Mumbai : CISF जवानाची स्वतःला गोळी झाडून आत्महत्या
मुंबईतील बीकेसी परिसरात असलेल्या जिओ गार्डनजवळ एका CISF जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.
मुकेश खेतरिया असे या जवानाचे नाव असून तो गुजरातमधील अमरेली जिल्ह्यातील रहिवासी आहे. मुकेशने सोबत ठेवलेल्या एके 47 रायफलने स्वतःवर गोळी झाडली. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 16 डिसेंबर रोजी घडली. सूत्रांनी सांगितले की, मुकेशची ड्युटी जिओ गार्डनच्या गेट क्रमांक 5 वर होती. गोळीचा आवाज ऐकून लोकांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली तेव्हा त्यांनी जवानाला स्वतःवर गोळी झाडल्याचे बघितले.
या घटनेची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिस आणि फॉरेन्सिक टीमने परिस्थितीचा आढावा घेतला आणि घटनास्थळी उपस्थित पुरावे गोळा केले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुकेशला तात्काळ सायन रुग्णालयात नेले. येथे डॉक्टरांनी सीआयएसएफ जवानाला मृत घोषित केले. पोलिसांना घटनास्थळावरून जवानाची एके 47 आणि जिवंत गोळ्यांच्या 29 राउंड सापडल्या आहेत. पोलिसांनी या घटनेची माहिती मुकेशचे वडील खोडाभाई यांना दिली आहे. बीकेसी पोलिसांनी या प्रकरणी नोंद केली असून तपास करत आहे.
Edited by - Priya Dixit