बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 9 नोव्हेंबर 2021 (16:39 IST)

टाळेबंदीनंतर राज्यात प्रथमच पंढरपूरची कार्तिकी यात्रा भरणार करोनाचे नियम पाळून पंढरीच्या कार्तिकी यात्रेला परवानगी

पंढरपूर: करोना संसर्गाच्या टाळेबंदीनंतर राज्यात प्रथमच पंढरपूरची कार्तिकी यात्रा भरणार आहे. करोनाचे सर्व नियमांचे पालन करून याबाबत सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी परवानगी दिली आहे. कार्तिकी यात्रा भरावी याबाबत पूर्वीच पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने सकारात्मकता दाखवली होती. त्यानंतर आता सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कार्तिकी यात्रा होणार असल्याचे स्वतंत्र आदेश पारित केले. त्यामुळे दीड वर्षांनंतर पंढरीत टाळ-मृदंग आणि हरिनामाच्या जयघोषाने नगरी पुन्हा एकदा दुमदुमून निघणार आहे. दरम्यान, कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने निमंत्रण दिले आहे.
 
कार्तिकी यात्रेसाठी येणाऱ्या सर्व दिंडय़ांच्या वास्तव्याची व्यवस्था चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील ६५ एकर परिसरात करण्यात येणार आहे. चंद्रभागेच्या वाळवंटात भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सपत्नीक होणार आहे. या प्रसंगी मानाचे वारकरीदेखील उपस्थित राहतील. श्री विठ्ठल, रखुमाई यांच्या पदस्पर्श दर्शन रांगेसाठी व्यवस्था केली आहे. कार्तिकी यात्रेसाठी पंढरीत येणाऱ्या भाविकांनी आरोग्यविषयक काळजी घ्यावी. मुखपट्टी, सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी केले आहे.