शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 25 नोव्हेंबर 2023 (08:16 IST)

जायकवाडीच्या पाण्याच्या निमित्ताने मराठा आंदोलनाला बदनाम करण्याचा डाव

मुंबई : मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनामुळे तूर्त जायकवाडीत पाणी सोडू नये, अशी सूचना करणारे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे पत्र म्हणजे मराठा आंदोलनाला बदनाम करण्याचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी केला. हे दोन स्वतंत्र विषय असून त्यांचा संबंध जोडण्याचे कारणच काय? असा संतप्त सवाल त्यांनी केला.
 
सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून मराठावाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे मराठवाड्यातील पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. मात्र, पाणी न सोडण्याबाबत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जलसंपदा विभागाला पत्र लिहिले आहे. त्यासाठी महामंडळाने मराठा आंदोलनाचे कारण दिले आहे. अशोक चव्हाण यांनी आज महामंडळाचे पत्र समाजमाध्यमांवर पोस्ट करून या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला. मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यामध्ये सुरु आंदोलनामुळे तूर्तास जायकवाडीत पाणी न सोडण्याबाबत महामंडळाने जलसंपदा विभागाला पत्र लिहिणे धक्कादायक आहे. हा मराठा आरक्षण आंदोलनाला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा डाव आहे.
 
पाण्याची प्रतीक्षा करणा-या मराठवाड्यातील नागरिकांना मूर्ख बनविण्याचा प्रयत्न आहे. उर्ध्व भागातून जायकवाडीत पाणी सोडण्याचा आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा काय संबंध? असा सवाल करत उगाच मराठा आंदोलनाला बदनाम करू नका आणि पाणी सोडण्याचे टाळू नका, असे चव्हाण यांनी महामंडळाला सुनावले आहे. महामंडळाने हे पत्र कोणत्या कारणांमुळे लिहिले याचा राज्य सरकारने तातडीने खुलासा करावा, अशी मागणीही चव्हाण यांनी केली आहे.