शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

युवकांनी स्वामी विवेकानंद विचारांपासून प्रेरणा घ्यावी –डॉ. भोंडे

स्वामी विवेकानंदांनी भारतीय संस्कृती व तत्वज्ञानाची ध्वजा सातासमुद्रापलीकडे फडकावली. कामावरील निष्ठा, एकाग्रता आणि चारित्र्य हे विवेकानंदाचे गुण आजच्या युवकांनी अंगीकारण्याची गरज आहे. आजच्या भारताला सक्षम करण्यासाठी युवकांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारापासून प्रेरणा घ्यायला हवी, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी केले.
 
राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज मुक्त विद्यापीठात अभिवादन करण्यात आले तसेच स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस हा युवदिन म्हणूनही साजरा करण्यात आला. यावेळी कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे व वित्त अधिकारी मगन पाटील यांनी राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
 
यावेळी बोलताना डॉ. दिनेश भोंडे पुढे म्हणाले, स्वामीजींच्या जीवनात आणि विचारात युवकांना खूपच महत्त्वाचे स्थान आहे. राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले. हिंदवी स्वराज्याची स्थापना करून शिवरायांनी नवे युग निर्माण केले. समाजासाठी जिजाऊंचे कार्य अनमोल आहे. चातुर्यसंपन्न जिजाऊंनी शिवरायांना घडविले. एक आदर्श माता म्हणून त्यांनी आपला आदर्श समाजापुढे ठेवला असल्याचेही डॉ. भोंडे यांनी सांगितले. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.