तुम्ही त्यांची काळजी करण्यापेक्षा मशालीची आणि पंजाची चिंता करा-चंद्रेशखर बावनकुळे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वासाठी मंत्रिपद सोडून उठाव केला. त्यांच्या पक्षासोबत भारतीय जनता पार्टीची युती असून भाजपा CM शिंदे यांच्या पाठीशी ताकदीने उभा आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, तुम्ही त्यांची काळजी करण्यापेक्षा मशालीची आणि पंजाची चिंता करा, असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रेशखर बावनकुळे यांनी बुधवारी लगावला. ते गोंदिया येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. नाना पटोले यांनी 'बाळासाहेबांची शिवसेना' पक्षाला मिळालेल्या चिन्हावरून टिप्पणी करताना भाजपाची तलवार चालविणे हेच शिंदे गटाचे चिन्ह अशी टीका केली होती. त्या संदर्भात एका पत्रकाराने प्रतिक्रिया विचारली, त्यावर बावनकुळे यांनी टोला लगावला. तसेच, आमचे कमळ आणि शिंदे गटाचे ढाल-तलवार मिळून काँग्रेसचा पराभव करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीला भाजपाचे खुले आव्हान
"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना या पक्षासोबत आमची युती आहे. आमच्या उमेदवाराच्या विजयासाठी जेवढी ताकद लाऊ त्यापेक्षा अधिक ताकदीने युतीतील पक्षाच्या उमेदवारासाठी काम करू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आम्ही एक आहोत. नाना पटोले यांनी आमची काळजी करू नये. तुम्ही मशालीची, पंजाची आणि घडाळ्याची चिंता करा. कमळ आणि ढाल-तलवार हे दोन्ही मिळून तुम्हाला अशी जागा दाखवू की २०२४ च्या निवडणुकीत महाविकास आघाडीला लढण्यासाठी उमेदवारही मिळणार नाहीत", असे खुले आव्हान त्यांनी दिले.
Edited by : Ratnadeep Ranshoor