बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 15 फेब्रुवारी 2022 (13:09 IST)

कोण आहेत खासदार संजय राऊत?

संजय राऊत प्रमुख नेत्यांपैकी केवळ एक नसून तर शिवसेना म्हटलं की आपोआप डोळयांसमोर येणारा चेहरा आहे. शिवसेनेचे राज्यसभा खासदार तसंच दिल्लीत पक्षाची भूमिका मांडणारा एक चेहरा म्हणूनही त्यांची ओळख आहे. राज्यसभेत खासदार असलेल्या संजय राऊत यांच्या करिअरची सुरूवात राजकारणातून नाही तर पत्रकारितेतून झाली होती. 
 
हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. सद्या राज्यामध्ये अस्तित्वात असलेल्या शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित उध्दव ठाकरे सरकारचे शिल्पकार म्हणून संजय राऊत यांना ओळखले जाते.
 
संजय राऊत यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1961 रोजी अलिबागमध्ये झाला. त्यांनी वडाळ्याच्या आंबेडकर महाविद्यालयातून बी.कॉमची पदवी घेतली आहे. लोकप्रभा साप्ताहिक ते सामनाचे कार्यकारी संपादक असा त्यांचा पत्रकारितेतला प्रवास आहे.
 
सुरुवातीला इंडियन एक्स्प्रेसच्या पुरवठा विभागात काम करणारे संजय राऊत पुढे मार्केटिंग विभागात काम करू लागले. नंतर पहिल्यांदा राऊत हे 'लोकप्रभा' या साप्ताहिकात काम करायचे. तिथं ते क्राईम रिपोर्टर म्हणून काम करत असताना त्यांनी अनेक सनसनाटी बातम्या केल्या होत्या. त्यांची गुन्हेगारी विश्वातील पत्रकारितेवर चांगली पकड होती. 
 
पत्रकारितेदरम्यानच संजय यांची राज ठाकरे यांच्याशी भेट झाली आणि त्यानंतर राऊत यांच्या आयुष्यात नवे वळण आले. त्यावेळी राज ठाकरे शिवसेनेत होते आणि ते बाळासाहेब ठाकरे यांच्या अगदी जवळचे होते. राज ठाकरेंज्या जवळचे असल्यामुळे ते बाळासाहेबांचे खास बनले. त्यावेळी आपल्या लेखांमधून ते शिवसेनेच्या भूमिकेशी मिळतीजुळती भूमिका घेत असल्याचं बाळासाहेब ठाकरेंना वाटत होतं. बाळ ठाकरे यांची मुलाखत घेऊन ते अचानक प्रसिद्धीच्या झोतात आले. 1989 ला सामना सुरू झाला तेव्हा अशोक पडबिद्री कार्यकारी संपादक होते. त्यांच्यानंतर संजय राऊत 1993 ला कार्यकारी संपादक पदावर रुजू झाले.
 
'सामना'मधील अग्रलेख हे नेहमी चर्चेचा विषय असतात कारण त्यामधली भाषाशैली बाळासाहेब ठाकरे यांच्या शैलीशी मिळतीजुळती आहे. कारण संजय राऊत बाळासाहेब ठाकरेंच्या स्टाईलने लिहतात. बाळासाहेबांची शैली त्यांनी तंतोतंत आत्मसात केली. आपल्या कामामुळे संजय बाळासाहेबांचे आवडते होते. सामनाच्या संपादकीयासाठी सुरुवातीला बाळासाहेब त्यांना काही मुद्दे सुचवायचे आणि ते मूळ स्क्रिप्ट बनवायचे असे म्हणतात. लवकरच त्यांनी बाळासाहेबांची शैली आणि विचार आत्मसात केले आणि मग एक वेळ अशी आली की त्यांनी ‘सामना’चे संपादकीय मनाच्या आवाजावर लिहायला सुरुवात केली. त्यांच्या संपादकीयाची शैली अशी होऊ लागली की, हे संपादकीय संजय राऊत यांनी लिहिले आहे की बाळासाहेबांनी लिहिले आहे, यावर विश्वास ठेवणेही अवघड व्हायचे.
 
बाळासाहेब वयाच्या उंबरठ्यावर असताना ठाकरे कुटुंबात फूट पडली होती. संजय राऊत यांनी एक मोठा निर्णय घेतला आणि ज्यांचे बोट धरून ठाकरे कुटुंबात प्रवेश केला होता त्यांची साथ सोडण्यास त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. आता ते उद्धव ठाकरेंसोबत होते आणि राज ठाकरे त्यांच्यापासून दूर गेले होते. आता राज ठाकरेंनीही 'सामना'च्या माध्यमातून हल्लाबोल करायला मागेपुढे पाहिले नाही. ठाकरे कुटुंबाचा विश्वास जिंकल्याचं बक्षीसही त्यांना मिळालं आणि 'सामना'च्या संपादकाशिवाय ते राज्यसभेचे खासदारही झाले. 2004 मध्ये पहिल्यांदा राज्यसभेचे खासदार बनले आणि तेव्हापासून ते आता राज्यसभेत पक्षाच्या वतीने एक आवाज राहिले आहेत. नुकताच बाळ ठाकरे यांच्या जीवनावर ठाकरे हा चित्रपट बनला तेव्हा त्याची पटकथा संजय राऊत यांनीच लिहिली होती.
 
आघाडी सरकारच्या काळात राऊत यांचा शब्द भाजपला अस्वस्थ वाटू लागल्याचे बोलले जाते, तेव्हा काही भाजप नेत्यांनी ठाकरे यांच्याकडे तक्रार केली, पण राऊत थांबले नाहीत. यावरून उद्धव यांचा राऊतांवर किती विश्वास आहे हे स्पष्ट झाले. शिवसेनेत संजय राऊत यांचं विशेष स्थान आहे ते तर स्पष्ट दिसून आलंच आहे. सामनाच्या माध्यमातून ठाकरे सरकारकडून काय मांडायचं आहे ते आपोआप कळून येतं.
 
तिन्ही पिढ्यांसोबत जुळवून घ्यायचे कौशल्य त्यांच्यात आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सामनाचे संपूर्ण अधिकार संजय राऊत यांच्या हातात देण्यात आले असून त्याला उभारी देण्याचं काम संजय राऊत यांनी केले आहे.