शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 12 जानेवारी 2023 (20:25 IST)

नेत्यांचे अपघात होण्याचं प्रमाण का वाढतंय?

pankaja dhananjay
Author,प्राजक्ता पोळ
social media
माजी मंत्री बच्चू कडू यांचा बुधवारी रस्ता ओलांडताना अपघात झाला. एका दुचाकीने धडक दिल्यामुळे कडू यांच्या पायाला आणि डोक्याला दुखापत झाली.
 
गेल्या महिनाभरात अपघात झालेले ते पाचवे नेते आहेत. नेत्यांचे अपघात होण्याचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत बोलताना म्हटलं होतं,
 
"रात्रीचा प्रवास करू नका हे मी सगळ्यांना वारंवार सांगत असतो. गाडीचा ड्रायव्हर हा सुद्धा एक माणूस आहे. त्याला झोप लागू शकते. त्यामुळे कशासाठी जीव धोक्यात घालायचा? रात्री व्यवस्थित झोप घेऊन पहाटे 5-6 वाजता प्रवासाला सुरुवात केली तरी हरकत नाही. पण रात्रीचा प्रवास टाळला पाहीजे."
 
रात्रीच्या प्रवासामुळे अपघात? 
भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला 24 डिसेंबरला भीषण अपघात झाला. फलटणजवळील पुणे-पंढरपूर रस्त्यावर मलठण येथील स्मशानभूमीजवळ ही घटना घडली.
 
गाडीवरील चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. शनिवारी पहाटे साडेतीन वाजता हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती स्थानिकांनी दिली होती.
 
हा अपघात झाला तेव्हा आमदार जयकुमार गोरे हे पुण्याहून दहीवडकडे जात होते.
 
यादरम्यान असलेल्या पुलावरून गोरे यांची गाडी साधारण 30 फूट खाली पडली.
 
आमदार जयकुमार गोरे, त्यांचे अंगरक्षक, ड्रायव्हर हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर पुण्यातील रूबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारानंतर आता त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
 
माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांच्या गाडीला 3 जानेवारी रात्री 12.30 वाजल्याच्या सुमारास अपघात झाला. मतदारसंघातील कार्यक्रम आटोपून परळीकडे जाताना हा अपघात झाला.
 
वाहन चालकाचं गाडीवरून नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मुंडे यांच्या कार्यालयातून देण्यात आली. यात धनंजय मुंडे हे जखमी झाले.
 
त्यांच्या छातीला मार लागल्यामुळे सध्या ते मुंबईच्या ब्रिजकॅण्डी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.
 
आमदार योगेश कदम हे खेडकडून मुंबईकडे निघाले असताना कशेडी घाटात रात्री 10.30 च्या सुमारास योगेश कदम यांच्या गाडीला मागून येणाऱ्या टँकरने जोरदार धडक दिली.
 
पोलादपूरजवळच्या चोळई भागात ही घटना घडली. ही धडक दिल्यानंतर टँकर उलटला आणि टँकरचा चालक हा फरार झाला.
 
आमदार योगेश कदम यांना फार दुखापत झाली नसली तरी त्यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालं. योगेश कदम यांना वाय दर्जाची सुरक्षा आहे. त्या सुरक्षांच्या गाड्यांमधून फक्त योगेश कदम यांच्याच गाडीला धडक देण्यात आली.
 
यामुळे काहीतरी घातपाताचा प्रकार असल्याचा संशय योगेश कदम यांचे वडील रामदास कदम यांनी व्यक्त केली होती.
 
हे सर्व अपघात रात्रीच्या प्रवासावेळी झाल्याचं निदर्शनास आले आहे.
 
राजकारणात 90% नेते हे रात्री उशिरापर्यंत काम करतात. काही नेते हे रात्री आहे त्या ठिकाणी थांबून राहीलेलं काम पूर्ण करतात.
 
तर काही नेते हा सकाळच्या कामाचा वेळ प्रवासासाठी कशाला वापारायचा या उद्देशाने रात्री प्रवास करतात. दुसर्‍या पध्दतीच्या कामाच्या पॅटर्नमुळे काही नेत्यांना जीवही गमवावा लागला आहे.
 
रस्ते अपघातात झालेले नेत्यांचे मृत्यू 
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचा 14 ऑगस्ट 2022 मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघात झाला होता. त्यातत्यांचा मृत्यू झाला.
 
भातण बोगद्याच्या 150 मीटर आधी त्यांची गाडी ओव्हरटेक करताना चूक झाल्यामुळे एक अवजड वाहनाला धडकली.
 
मागच्या सीटवर बसलेल्या विनायक मेटे यांना गंभीर दुखापत झाली. हॉस्पिटलमध्ये नेल्यावर त्यांना मृत घोषित करण्यात आले.
 
विनायक मेटे हे बीडहून मुंबईकडे येत होते. त्यांनी मध्यरात्री प्रवासाला सुरुवात केली होती. पहाटेच्या वेळी त्यांचा अपघात झाला.
 
26 मे 2014 ला गोपीनाथ मुंडे यांनी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात शपथ घेतली. शपथविधी नंतर 3 जूनला पहाटे मुंडे दिल्लीहून मुंबईकडे जाण्यासाठी विमानतळाकडे निघाले.
 
सकाळी 6.20 मिनिटांच्या सुमारास अरबिंदो मार्गावर त्यांच्या गाडीला एक इंडीका गाडी धडकली. मुंडे यांच्या ड्रायव्हर आणि सुरक्षारक्षकाला कोणतीही इजा झाली नाही.
 
पण मुंडे यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर काही वेळातच त्यांना मृत घोषित करण्यात आलं.
 
रात्रीचा प्रवास करण्याची वेळ का येते?
मतदारसंघातली कामं त्याचबरोबर मंत्रालयातील बैठका या दोन्हीकडे नेत्यांना लक्ष देणं गरजेचं असतं.
 
एक शहरातील कार्यक्रम संपवून लगेच दुसरीकडे जाण्यासाठी मोठे नेते हेलीकॉप्टर किंवा खासगी विमानाने प्रवास करतात. पण ते नेहमी सर्वांना शक्य नसतं.
 
त्याचबरोबर जर एखाद्या गावातून शहराकडे जायचं असेल तर त्या ठिकाणी सार्वजनिक विमान सेवा उपलब्ध नसते. अनेकदा अचानक ठरलेल्या कार्यक्रमांमुळे रेल्वेचा वापर न करता थेट गाडीने प्रवास करणाचा निर्णय घेतला जातो.
 
व्यग्र कार्यक्रमांमुळे दूरचा प्रवासही गाडीने करणे हे काही नेत्यांना सोईचे वाटते. त्यातून रात्रीचा प्रवास केल्यावर कामाचा वेळ वाचतो या अनुषंगाने विचार करून रात्री प्रवास केला जातो.
 
पण अजित पवार, शरद पवार, उध्दव ठाकरे, राज ठाकरे यांच्यासारखे नेते हे रात्रीचा लांबचा गाडीने प्रवास टाळतात.
 
एकनाथ शिंदेंसारख्या नेत्याचे कार्यक्रम मध्यरात्रीपर्यंत चालू राहतात. जर कार्यक्रम उशीरा संपले आणि प्रवास करायचा असेल तर हेलीकॉप्टरची व्यवस्था नसते. त्यामुळे रात्री अनेकदा नेत्यांना गाडीने प्रवास करणं सोईस्कर वाटतं.
Published By -Smita Joshi