या सगळ्या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे प्रमुख शरद पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रसच्या नाना पटोले यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे.
 
या पत्रकार परिषदेमधून येत्या रविवारी सरकारला 'जोडे मारा' आंदोलन करणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. हे आंदोलन मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ होणार आहे.
 
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, "महाराष्ट्रामध्ये महिलांवरील अत्याचार आणि भ्रष्टाचार वाढतोय. महाफुटी (महायुती) सरकारच्या भ्रष्टाचाराने कळस गाठलेला आहे आणि कारभाराने किळस आणलेला आहे. या किळसवाण्या कारभाराचा निषेध करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली होती. मात्र, कोर्टाच्या माध्यमातून त्यावरही बंदी आणली गेली."
 
"आता महाविकास आघाडीतर्फे राजकोट घटनेचा निषेध करण्यासाठी जो निषेध करण्यात आला त्यामध्ये मोदी सरकारचे दलाल आणि शिवद्रोही हे रस्ता अडवून बसलेत. महाराजांचा पुतळा वाऱ्याने पडला, हे कारण अत्यंत निर्लज्जपणाचे आहे," असे उद्धव ठाकरे म्हणाले.
 
पुढे ते म्हणाले की, "येत्या रविवारी (1 सप्टेंबर) दुपारी अकराच्या सुमारास हुतात्मा स्मारकाला वंदन करुन आम्ही सगळे जण गेट वे ऑफ इंडियासमोर निदर्शने करणार आहोत. या निर्ढावलेल्या सरकारचा निषेध करण्यासाठी सरकारला 'जोडे मारो' हा कार्यक्रम करणार आहोत."
 
विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यासंदर्भात बोलताना शरद पवार म्हणाले की, "यामध्ये राजकारण काय आहे? शिवाजी महाराजांच्या काळात राझ्यांच्या पाटलाने मुलीवर अत्याचार केल्यावर शिवरायांनी त्याचे हात-पाय कलम केले होते. अशी कठोर भूमिका त्यांनी जनतेसमोर ठेवली होती. आज असा निर्णय घेणाऱ्या व्यक्तीची प्रतिकृती तयार करण्यामध्ये भ्रष्टचार झाला आहे."
 
ते पुढे म्हणाले की, "जिथे पंतप्रधान स्वत: जाऊन आले, तो पुतळा कोसळला आहे. याचा अर्थ भ्रष्टाचार किती टोकाला पोहोचला आहे, हे यातून दिसतं. कुठे भ्रष्टाचारी भूमिका घेऊ नये, याचं तारतम्यही या सरकारमध्ये नाही. शेवटी लोकांमध्ये जी तीव्र भावना आहे ती व्यक्त व्हावी, म्हणूनच आम्ही तिघांनी महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करुन हे आंदोलन करण्याचे ठरवले आहे."
 
यावेळी काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले की, "स्वत: नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री त्या पुतळ्याच्या उद्घाटनाला उपस्थित होते. मात्र, पुतळा उभारण्यासाठीची सगळी प्रक्रिया पार पाडण्यात आलेली नाही. सांस्कृतिक मंत्रालयाने या पुतळ्याला प्रमाणित केल्याशिवाय पंतप्रधानांनीही या पुतळ्याच्या उद्घाटनाला जायला नको होतं. मात्र, निवडणुकीच्या दृष्टीने आम्ही कसे शिवप्रेमी आहोत, हे दाखवण्यासाठी हे सगळं करण्यात आलं."
 
निवडणुका समोर असल्यानं राजकारण - राणे
यानंतर भाजपचे खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे.
 
ते म्हणाले की, "पुतळा कोसळण्याची घटना दुर्दैवी होती. ऐन पावसाळ्यात हवामान प्रतिकूल असल्याने हा पुतळा कोसळला आहे. मी यामध्ये कोणावरही आरोप करण्याऐवजी हा पुतळा ज्यांनी बांधला, त्यांची चौकशी व्हावी आणि नेमका कशामुळे हा पुतळा कोसळला ते कारण बाहेर यावे, अशी माझी आणि जनतेची इच्छा आहे.
 
"निवडणुका समोर असल्याने विरोधक याचे भांडवल करत आहेत. या जिल्ह्यामध्ये भाजपवर टीका करता येईल, असे कोणतेही कारण सापडत नसल्याने या घटनेचे निमित्त करुन सगळे जण शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गट आणि काँग्रेस हे सगळे एकत्र येऊन टीका करत आहेत," राणे म्हणाले.
 
पुढे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नारायण राणे म्हणाले की, "त्यांनी शिवद्रोही अशी टीका आमच्यावर केली आहे. मात्र, शिवसेनेच्या जन्मापासून छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्व या दोन विषयांना त्यांनी उदरनिर्वाहाचं साधन बनवलं. त्यांनी याच जोरावर पैसा कमावला. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक तरी पुतळा उभा केला का? स्वत:च्या वडिलांचा पुतळाही महाराष्ट्र सरकारच्या खर्चाने उभा केला. म्हणून त्यांना या विषयावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही."

Published By- Dhanashri Naik