शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 22 जून 2022 (15:11 IST)

शिंदे सोबत नक्की कोण कोण आहेत? बघा जिल्हानिहाय नावे

eknath shinde
शिवसेनेतील बंडखोरी उफाळून आली असून मंत्री एकनाथ शिंदेंचा गट अतिशय सक्रीय झाला आहे. या बंडखोरीमुळे शिवसेनेचे दोन तुकडे पडतील की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिंदे यांच्यासोबत तब्बल ४० आमदार असल्याचे सांगितले जात आहे. ही संख्या खुप मोठी असून जिल्हानिहाय पक्षाचे कसे आणि किती नुकसान होत आहे याचे ठोकताळे आता बांधले जात आहेत.
 
शिवसेनेला बंडखोरीची लागण काही प्रथमच झालेली नाही. यापूर्वीही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकाळात अनेक वेळा शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्याचा इतिहास आहे. विशेषतः तत्कालीन शिवसेना नेते व आमदार छगन भुजबळ यांनी सर्वप्रथम मोठ्या प्रमाणावर उघडपणे बंडखोरी करीत शरद पवार यांच्याबरोबर राजकीय संबंध प्रस्थापित केले होते. त्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी देखील शिवसेनेतून बाहेर पडत बंड पुकारले होते.
 
तर तिसऱ्यांदा खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे राज ठाकरे हे सेनेतून बाहेर पडले. चुलत भाऊ उद्धव ठाकरे यांच्याशी अनेक वेळा राजकीय मतभेद झाल्याने बंडखोरी करत राज यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली. आणि आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मोठी बंडाळी झाली आहे. भाजपने पुरवलेल्या गुप्त मदतीच्या जोरावर शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार महाराष्ट्राबाहेर गेले आहेत. प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ३३, तर ३ अपक्ष आमदार असल्याचे सांगितले आहे. ए
 
मुंबई पाठोपाठ ठाणे, कोकण व मराठवाडा म्हणजे औरंगाबाद हा प्रदेश शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु या बंडाळीने तेथे शिवसेनेला ग्रहण लागले आहे. औरंगाबाद, कोकण आणि ठाणे याशिवेसेनेच्या ३ बालेकिल्ल्यातील सर्वाधिक शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागले आहेत. बंडखोरी केलेल्या आमदारांमध्ये कोकणमधील ९ आमदारांचा समावेश आहे. पालघर १, ठाणे ५ आणि रायगडमधील ३ आमदारांचा यामध्ये समावेश आहे. तर कोकणापाठोपाठ मराठवाडा म्हणजेच औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या जिल्ह्यातील २ मंत्र्यासह ३ आमदार म्हणजे ५ जण शिंदेंच्या गटात सामिल झाले आहेत.
 
मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातून तानाजी सावंत व ज्ञानराज चौगुले तसेच नांदेडमधील बालाजी कल्याणकर हे शिंदे यांच्या गटात गेले आहेत. त्याचप्रमाणे सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील पट्टयामध्ये गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि कोरेगावचे आमदार महेश शिंदे हे सुद्धा एकनाथ शिंदेंच्या गटात गेले आहेत. सांगली जिल्ह्यातील खानापूर आटपाडीचे अनिल बाबर हे सुद्धा सामील झाले आहेत. कोल्हापूरचे एकमेव शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर आणि सोलापूरमधील शहाजी पाटील हे देखील गुवाहाटीत आहेत. तर खान्देशातील जळगाव जिल्ह्यातून आमदार किशोर पाटील (पाचोरा), चिमणराव पाटील (पारोळा) तसेच लता सोनवणे (चोपडा) शिंदे गटात गेले आहेत. तसेच विदर्भामधील बुलडाणा जिल्ह्यातून संजय रायमुलकर व संजय गायकवाड तर अकोलामधून नितीन देशमुख यांचा यात समावेश आहे