शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 मे 2018 (15:30 IST)

पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेऊनच निर्णय घ्यावा - शरद पवार

- यासंदर्भात दिलीप वळसे पाटील उद्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांसह करणार चर्चा
 
राष्ट्रवादी मुंबई अध्यक्ष नियुक्ती प्रक्रियेत मुंबई पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेणे आवश्यक असून सर्व पदाधिकाऱ्यांची मते ऐकून मुंबई अध्यक्षपदाबाबत निर्णय घ्यावा असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. यासंदर्भात राज्य निवडणूक अधिकारी दिलीप वळसे पाटील शुक्रवार, ११ मे रोजी मुंबईतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करतील आणि त्यानंतर मुंबई अध्यक्षपदाबाबात निर्णय घेतला जाईल, असे पवार यांनी सांगितले. या प्रस्तावास दिलीप वळसे पाटील यांनी संमती देऊन पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून पवार साहेब व प्रदेशाध्यक्षांसमोर अहवाल सुपूर्द करण्याचे मान्य केले. तसेच पदाधिकाऱ्यांची निवड करताना नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल याची काळजी सर्वांनी घ्यावी, सर्व समाजघटकांना स्थान मिळावे, अशा सूचना पवार साहेबांनी केल्या. मुंबई अध्यक्ष नियुक्ती प्रक्रिया पार पडल्यानंतर मुंबईतील कार्यकर्त्यांसाठी शिबिराचे आयोजन करावे, अशी सूचनाही त्यांनी नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना केली.
 
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने नेहमीच मुंबई शहराचा विकास व्हावा यासाठी प्रयत्न केला आहे. पवार साहेबांचे विचार या शहरात रूजविण्यासाठी कार्यकर्ते नेहमी तप्तर असतात. मुंबई शहरातील नागरिक अनेक नागरी समस्यांनी त्रस्त आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना दिलासा मिळण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच, मुंबईत येत्या काळात बुथ लेवलवर कार्यक्रम घेतले जातील, वार्ड अध्यक्षांनी रोज मतदारसंघास भेट द्यावी आणि जिल्हाध्यक्षांनी महिन्यातून एकदा तरी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक घ्यावी, अशा सूचना पाटील यांनी केल्या.
 
सत्तेत नसताना कार्यकर्ता कसा टिकवायचा हे तीन वर्षांच्या मुंबई अध्यक्षपदाच्या कार्यकालात आपण शिकलो, असे वक्तव्य सचिन अहिर यांनी यावेळी केले. जो कार्यकर्ता पवार साहेबांच्या विचाराशी बांधील आहे तो आज पक्षासोबत आहे. हा कार्यकर्ता सोबत राहिला तर या राज्यात सत्तापालट होईलच, असा विश्वास अहिर यांनी व्यक्त केला. प्रदेशाध्यक्षांनी आठवड्यातील एक दिवस मुंबईसाठी द्यावा, अशी विनंतीही अहिर यांनी जयंत पाटील यांना केली. मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा संच आहे. हा कार्यकर्ता जपला तर मुंबईत निर्णायक भूमिका घेऊ शकू. कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी, आपल्याला ईशान्य मुंबईची जागा जिंकायची आहे, असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. मुंबईच्या विकासासाठी काम करताना पक्षाध्यक्ष जो आदेश देतील तो मान्य असेल, असे प्रतिपादन अहिर यांनी यावेळी केले.