शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 2 मार्च 2023 (16:01 IST)

शिवसृष्टीचा पहिला टप्पा पूर्ण शिवजयंतीदिनी होणार लोकार्पण

पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान तर्फे नऱ्हे-आंबेगाव येथे साकारत असलेल्या ‘शिवसृष्टी’चा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह याच्या हस्ते येत्या रविवारी (19 फेब्रुवारी) शिवजयंतीनिमित्त याचे लोकार्पण होणार आहे. या सोहळय़ानंतर शिवप्रेमींसाठी ‘शिवसृष्टी’चा पहिला टप्पा असलेला सरकारवाडा खुला होणार असल्याची माहिती महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम यांनी दिली.
 
लोकार्पणासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यसभेचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, पुणे जिह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नाना जाधव यावेळी उपस्थित राहणार आहेत.
 
‘शिवसृष्टी’ हा आशियातील सर्वात भव्य ऐतिहासिक थीम पार्क प्रकल्प असून त्याचा पहिला टप्प्या असलेल्या सरकारवाडा या ठिकाणी कामकाजाचे ठिकाण, भव्य संशोधन ग्रंथालय, प्रदर्शनी दालन व बहुउद्देशीय सभागृह उभारण्यात आले आहे. शिवाय याच ठिकाणी देवगिरी, तोरणा, शिवनेरी, राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, पन्हाळगड व विशाळगड या गड-किल्ल्यांची सफर घडविणारा ‘दुर्गवैभव’ हा भाग, शिव छत्रपतींच्या काळात वापरत असलेल्या शस्त्रांचे विशेष दालन ‘रणांगण’, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळय़ाची माहिती देणारे दालन आणि महाराजांची आग्रा येथून झालेली सुटका ही एका विशेष थिएटरच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभविता येईल. तसेच मॅड मॅपिंगद्वारे प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज यांचे भाषण ऐकण्याची अनुभुती देखील मिळणार आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor