शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 6 डिसेंबर 2022 (21:57 IST)

एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर, मला आक्रमक, धाडस शिकवू नका

eknath uddhav
राज्यातील दोन मंत्र्यांच्या बेळगाव दौऱ्यासंदर्भात कर्नाटक सरकारने सामंजस्याची भूमिका घ्यायला हवी होती. मात्र, या दौऱ्यामुळे कायदा – सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी मंत्र्यांचा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. हे मंत्री आता सीमाभागांतील मराठी बांधवांची भेट घेणार असून राज्य सरकार मराठी भाषकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत असताना दिली. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या टीकेलाही त्यांनी यावेळी उत्तर दिलं.
 
चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांचा नियोजित बेळगावचा दौरा लांबणीवर टाकण्याची नामुष्की शिंदे – फडणवीस सरकारवर आली आहे. त्यामुळे आम्हाला बेळगावात जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही, अशी सारवासारव त्यांच्याकडून करण्यात येत आहे. या प्रकरणावरुन उद्धव ठाकरे यांनी टीका केली असून हे नेभळट सरकार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मुंबईत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे बोलत होते. त्यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवारही उपस्थित होते. सीमा प्रश्नावर विरोधक काय करणार? या प्रश्नावर आम्ही सरकारही चालवू आणि कर्नाटकलाही जाऊ, असा टोला ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला आहे.
 
यावर दिल्ली दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आक्रमकपणा कसा दाखवायचा हे त्यांनी आम्हाला शिकवू नये. मी बेळगावच्या प्रश्नावर ४० दिवस तुरुंगवास भोगला होता. ते मुख्यमंत्री (उद्धव ठाकरे) असताना बेळगावच्या जनतेला मिळणारे योजनांचे अनुदान बंद करण्यात आले होते. विद्यमान सरकारने संबंधित योजना पुन्हा सुरू केल्या आहेत. सीमेवरील गावांसाठीही म्हैसाळ पाटबंधारे योजनेचे विस्तारीकरण केले जात आहे, त्यासाठी राज्य सरकार २ हजार कोटी देत आहे, असं शिंदे म्हणाले. याबरोबरच, बेळगाव प्रश्नावर राज्य सरकार नेमस्त भूमिका घेत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाने केला आहे. शिंदेंनी यावर उत्तर देताना ‘बेळगांवमध्येच नव्हे तर, देशाच्या कुठल्याही भागांमध्ये जायला कोणीही कोणाला रोखू शकत नाही’, असं स्पष्ट करत अप्रत्यक्षपणे बोम्मई यांना चपराक दिली.
 
हेच त्यांचे देशप्रेम का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जी-२०’ परिषदेच्या निमित्ताने सोमवारी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. या बैठकीत शिंदे सहभागी झाले होते. या बैठकीला सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रण देण्यात आले होते. उद्धव ठाकरेंनाही निमंत्रण दिले होते. मात्र तरीही ते अनुपस्थित राहिले. विकास प्रकल्प, उद्योग या मुद्दय़ांवरून आरोप-प्रत्यरोप करणारे उद्धव ठाकरे यांनी गैरहजर राहून काय सिद्ध केले, हेच त्यांचे देशप्रेम आहे का, अशा शब्दात शिंदेंनी ठाकरेंवर टिका केली. त्यांचे राज्यावरील बेगडी प्रेम त्यांच्या कृतीतून दिसले, असेही शिंदे म्हणाले.

Edited By- Ratnadeep Ranshoor