यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा २३ वा दीक्षान्त समारंभ
१ लाख ४० हजार ४८४ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान
देशातील प्रत्येक घराघरा पर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचविण्यासाठी मुक्त शिक्षण पद्धती प्रभावी माध्यम आहे. सर्वच मुक्त विद्यापीठे शैक्षणिक क्षेत्रातील तीर्थक्षेत्र असून समाजातील जास्तीत जास्त घटकांनी मुक्त शिक्षणाच्या प्रवाहात यायला हवे, असे प्रतिपादन कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे कुलपती व दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे प्र. कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी आज नाशिक येथे बोलताना व्यक्त केला.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या २३ व्या दीक्षान्त समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर, कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे कुलपती व दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे प्र. कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, परीक्षा नियंत्रक डॉ. अर्जुन घाटुळे, व्यवस्थापन मंडळ सदस्य, विद्वत परिषदेचे सदस्य व नियोजन मंडळाचे सदस्य उपस्थित होते. कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यशवंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करून प्रमुख अतिथींनी अभिवादन केले. यानंतर विद्वत परिषदेची दिंडी सभा मंडपात आली.
डॉ. वेदप्रकाश मिश्रा म्हणाले, लोकसंख्या जास्त असल्याचे एक कारण यासाठी दिले जाते. परंतु आज देशातील २५ % जनता २५ वर्षे वयाखालील तर ७२ % जनता ३५ वर्षे वयाखालील आहे. घटनेतील कल्याणकारी राज्य आणि आरोग्य व शिक्षण हे दोन घटक एकत्रितपणे विचारात घेतले तर केवळ कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या प्रशिक्षित युवकांपेक्षा अधिक काही देण्याची शिक्षण संस्थांची जबाबदारी आहे. दूरशिक्षण पद्धती हा त्यासाठी उत्तम मार्ग आहे. मुक्त शिक्षण आणि दूरशिक्षण हे शब्द आजकाल एकाच अर्थी वापरले जात असून मुक्त शिक्षण हे तत्व आहे तर दूरशिक्षण हे माध्यम आहे. दूरशिक्षण हि एक सर्वसमावेशक प्रणाली असून शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील अंतर विविध माध्यमांद्वारे भरून काढण्याची आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी घडविण्याची पद्धती आहे. पारंपरिक शिक्षण पद्धती अद्याप लोकसंख्येच्या एक पंचमांश घटकालाही शिक्षण प्रवाहात सहभागी करून घेऊ शकलेली नाही.
या पदवीदान सोहळ्यात कुलगुरू प्रा. डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी या वेळी विद्यापीठाचा अहवाल सादर केला. ते म्हणाले, हे विद्यापीठ विद्यार्थ्यांचे अध्ययन आनंददायी व समृद्ध करणारे आहे. शिक्षणातून केवळ वैयक्तिक हित साध्य करू नका तर ज्या समाजाने आपल्याला शिक्षणाची शिदोरी मिळविण्यास मदत केली, त्या समाजातील शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुली, स्त्रिया आणि पुरुष यांनाही शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रेरित करा. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी डी. लिट. पदवी स्वीकारण्यास सहमती दर्शिविल्याने विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला असल्याचे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले. या वेळी डॉ. वेदप्रकाश मिश्रा, कुलगुरू प्रा. डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सुवर्णपदके आणि पारितोषिके देण्यात आली. विद्यापीठाच्या विविध शाखांत प्रावीण्य मिळविलेल्या ३८ विद्यार्थ्यांना विशेष पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या वेळी एकूण १ लाख ४० हजार ४८४ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. त्यात पदविका २१ हजार ११, पदव्युतर पदविका ४ हजार ८१३ तर पीएच.डी. चे १७ विद्यार्थी पदवी ग्रहण केली. यावेळी ६१ बंदी बांधवही पदवीधर झाले. याप्रसंगी लता दीदींच्या कारकीर्दीवर प्रकाश टाकणारी ध्वनिचित्रफित यावेळी दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल चिकेरूर यांनी केले. कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
१६ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक
या समारंभात १६ विद्यार्थ्यांना १७ सुवर्णपदके देऊन गौरविण्यात आले. त्यात पूनम चव्हाण (बी.ए.), मोनाली बिरे (बी.लिब), सुषमा आवळे (वृत्तपत्रविद्या), अनिकेत शहादे (एमबीए), स्नेहल नसरे (एम.कॉम.), प्रशांत पाटील (बी.कॉम.), आसाराम राठोड (एम.एड.), सुवर्णा पाटील (बी.एड.), नितीन भालकर (बी.एस्सी.-अॅग्रीकल्चर/ हॉर्टीकल्चर), प्रतिभा सातपुते (बी.सी.ए.), प्रणिता भंतर (बी.एस्सी. - एच.एस.सी.एस), पल्लवी चव्हाण (बी.एस्सी. – एचटीएम), दर्पणा भगत (एम.आर्च), प्रशांत शर्मा (बी.आर्च), अजिंक्य कटारिया (बी.टेक- मरीन इंजिनीअरिंग), सोमनाथ जमदाडे (बी.एस्सी – इंडस्ट्रीअल ड्रग सायन्स)
२१ हजार विद्यार्थ्यांना पदविका प्रदान
या पदवीदान सोहळ्यात २८ हजार ११ पदविका तसेच ४२ विद्यार्थ्यांना विशेष पारितोषिके देवून गौरविण्यात आले आहे.