कुरिअरमधून आल्या तलवारी
औरंगाबाद शहरामध्ये एकाचवेळी कुरियरने आलेल्या तब्बल 37 तलवारी पोलिसांनी जप्त केल्या. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी पुण्यातही याच पद्धतीने कुरिअर कंपनीकडे आलेल्या गाठोड्यामध्ये दोन तलवारी आढळून आल्या. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मार्केट यार्ड येथील डीटीडीसी या कुरिअर कंपनीच्या कार्यालयातून स्वारगेट पोलिसांना फोन आला. त्यांच्या कुरिअर कंपनीला आलेले एक गाठोडे संशयास्पद असल्याची माहिती त्यांनी स्वारगेट पोलिसांना दिली.
कुरियरने कोणतीही वस्तू मागवता येत मात्र पुण्यातील काही महाभागांनी तलवारीच मागवल्या आणि कुरियर कंपीनीने त्या पाठवल्या. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कुरिअर कंपनीच्या कार्यालयातील गाठोडे उघडले, तेव्हा पोलिसांना त्यामध्ये दोन तलवारी आढळून आल्या. पोलिसांनी दोन्ही तलवारी जप्त केल्या. त्यानंतर या तलवारी कुठून आल्या, कोणी पाठविल्या, याबाबत चौकशी सुरू केली. तेव्हा कोंढवा येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने पंजाबमधील लुधियाना येथून या तलवारी मागविल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी संबंधित व्यक्तीकडे चौकशी करून त्याच्याविरुद्ध बेकायदेशीरपणे शस्त्र मागविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.