एकाच दिवशी तिघांची आत्महत्या
बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यात एकाच दिवशी तिघांनी आत्महत्या करून आपले आयुष्य संपविण्याची धक्कादायक घटना घडली आहे. नैराश्यातून त्यांनी गळफास लावून हे टोकाचे पाऊल घेतल्याचे समजले आहे. मृतांमध्ये एका शिक्षकाचा समावेश आहे. ते धारूरच्या गावंदरा गावातील रहिवासी होते. सुरेश रामकिसन बडे(37)असे या मयत शिक्षकाचे नाव आहे. सुरेश यांनी पहाटे 3 वाजेच्या सुमारास माजलगावच्या जवळ असलेल्या केसापुरी कॅम्प येथे लोखंडी आडूला गळफास घेऊन आपले आयुष्य संपविले. तर माजलगाव तालुक्यात कृष्णा बाळासाहेब कोको या 19 वर्षीय तरुणाने कमरेच्या बेल्टचा गळफास घेऊन आत्महत्या केली.आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. तर माजलगावातील राजेगाव येथे रामचंद्र धुराजी गरड या 40 वर्षीय व्यक्तीने आर्थिक जाचाला कंटाळून शेतातील असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपले आयुष्य संपविले. एकाच दिवशी तिघांच्या मृत्यूने सर्व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.