गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. अधिकमास
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020 (16:45 IST)

अधिकमास माहात्म्य अध्याय नववा

श्रीगणेशाय नमः ॥ जयजयाजी रामचंद्रा ॥ अयोध्यावासिया रघुवीरा ॥ दयावंता कृपासागरा ॥ नेई पैलतीरा पंथ हा ॥ १ ॥
तव कृपेची अखंड नौका ॥ परतीरा नेतसे भाविका ॥ येथींचा कर्णधार निका ॥ वाल्मिक देखा साचार ॥ २ ॥
हे धर्मनौका जनालागीं ॥ शिल्पिकार तोहा महाराज योगी ॥ निर्माण केलीसे जगालागीं ॥ वाढविला परमार्थ ॥ ३ ॥
ऐका श्रोते सज्जनहो ॥ मळमहात्म परिसाहो ॥ सांगतसे लक्ष्मीना हो ॥ सत्कारुनि आदरेसी ॥ ४ ॥
ऐकतां हो त्रिविधताप ॥ दूरी जाय भव संताप ॥ पापें जाताती आपेंआप ॥ घेतां नाम श्रवणग्रंथीं ॥ ५ ॥
श्रीरुवाच ॥ देवदेव दयासिंधो वद किंचिदथोद्‍भुतं ॥ मलमासे न चीर्णेन भवेत्सकलसत्कृतं ॥ १ ॥
श्रीविष्णु रुवाच ॥ श्रृणु क्षीरोदतनये सर्वदा नंददायिनी ॥ सर्वोपरि दयादृष्टे सर्वानुग्रहकारिणी ॥ २ ॥
लक्ष्मी वदे जी स्वामिनाथा ॥ देवदेव जगन्नाथा ॥ अवधान देइजे वचनार्था ॥ अनाथ नाथा दयासिंधो ॥ ६ ॥
या मलमासाचें उपोषण ॥ करावे काय कारण ॥ याचें निवेदावें कथन ॥ कवण तरोन गेलासे ॥ ७ ॥
मग वदे तेव्हां श्रीधर ॥ ऐका प्रश्नाचें उत्तर ॥ मुख्य दयावंत अंतर ॥ असोनि निर्भरेंसी हो ॥ ८ ॥
दया असे जयाचे ह्रदयीं ॥ तया तें घडे सर्व काहीं ॥ अन्नदाना ऐसें दुजें नाहीं ॥ साधन आणीक निर्धारें ॥ ९ ॥
भूतमात्री दया जयातें ॥ सर्व साधनें घडती तयातें ॥ तेणें जाती मोक्षपंथें ॥ तपसामर्थ्ये आगळा ॥ १० ॥
या विषयींचा इतिहास ॥ नावेक ऐका सावकाश ॥ तेंची कथन श्रवणास ॥ यथामती निवेदूं आतां ॥ ११ ॥
सर्व धर्मामाजी उत्तम धर्म ॥ अन्नदान अति उत्तम ॥ तयावरी दया आणि क्षेम ॥ विशेषाहूनि विशेष ॥ १२ ॥
उत्तरदेशीं नर्मदातीरीं ॥ महिस्मृती नामें असे नगरी ॥ तेथील एक ब्राह्मणाची नारी ॥ वैधव्य निर्धारी तियेतें ॥ १३ ॥
भ्रताराविरहित कामिनी ॥ आप्तवर्ग नसेची कोणी ॥ एकाकी विचरे ते स्थानीं ॥ भिक्षा मागुनी क्रमी काळ ॥ १४ ॥
तामसी परम कोपिष्ट ॥ विधवा असूनी रागीट ॥ तपश्चर्या करी श्रेष्ठ ॥ काया कष्टें कष्टवीतसे ॥ १५ ॥
तंव पातलिया मलमास ॥ नर्मदातीरीं जातसे स्नानास ॥ नक्‍त नेम करी उपवास ॥ भरतां मास एक पैं ॥ १६ ॥
ऐसें करितां एक मासवरी ॥ परम कृश झाली शरीरीं ॥ तंव तिची सखी एक अवधारीं ॥ मार्गी भेटली तियेतें ॥ १७ ॥
नाम तियेचें तुरिजया पाहीं ॥ परम पापिष्ठ दुरत्ययी ॥ दोषयुक्त सर्वदां ही ॥ अतित्याई चंडिका ते ॥ १८ ॥
मार्गी चालतां अकस्मात ॥ ब्राह्मणी भेटलीं तियेतें ॥ येरी उभी राहूनि तेथें ॥ पुसे स्वागत आदरेंसी ॥ १९ ॥
म्हणे कृश जालीस बाई ॥ व्रत आचरत असा देहीं ॥ मी तव अभीगी पाहीं ॥ न घडे कांही सार्थकता ॥ २० ॥
स्त्री देहाची बुद्धि पाहीं ॥ पापरूपी अमंगळ देहीं ॥ यासीं उपाव करूं काई ॥ सांगा बाई आदरें ॥ २१ ॥
ऐसें बोलून उत्तरातें ॥ करुणास्वरे गहिंवरें तेथें ॥ म्हणे नेणें कधीं दान-व्रतातें ॥ भगवंतातें अंतरलें ॥ २२ ॥
पाहा कर्माचें विंदान ॥ पोटीं न रिघे संतान ॥ पुढें परम कठीण जाण ॥ नरक दारुण सुटेना ॥ २३ ॥
निपुत्रिकातें नाहीं गति ॥ ऐसें बोले वेद श्रुति ॥ पापीयातें नाहीं गति ॥ तरों केउती पुढारी ॥ २४ ॥
ऐसें करुणा स्वरे गहिंवरोन ॥ करिती झाली ते रुदन ॥ ऐसे देखून ब्राह्मणीन ॥ कळवळली मानसी ॥ २५ ॥
भूतमात्रीं दया तिजलागीं ॥ म्हणोन कळवळली निजांगी ॥ मग विचारून स्वआंगीं ॥ काय करिती जाली पै ॥ २६ ॥
हातीं होते गंगाजळ ॥ सवेची होते कर्दळी फळ ॥ मग सुदलेहो तात्काळ ॥ करीं जाण तिचीया ॥ २७ ॥
म्हणें ऐकें सादर आतां ॥ करुणा देखून द्रवले चित्ता ॥ तरी स्वीकारीं हे उदक आतां ॥ फळासहीत निर्धारे ॥ २८ ॥
एका दिवसाचे व्रतपुण्य ॥ तुजलागीं केले अर्पण ॥ येणे हो तुज कल्याण ॥ जाले उत्तीर्ण सर्वस्वेसी ॥ २९ ॥
ऐसे वदोन ते अवसरीं ॥ फळासहीत उदक करीं ॥ घालितांची ते नमस्कारी ॥ कृतकृत जाहलें म्हणोनियां ॥ ३० ॥
ऐसें वर्तता ते समयीं ॥ नवल वर्तलेंसे पाहीं ॥ तात्काळ जाली दिव्यदेही ॥ केवढी नव्हाळी व्रताची ॥ ३१ ॥
मनीं चमत्कारी ब्राह्मणीन ॥ वरतें पाहे जो विलोकून ॥ तो तात्काळ पावलें विमान ॥ स्वर्गाहून तात्काळीं ॥ ३२ ॥
तत्‌क्षणीं तये शूद्रीतें ॥ वाहोनि नेते जाले विमानातें ॥ येरी नमस्कारी बद्धहस्तें ॥ न विसरें मातें उपकार ॥ ३३ ॥
धन्यधन्य तूं पर उपकारी ॥ तपस्विनी माजी तूं खरी ॥ प्रचीत आली आज खरी ॥ सद्गद अंतरीं होतसे ॥ ३४ ॥
त्रिवार करून नमनातें ॥ विमान गेलें स्वर्गपंथें ॥ पुढें काय वर्तलें तें ॥ सावधान चित्तें परिसावें ॥ ३५ ॥
कौतुक पाहून नयनीं ॥ आश्चर्य करितसे मनीं ॥ म्हणे देखत देखत पापिणी ॥ गेली उद्धरोनि तात्काळ ॥ ३६ ॥
काय माझें अदुष्ट खोटें ॥ म्हणोनि दुःख मोठें ॥ पुढें तरी अवघड वाटे ॥ कैसेनि वोहटे जन्म प्रवाहो ॥ ३७ ॥
अहो जगदीशा काय केलें ॥ वृथा जन्मातें सारिलें ॥ कांहीं सार्थक नाहीं जालें ॥ वृथा आल्ये जन्मासी ॥ ३८ ॥
भगवान कृपेची माऊली ॥ एवढी पापीण उद्धरली ॥ देखत देखतच नेली ॥ वाहोनियां विमानीं ॥ ३९ ॥
आतां कवण करावा उपाहो ॥ कैसेनि लागेल माझी सोय ॥ ऐसें उकलवीं ह्रदय ॥ मुमुक्षु पाहे या नावें ॥ ४० ॥
येथें उद्भवली असे शंका ॥ येवढी पापीण उद्धरली देखा ॥ देतां एक दिन पुण्योदका ॥ तरली देखा निर्धारें ॥ ४१ ॥
मग ते ब्राह्मणी पाहीं ॥ केवीं न तरे ते तो देहीं ॥ कैसेनि पडेल अपायीं हे तो नवलाई अनुपम्य ॥ ४२ ॥
तात्काळ गेली पापीण ॥ मागें राहिले पुण्यवान ॥ तरी ये विषयींचे कारण ॥ सावधान परिसीजे ॥ ४३ ॥
समूळ पापी असलिया पाहीं ॥ पुण्यलेश नेणेची कांहीं ॥ उपरती होतां ह्रदयीं ॥ उद्धरोन जाई तात्काळ ॥ ४४ ॥
समूळ पापाचा ठेवा ॥ अर्धलेश पुण्यवट बरवा ॥ तो कैसेनि तरों पाहे जीवा ॥ करूं नये हेवा दुजियाचा ॥ ४५ ॥
समूळ पाप जेव्हा झडे ॥ तेव्हां पुण्यलेश आंगीं जडे ॥ उद्धरा गतीसी मग रोकडे ॥ जातां विलंब न लागेची ॥ ४६ ॥
असो ते ब्राह्मणी पाहे ॥ सखेदयुक्त गृहा जाय ॥ म्हणे अहो देवा करूं काय ॥ केउता होय परिणाम ॥ ४७ ॥
येरीकडे तो शूद्री जाणा ॥ पावती जाली स्वर्ग भुवना ॥ परि कर्मभोग चुकेना ॥ पावली जनना मागुती ॥ ४८ ॥
पदरीं पुण्याचा संचयो ॥ म्हणोनि प्राप्त झाला मानव देहो ॥ वाराणसी माजी जन्म होय ॥ ब्राह्मण वर्ण लाधला ॥ ४९ ॥
पुण्य सामग्री पदरीं ॥ एका ब्राह्मणाचिया घरीं ॥ भागीरथीचीये तीरीं ॥ जन्म निर्धारी पावला ॥ ५० ॥
काशीनाथ नामाभिधान ॥ तयाचें ठेविले असे जाण ॥ दिवसेंदिवस जाला तरुण ॥ वयसा जाण अष्टवरुषी ॥ ५१ ॥
काळांतरीं ब्राह्मणी पाहे ॥ पाहोनि यात्रेचा समुदाय ॥ वाराणसी यात्रा जात आहे ॥ पातली लवलाहे काशीपुरीं ॥ ५२ ॥
करूनि तीर्थाविधि स्नान ॥ घेतलें श्रीविश्वनाथ दर्शन ॥ मग करिती जाली परिभ्रमण ॥ देवदर्शन सकळांही ॥ ५३ ॥
तव अकस्मात मार्गावरी ॥ काशिनाथ ब्रह्मचारी ॥ भेटता जाला ते अवसरी ॥ दुरोन करी नमनातें ॥ ५४ ॥
परी पूर्वओळखी कैंची इयेतें ॥ जरी पूर्वपुण्यें सामग्री त्यातें ॥ म्हणोनी स्मरता जाला ह्रदयातें ॥ उपकार तेचिया ॥ ५५ ॥
म्हणोनि येता जाला निकटीं ॥ भेटता जाला उठाउठी ॥ म्हणे सखये पडली सदृष्टी ॥ पूर्वपुण्यें करोनियां ॥ ५६ ॥
ऐसें ऐकतांची वचन ॥ येरी म्हणे तूं आहेस कवण ॥ केउती तुझी ओळखण ॥ आलासी कोठून या ठायां ॥ ५७ ॥
मग बोले ब्रह्मचारी ॥ मी तुझी सखी निर्धारी ॥ पूर्ववोळखी पूर्ण धरी ॥ घातलें करीं पुण्योदक ॥ ५८ ॥
ऐसी आठवण देतां तियेतें ॥ येरी भेटती जाली तयातें ॥ मग समूळ वृत्तांताते ॥ पुसे आदरें भामिनी ॥ ५९ ॥
येणें जालें तेची कथिलें ॥ ऐकतां मन संतोषलें ॥ म्हणे एका दिवसाचें दिधलें ॥ पुण्य वाहिलें इजलागीं ॥ ६० ॥
तितुकियानें ही तरली ॥ विमानीं वाहोनियां नेली ॥ देखत देखत उद्धरली ॥ कलह कल्लोळी पापिणी हे ॥ ६१ ॥
पुनः नरदेह लाधला ॥ वरी ब्राह्मण वर्ण चांगला ॥ तोहि गंगातटाकीं निपजला ॥ विश्वनाथ जाला कृपाळू ॥ ६२ ॥
अहो देवा काय केलें ॥ माझें सार्थक नाहीं झालें ॥ वय माझें व्यर्थची गेलें ॥ नाहीं घडलें सार्थक ॥ ६३ ॥
एका दिवसाचें उदक करीं ॥ घालितां उद्धरली नारी ॥ मी तंव आचरलें मासवरी ॥ मळमास निर्धारी व्रताते ॥ ६४ ॥
कवण पापाचा भोगवटा ॥ भोगितां न सरोचि वांटा ॥ म्हणोन पिटीतसे लल्लाटा ॥ गहिंवर मोठा दाटला ॥ ६५ ॥
अट्टहास्यें तेव्हा रडत ॥ उरशीर असे बडवित ॥ जनसमुदाय सभोंवते ॥ मिळाला तेथें पाहावया ॥ ६६ ॥
जे येती ते पुसती काय झालें ॥ येरी उत्तर नेदी बोले ॥ जन म्हणती वेड लागलें ॥ किंवा घेतलें पिशाचीं ॥ ६७ ॥
भूत केवी झडपी तयेतें ॥ ही तव झडपिली महद्‌भूतें ॥ ऐसें वर्ततां तेथें नवल ॥ अद्‍भुत वर्तलें ॥ ६८ ॥
इचा पापलेश सरला ॥ पुण्यवाटा उभा राहिला ॥ तेणें योगें अंतरीं द्रवला ॥ नाथ भोळा दिनाचा ॥ ६९ ॥
तात्काळ आणविलें विमान ॥ तीतें दिव्य देह करून ॥ देखत देखत सर्व जन ॥ नेली वाहून विमानीं ॥ ७० ॥
मग तो काशीनाथ ब्रह्मचारी ॥ सखेदयुक्त झाला अंतरीं ॥ दृढ तपश्चर्या तो करी ॥ पावला निर्धारी शिवपदा ॥ ७१ ॥
चंद्रेश्वर नामें लिंग ॥ तयानें स्थापिलें अभंग ॥ देखताती सर्वही जग ॥ वाराणसी माझी अद्यापी ॥ ७२ ॥
ऐसें हें मलमासाचे कथन ॥ त्रिवर्ग गेले उद्धरून ॥ एकी जाले जन्म दोन ॥ एकी स्वदेहानें उद्धरली ॥ ७३ ॥
ऐसें हें महिमानातें ॥ आकर्णविले श्रोतियातें ॥ यदर्थी असे संमतातें ॥ श्लोकाधार पुराणींचा ॥ ७४ ॥
विमान महदायातं दिव्यभोगसमन्वितं ॥ बहुकालं महाभोगान् भुत्तवा चैव भुवस्तले ॥ ३ ॥
काशीनाथ सुतात्वंच लब्ध्वा तत्रापिशं बहु ॥ भुक्वा देहविसृष्टौतु पुनः शंकरलोकगा ॥ ४ ॥
मलमासदिनैकस्य फलं प्राप्ता सखीकरात् ॥ काश्यांस्थास्यति सा शूद्री यावदाचंद्रतारकं ॥ ५ ॥
श्लोकभावार्थ आणुनी मनीं ॥ कथा वर्णिली महाराष्ट्र वाणी ॥ न्यूनतें पूर्ण कीजे सज्जनीं ॥ नव्हे वाणी पदरची ॥ ७५ ॥
विना आधारें सर्वथा ॥ न चालेचहो कविता ॥ केवळ नव्हे ही दंतकथा ॥ पाहावें ग्रंथार्था आदरें ॥ ७६ ॥
व्युत्पन्नता नाहीं माझें आंगीं ॥ नव्हे कुशळ कवितामार्गी ॥ काळकर्मणेस्तव जगीं ॥ वाढविला प्रसर पैं हा ॥ ७७ ॥
मानेल तरी स्वीकारी जे ॥ न माने तरी त्यागिजे ॥ पुढें कथेतें अवधान दीजे ॥ म्हणे दासानुदास संतांचा ॥ ७८ ॥
स्वस्ति श्रीमलमास माहात्म्य ग्रंथ ॥ पद्मपुराणींचें संमत ॥ मनोहरसुत विरचित ॥ नवमोध्याय गोड हा ॥ अध्याय ९ ॥ ओव्या ॥ ७८ ॥ श्लोक ५ ॥
 
॥ इति नवमोध्यायः ॥