एसटी संपामुळे विद्यार्थीनीचा हकनाक बळी; धावत्या रिक्षेतून तोल गेल्याने अपघाती मृत्यू
जळगाव : राज्यात एसटी बंद (ST Strike) असल्याचा फटका थोरा-मोठ्यांसह सर्वांनाच बसतोय.मात्र आता हाच संप जीवावर बेतल्याचीही घटना समोर आली आहे. जळगावात एसटी अभावी रिक्षातून प्रवास करणाऱ्या विद्यार्थीनीचा धावत्या रिक्षेतून तोल गेल्याने अपघाती (Accident) मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. तृप्ती भगवान चौधरी असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे. तिच्या कुटुंबियांसह गावात शोककळा पसरली आहे.
तृप्ती चौधरी ही विद्यार्थिनी बोदवड येथील न.ह.रांका कॉलेजमध्ये अकरावी विज्ञान शाखेला शिकत होती. ती एसटीने प्रवास करायची मात्र गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचार्यांचा संप सुरु असल्याने एसटी बंद आहे. त्यामुळे तृप्ती रिक्षानेच महाविद्यालयात ये जा करत होती. कॉलेज सुटल्यानंतर मैत्रिणींसोबत शेलवड येथे घरी ऑटोरिक्षाने निघाली. यावेळी ती प्रवासी वाहतूक करणार्या खाजगी रिक्षाच्या पुढील सीटवर बाहेरील बाजूने बसली होती. यावेळी प्रवासात अचानक हात निसटून तोल गेल्याने तृप्ती व तिची मैत्रिण रोहिणी राजेंद्र धनगर या दोन्ही धावत्या रिक्षातून खाली पडल्या. तृप्ती बाहेरच्या साईडने असल्याने तिच्या डोक्याला व मेंदूला गंभीर मार लागला. यानंतर तिला तातडीने बोदवड येथील डॉ.यशपाल बडगुजर यांच्या खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. पण, प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी जळगावला हलविण्याचा सल्ला दिला. जळगावला नेत असताना वाटेत तृप्तीची प्राणज्योत मालवली. जळगाव जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर तृप्तीवर दुपारी 4 वाजता शेलवड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.