नारळी पौर्णिमेचा नारळी भात, नागपंचमीची दिंड, शुक्रवारच्या पुरणाच्या आरतीतले पुरण, पोळ्याची पुरणपोळी कडबोळी गोकुळाष्टमीचा गोपाळकाला हे विशिष्ट पदार्थ त्याची चव कायम आपल्याला आठवतेच. राखीपौर्णिमेला प्रत्येक जण आपल्या भावा बहिणीची आतुरतेने वाट बघतो. प्रत्यक्ष नाही तरी पोस्टाने तरी राखी यावी असे पूर्वी कायम वाटायचे. बहिणींना उद्या आपला दादुटल्या आपल्याला काय देणार याची उत्सुकता तर भावांना आपली राखी कशी असेल याची. आदल्या दिवशीच उधाणलेल्या दर्याला सोन्याचा नारळ अर्पण करून आपला कोळीबांधव त्याला शांत व्हायला सांगतो. अन् दुसर्याच दिवशी असणार्या राखी पौर्णिमेच्या विचारानी बहीण नसणारा छोटा भाऊ, कोण मला ओवाळिल ह्या काळजीत चुर होतो.
सर्वांचा आवडता कृष्ण याचा जन्म (कृष्णाष्टमी) याच काळातला. त्याच्या जन्माष्टमीनिमित्त चालणारा उत्सव, त्याच्या रुपात नटेलेली बाळं, अन् जागोजागी बांधल्या जाणार्या दहीहंड्या त्या हंड्यांची कपची मिळवण्याची धडपड, काल्याचा प्रसाद हे एक ना अनेक विचार, आठवणी मनात अशा दाटून येतात.
या महिन्याच्या शेवटी येणारा पोळा हा सण तर सर्वात मोठा आहे. आपल्याला पिक देणार्या वसुंधरेची कृतज्ञता व्यक्त करतो ते श्रावणातील फूलपत्री उपास अन् सणांनी. पण प्राणीमात्रांची कृतज्ञता म्हणून नागपंचमीखेरीज आपण आपल्या नित्यजीवनातील सहकारी असलेल्या सर्जा-राजाच्या उपकाराची जाण पोळा या सणाच्या दिवशी व्यक्त करतो. त्या दिवशी त्याला सजवतो, गरम पाण्याने न्हाऊ घालतो. झुल गोंडे आरसे लावतो. शिंगात कडबोळी अन् त्याला कडबूचा घास भरवतो. (कर्नाटकात बेंदूर साजरा करतात तेव्हा पुरणपोळीपेक्षा पुरणाच्या कडबूचाच मान असतो त्या दिवशी.) त्याला ओवाळतो त्याची पूजा करतो.
सृष्टीला पडलेली श्रावणभूल
श्रावणातील धात्रीवरही वेगवेगळी असंख्य प्रकारची फुलं, कोवळे अंकूर याच काळात तयार होतात. शिरीष, पारिजातक, सोनचाफा, बकुळी ही फुले तर या ऋतु भरपूर येतातच. पण ठिकठिकाणी सायली अन् गौरीची फुलेही दिसतात. सोनटक्याची पिवळट पांढरी झाक असणारी फुलेपण श्रावणातच दिसतात. ऋतुचक्र या पुस्तकात दुर्गाताईंनी याचे फार सुंदर वर्णन केले आहे. त्या म्हणतात. श्रावण म्हणजे हिरव्या रंगाचे मुक्त प्रदर्शन. कोवळ्या तृणांकुरांनी पृथ्वीचे विशाल अंग तर झाकून जातेच पण उघडे बोडके दगडही शेवाळाची मखमल पांघरुन बसतात. असा हा कुसुमाग्रजांनी वर्णिलेला 'हासरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजरा श्रावण'. त्याच्या आगमनाची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे अगदी तुम्हाला अन् धरतीलाही.
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
Read More