1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 14 मार्च 2023 (21:43 IST)

लॉन्ग मार्च इगतपुरी तालुक्यात दाखल, मात्र अजूनही चर्चा नाहीच

शेतकरी आणि आदिवासींच्या वन जमिनी प्रश्नांसाठी निघालेला लॉन्ग मार्च मोर्चा मंगळवारी मुंबईच्या दिशेने निघाला आहे. हा लाँग मार्च मुंबईपर्यंत धडकू नये यासाठी पालकमंत्री दादा भुसे यांच्या पुढाकारातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र ही बैठक काही कारणास्तव रद्द झाली. हा लाँग मार्च आता मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे. दरम्यान हे लाल वादळ मंगलवारी दुपारी इगतपुरी तालुक्यात दाखल होत घोटी शहरापर्यंत पोहचले.
 
रविवारपासून नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून आदिवासींचे हे लाल वादळ विधिमंडळावर मोर्चा घेऊन निघाले आहे. सोमवारी नाशिक जवळील आंबे बहुला गावात रात्रीचा मुक्काम केल्यानंतर मंगळवारी सकाळी मोर्चेकरी मुंबईकडे निघाले. मोर्चात सुमारे दहा हजार आदिवासी बांधव सहभागी झाले आहेत. येत्या 23 मार्चपर्यंत मुंबई गाठण्याचे नियोजन आहे.
 
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार पाच जणांचे शिष्टमंडळ  मुंबईकडे रवाना झाले असून मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करणार आहे. एकीकडे चर्चा सुरू असली तरी मोर्चा मात्र मुंबईच्या दिशेने चालतच राहणार असल्याचे मोर्चेकऱ्यानी सांगितले आहे.
 
Edited By -Ratnadeep Ranshoor