मानसी देशपांडे
मागच्या काही आठवड्यांमध्ये दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) या यंत्रणांकडून मोठ्या कारवाया करण्यात आल्या.
पुणे पोलिसांनी वाहन चोरीच्या संशयावरुन 18 जुलै रोजी अटक केलेल्या दोन संशयितांचं दहशतवादी कारवायांमधलं कनेक्शन उघड झालं आणि त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन एटीएसने पुढचा तपास सुरू केला.
याचदरम्यान एनआयएकडून महाराष्ट्रातलं इसिस माँड्यूलच्या संदर्भात तपास सुरू होता आणि त्यात महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी छापे टाकून अटकही करण्यात येत होत्या.
आयसिस माँड्यूलच्या संदर्भात एनआयएच्या ताब्यात असलेल्या एका आरोपीला एटीएसने ताब्यात घेतलं.
तो आणि एटीएसच्या ताब्यातील आरोपी संपर्कात असल्याचं समोर आल्याचं एटीएसने म्हटलं. या सगळ्या प्रकरणात आतापर्यंत काय काय झालंय यावर एक नजर टाकूया.
एटीएसकडून आणखी आरोपींना अटक
18 जुलै 2023 रोजी पुणे पोलिसांनी तिघांना दुचाकी चोर असल्याच्या संशयातून ताब्यात घेतले. या संशयितांच्या घराची झाडाझडती घेण्यात आली.
त्यामधे त्यांच्या घरातून एक जिवंत काडतुस, चार मोबाईल, एक लॅपटाॅप आणि इतर कागदपत्रे सापडली.
यातून हे संशयित हे देशविघातक कृत्यात सहभागी असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यातून अधिक चौकशी केली असता, हे एनआयएच्या फरार लिस्टमधले आरोपी असल्याचं निष्पन्न झालं.
यानंतर पुणे पोलिसांनी त्यातील दोघांना दहशतवाद विरोधी पथकाकडे सोपवलं.
मोहम्मद इम्रान युसुफ खान आणि मोहम्मद युसुफ मोहम्मद याकूब साकी अशी त्यांची नावं होती. हे दोघंही मुळचे मध्य प्रदेशमधील रतलामचे असल्याचं पुढे आलं.
यानंतर या दोघांना पुण्यातील कोंढवा भागात आश्रय देण्याच्या आरोपाखाली अब्दूल कादीर दस्तगीर पठाण यालाही अटक करण्यात आली.
खान आणि साकी यांना आर्थिक पुरवठा करणाऱ्या इसमाचा शोध एटीएसने घेतला आणि त्याला 26 जुलै रोजी रत्नागिरी इथून अटक करण्यात आली.
सिमाब नसरुद्दीन काझी असं या आरोपीचं नाव असल्याचं टाईम्स आँफ इंडियाच्या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे. 27 वर्षांचा काझी हा इंजिनीअर असल्याचं तपासातून पुढे आलं. या प्रकरणातली ही चौथी अटक होती.
आरोपींकडे बॉम्ब बनवण्याचे साहित्य आढळले
एटीएसच्या तपासात आढळलं की, खान आणि साकी यांच्याकडे बाँब बनवण्यासाठी आवश्यक साहित्य होतं. यामध्ये केमीकल पावडर, थर्मामिटर, छोटे बल्ब आणि इतर साहित्य आढळले.
काझीकडून मिळालेल्या माहितीनुसार हे साहित्य जिथून खरेदी करण्यात आलं, तिथला तपासही एटीएसने सुरु केला.
खान याची चौकशीत आढळून आलं की, त्याने बाँब बनवण्यासाठी विविध केमिकल्स आणि लॅब उपकरणे एका ठराविक ठिकाणी लपवून ठेवले होते. तपास टीमने तिथे जाऊन ते साहित्य जप्त केले.
एटीएसने कोर्टात दिलेल्या माहितीच्या आधारावर वृत्तसंस्थांनी रिपोर्ट्स दिले की या आरोपींना जंगलांमध्ये बाँबची ट्रायल घेतली होती.
पुण्यातील डाॅक्टरला दहशतवादी संबंधांप्रकरणी एनआयए कडून अटक
पुण्यातील 43 वर्षीय डाॅक्टरला दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याप्रकरणी आणि देशविघातक कृत्यांप्रकरणी अटक केली.
डाॅक्टर अदनानली सरकार यालाअटक केली. सरकारच्या कोंढवा भागातल्या घरावर छापा टाकून तिथून काही इलेक्ट्राॅनिक साहित्यही जप्त करण्यात आलं.
28 जून 2023 पासून एनआयएने हाती घेतलेल्या कारवाईमधली सरकार याची ही पाचवी अटक होती.
याआधी चार जणांना मुंबई, ठाणे आणि पुतण्यातून अटक करण्यात आलेली आहे. तबीश नासर सिद्दिकी (मुंबई), झुबैर नूर मोहम्मद शेख (पुणे), शार्जील शेख आणि झुल्फीकार अली बरोदावाला (ठाणे) अशी त्यांची नावं होती.
एनआयएकडून महाराष्ट्रातील इसिसच्या माॅडेलचा तपास सुरु आहे. यातील षडयंत्रामध्ये सामील असलेल्या लोकांचा तपासही एनआयएकडून केला जातोय.
बरोदावाला एटीएसच्या ताब्यात
यातील एनआयएकडच्या गुन्हाच्या संदर्भात न्यायालयीन कोठडीत असलेल्या झुल्फीकार अली बरोदावाला याचा ताबा एटीएसने घेतला.
एटीएसने दावा केला आहे की, बरोदावाला हा खान, साकी आणि पठाण यांच्या संपर्कात होता. तसंच बरोदावाला हा मुख्य हँडलर असून त्याने बाँब बनविण्यासंदर्भात माहिती पुरवली.
बरोदावालाची कस्टडी घेतल्यानंतर एटीएसकडून झालेली ही पाचवी अटक होती.