शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. »
  3. धर्मयात्रा
  4. »
  5. धर्मयात्रा लेख
Written By अक्षेश सावलिया|

ज्योतिर्लिंग सोरटी सोमनाथ

WD
गुजरातमध्ये सौराष्ट्रात वसलेले सोरटी सोमनाथ मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. देशातील प्राचीन तीर्थस्थळांत सोमनाथ मंदिराचा समावेश होतो. त्याचा उल्लेख स्कंदपुराण, श्रीमदभागवत गीता, शिव पुराणात आढळतो. वेद, ऋग्वेदातही सोमेश्वर महादेवाचा महिमा वर्णिला आहे.

हे मंदिर ऐतिहासिकदृष्ट्याही महत्त्वाचे आहे. हे मंदिर एवढे वैभवशाली होते, गझनीच्या मोहम्मदाने त्यावर अनेकदा आक्रमण करून ते लुटले. या मंदिराचा विध्वंसही त्याने केला होता. नंतर मधल्या काळात इंदूरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांनीही त्याच्या जीर्णोद्धाराला मदत केली होती. सध्या अस्तित्वात असलेले मंदिर हे भारताचे माजी पंतप्रधान व लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अथक प्रयत्नातून साकार झाले आहे. सातव्या वेळेले हे मंदिर बांधण्यात आले असून ते कैलास महामेरू प्रसाद शैलीत बनविले गेले आहे. हे मंदिर गर्भगृह, सभामंडप आणि नृत्यमंडप या तीन प्रमुख भागांमध्ये आहे. याच्या शिखरावरील कलशाचे वजन दहा टन आहे. ध्वजाची उंची 27 फूट आहे.

धार्मिक महत्त्व
WD
पुराणात या मंदिराच्या अनुषंगाने एक कथा आहे. चंद्राचे सोम असे नाव होते. तो दक्षाचा जावई होता. एकदा त्यांनी दक्षाची अवहेलना केली. त्यामुळे राग येऊन दक्षाने त्यांचा प्रकाश दिवसादिवसाने कमी होत जाईल असा शाप दिला. अन्य देवतांनी दक्षाला उःशाप देण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी सरस्वती नदी समुद्राला जिथे मिळते, तेथे स्नान केल्यास या शापाचा परिणाम रहाणार नाही, असे सांगितले. त्यानंतर सोमाने सौराष्ट्रातील या ठिकाणी येऊन येथे स्नान केले आणि भगवान शिवाची आराधना केली. शंकर येथे प्रकट झाले आणि त्यांनी त्याचा उद्धार केला. त्यामुळे हे स्थान सोमनाथ या नावाने प्रसिद्ध झाले.

कसे पोहचाल?
हवाई मार्ग: सोमनाथपासून 55 किलोमीटरवर केशोड नावाच्या स्थानाहून सरळ मुंबईसाठी हवाईसेवा आहे. केशोड आणि सोमनाथ दरम्यान बस आणि टॅक्सी सेवा आहे.

रेल्वे मार्ग:
सोमनाथहून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन वेरावळ असून ते सात किलोमीटरवर आहे. येथून अहमदाबाद आणि गुजरातच्या अन्य ठिकाणी जाता येते.

रस्ता मार्ग:
सोमनाथ वेरावळहून सात किलोमीटर, मुंबईहून 889, अहमदाबादपासून 400, भावनगरहून 266, जुनागढहून 85, पोरबंदरहून 122 किलोमीटरवर आहे. पूर्ण राज्यातून येथे येण्यासाठी बस सेवा उपलब्ध आहे.

रहाण्याची सोय:
येथे रहाण्यासाठी गेस्ट हाऊस, आणि धर्मशाळेची व्यवस्था आहे. वेरावळमध्ये राहण्याची उत्तम व्यवस्था आहे.

फोटो गॅलरीसाठी येथे क्लिक करा....