मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 13 ऑक्टोबर 2021 (16:20 IST)

फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत केलेलं एक विधानावर संजय राऊतांनी खोचक शब्दांत निशाण

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत केलेलं एक विधानावर संजय राऊतांनी खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानावर मंगळवारी काँग्रेसकडून देखील सचिन सावंत यांनी अशाच प्रकारे खोचक पद्धतीने टोला लगावला आहे.
 
नवी मुंबईतल्या या कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी गणेश नाईक, भाजपा आमदार मंदा म्हात्रे आणि इतर पदाधिकाऱ्यांना उल्लेखून हे विधान केल्यानंतर ते व्हायरल होऊ लागलं आहे. “गणेश नाईक, मंदा म्हात्रे, पाटील साहेब तुमच्यामुळे मला एकही दिवस जाणवलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. मला असं वाटतं की मी आजही मुख्यमंत्री आहे. तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही. मनुष्य कुठल्या पदावर आहे हे महत्वाचं नाही तो काय करतो हे महत्वाचं आहे. गेले दोन वर्ष घरात एकही दिवस न थांबता मी जनतेच्या सेवेमध्ये आहे. त्यामुळे मला कधी जनतेने हे जाणवू दिलं नाही की आता मी मुख्यमंत्री नाही”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.
 
दरम्यान, या विधानावर आता शिवसेनेकडून संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. “लोकांना कधीकधी वाटतं, अजून यौवनात मी. असं एक नाटक रंगमंचावर गाजलंय. ते चिरतरुण नाटक होतं. तसं अनेकांना वाटतं की अजूनही यौवनात मी, अजूनही मी मुख्यमंत्री. आम्हालाही कधीकधी दिल्लीत गेल्यावर वाटतं आमचाच पंतप्रधान होणार”, असं संजय राऊत खोचकपणे म्हणाले. “त्यांची भावना योग्य आहे. स्वप्नात रममाण व्हावं माणसानं. चांगली स्वप्न पाहावीत. स्वप्नांना बळ असावं, त्यांच्या पंखात अधिक ताकद येवो आणि आकाशात उडण्यासाठी त्यांना बळ यावं, अशा माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांचं आयुष्य ही स्वप्न बघण्यात जावं”, असं देखील राऊत म्हणाले.