शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 1 नोव्हेंबर 2023 (12:25 IST)

मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 8 वा दिवस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज (1 नोव्हेंबर) आठवा दिवस आहे.
 
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी बोलावण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीला सुरुवात झाली आहे. त्यात महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
या सर्वपक्षीय बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार, दिलीप वळसे - पाटील, बाळासाहेब थोरात, सुनिल तटकरे, विजय वडेट्टीवार , जयंत पाटील, चंद्रकांत पाटील, छगन भुजबळ, सुनील प्रभू, अंबादास दानवे, कपिल पाटील हे नेते उपस्थित आहेत.
 
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील या सर्व महत्त्वाच्या पक्षांची नेमकी मतं काय आहेत, ते जाणून घेण्याचा प्रयत्न या बैठकीतून केला जाणार आहे.
 
उपमुख्यमंत्र्यांचा दगाफटका करण्याचा डाव - मनोज जरांगे
मनोज जरांगे पाटील यांनी सकाळी पुन्हा एकदा त्यांची भूमिका मांडली. यावेळी ते मराठा समाजाला आरक्षण देइपर्यंत ठाम राहणार असल्याची भूमिका मांडली. तसंच, पुन्हा एकदा उपमुख्यमंत्र्यांवर दगाफटका करण्याचा त्यांचा डाव असू शकतो, असा आरोपही केला.
 
मनोज जरांगे म्हणाले की, "सरकारला मुद्दाम आरक्षण द्यायचं नाही, त्यामुळं आंदोलन दडपण्याची सरकारची इच्छा दिसून येत आहे. त्यामुळं इंटरनेट बंद करण्याचे प्रकार सुरू आहेत. पण आता हे आंदोलन बंद होऊ शकत नाही. पण पूर्ण आरक्षण घेतल्याशिवाय मराठा समाज हटणार नाही.
 
"हजारो लोक रात्री महाराष्ट्रातून इथं येऊन बसले. त्यांनी इथं खडा पाहारा दिला. त्यामुळं आंदोलन बंद होऊ शकत नाही, सरकारनं कितीही प्रयत्न केले तरी तसं होणार नाही. आम्ही अर्धवट आरक्षण घेणारच नाही."
 
"मला इथून कोणीही उठवू शकत नाही. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा डाव तसाच दिसत आहे. आंदोलन खूप मोठं झाल्यानं त्यांना तसं करायचं आहे. पण आम्ही उठणार नाही आमच्याकडून उद्रेकही होणार नाही. आंदोलन शांततेतच सुरू राहणार आहे," असं जरांगेंनी सांगितलं.
 
"उपमुख्यमंत्री मुद्दाम इंटरनेट बंद करतात. शांततेनं आंदोलन करणाऱ्यांना मारहाण करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करत आहेत. नेट बंद केल्यामुळं लोकांमध्ये काही दगाफटका करण्याचा डाव आहे का असा संशय निर्माण होतो," असं जरांगे म्हणाले.
 
याचप्रकरणी गंभीर आरोप करत जरांगे म्हणाले की, "उपमुख्यमंत्र्यांचा दगा फटका करण्याचा डाव असू शकतो. तसा समाजामध्ये समज आहे, पण आम्ही त्यांना घाबरत नाही."
 
एक फूल, दोन हाफ सगळेच काडीखोर - राऊत
संजय राऊत यांनी सर्वपक्षीय बैठकिला शिवसेनेला आमंत्रित केलं नसल्यावरून पुन्हा एकदा सरकारवर टीका केली.
 
व्यक्तीगत द्वेष, सूड आणि पोटदुखीतून शिवसेनेला या बैठकिला बोलावलं नाही. तरी आम्हाला हरकत नाही. आम्हाला मानपानाची गरज नाही. आम्हाला न बोलावता प्रश्न सुटत असेल तरी चालेल, असं संजय राऊत म्हणाले.
 
"प्रश्न सोडवा, मनोज जरांगे पाटलांचे प्राण वाचवा आणि महाराष्ट्र जळतोय तो विझवा. असं राजकारण करू नका. महाराष्ट्रात एवढ्या संकुचित वृत्तीचं राजकारण झालं नव्हतं.
 
एक उपमुख्यमंत्री काडीखोर आहे, असं जरांगे पाटील म्हणाले. पण एक फूल आणि दोन हाफ सगळेच काडीखोर आहेत. त्यांनाच महाराष्ट्र पेटवायचा आहे," असं संजय राऊत म्हणाले.
 
राज्यातील सर्व प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी त्यांनी हा प्रश्न चिघळत ठेवला आहे, असा आरोपही राऊत यांनी केला.
 
दरम्यान, राज्य सरकारने बोलवेलेल्या बैठकीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी 'एक्स'वरुन भाष्य करत टीका केलीय.
 
संजय राऊत यांनी एक्सवर लिहिलं आहे की, "मराठा समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरल्यानं पूर्णत: बॅकफूटवर गेलेल्या शिंदे फडणवीस सरकारनं बुधवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. मात्र, या बैठकीसाठी आमदार नसलेल्या पक्षालाही निमंत्रित केलं आहे, पण ठाकरे गटाच्या आमदारांना आमंत्रित करण्यात आलेलं नाही. शिवसेना ठाकरे गटाकडून केवळ अंबादास दानवे यांना निमंत्रण देण्यात आलं आहे."
 
यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या सरकारचं करायचं काय? अशी विचारणा करत हल्लाबोल केला आहे.
 
त्यांनी ट्विट करून "आम्हाला मानपान नको. पण प्रश्न सोडवा. जरांगे पाटील यांचे प्राण वाचवा" असं म्हटलं आहे.