शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. अधिकमास
Written By
Last Updated : शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020 (14:42 IST)

अधिकमास माहात्म्य अध्याय चौथा

श्रीगणेशाय नमः ॥ जय अयोध्यावासी श्रीरामा ॥ चराचराच्या फलांकितद्रुमा ॥ सदासर्वदा तव नामी प्रेमा ॥ दे नाम महिमा पतिता पै ॥ १ ॥
तोडुनियां भवपाश बंधन ॥ अखंड घडो मज भजन ॥ हेंचि देई कृपादान ॥ वरदानें आपुलिया ॥ २ ॥
आतां ऐका श्रोतेजन ॥ मलमहात्म आख्यान ॥ जें आचरलिया घडे पुण्य ॥ करा श्रवण भावार्थे ॥ ३ ॥
श्रवण केलिया सतत ॥ व्रताचें फळ होय प्राप्त ॥ दान पुण्य न घडे जरी तप ॥ तरीं घ्यावें माप श्रवणपंथी ॥ ४ ॥
या मलमासाचे ठायीं जाण ॥ करावें गोब्राह्मणसेवन ॥ म्हणोन लक्ष्मीप्रती नारायण ॥ करी कथन तेचि ऐका ॥ ५ ॥
यत्पुरा भवताप्रोक्त पूजनं ब्राह्मणस्यच ॥ मलमासे प्रकर्तव्यं नरैः स्वर्गेप्सुभिः सदा ॥ १ ॥
कीं दृशो ब्राह्मणः प्रोक्तः कथं पूजोमलिम्लुचे ॥ किं फलं लभते मर्त्यः पूजनाच्च द्विजन्मनः ॥ २ ॥
श्रीरुवाच ॥ लक्षणं ब्रूहि विप्राणां देवाधीनां सुरेश्वर ॥ कथं संज्ञायते नाथ एतदेवोच्यतां मम ॥ ३ ॥
जया इच्छा वाटे अंत:करणीं ॥ पापाची झाली पाहिजे धुणी ॥ तरी पूजावें ब्राह्मणालागुनी ॥ अगत्य करूनि मलमास ॥ ६ ॥
तरीं ते ब्राह्मण असावे कैसे ॥ इहीं लक्षणीं जाण ऐसे ॥ ऐकतांची संशय निरसे ॥ मनीं ठसे प्रबोधु ॥ ७ ॥
मुख्य ब्राह्मणाचें लक्षण ॥ करावें षट्‍कर्माचरण ॥ अध्ययन अध्यापन ॥ उपासन अग्नीचें ॥ ८ ॥
तपश्चर्या करावी जाण ॥ सुशीळ वरी संध्यास्नान ॥ करूनि नसावें लोलुप्तपण ॥ संतुष्ट मन असावें ॥ ९ ॥
असंतुष्ट द्विजनष्ट ॥ असंतुष्ट असलिया वरिष्ठ ॥ तरि तो न म्हणावा श्रेष्ठ ॥ ऐसें स्पष्ट वेद बोले ॥ १० ॥
म्हणोनि लक्षणयुक्त ब्राह्मण ॥ तेचि श्रेष्ठ चहुंवर्णातें जाण ॥ आतां ऐका आणिक कथन ॥ वर्तती कैसेनी ब्राह्मणाते ॥ ११ ॥
जे करिती अश्वसेवन ॥ उपर्जिती इतरा लागुन ॥ युद्धहव्यास मनीं धरून ॥ करिती सेवन नृपाचें ॥ १२ ॥
तेथें कैचें संध्यास्नान ॥ न घडे षट्‍कर्माचरण ॥ तरी तो क्षत्रिय धर्मपूर्ण ॥ तोही संपूर्ण नसे पै ॥ १३ ॥
अश्व उपर्जिती निजांगें ॥ जे करिती संसार सांगें ॥ तेथेंही अश्वविक्रय आंगें ॥ न घडे सांग तयातें ॥ १४ ॥
म्हणोन क्षत्रिय धर्मी ब्राह्मण ॥ ते पूजना योग्य नव्हेती जाण ॥ आतां ऐका दुसरें लक्षण ॥ सांगतों जाण ब्राह्मणाचें ॥ १५ ॥
पशुसेवा निरंतर करून ॥ जे करिती वाणिज्य कर्माचरण ॥ धन मेळविती भाडें करून ॥ ते वैश्य जाण म्हणावे ॥ १६ ॥
त्याहीवरी रसविकय ॥ घृतमधुलवणादि पाहे ॥ घृतमधु संचय आहे ॥ तुळराशी अपार ॥ १७ ॥
नाना वस्तुजात संग्रह ॥ करून करी जो विक्रय ॥ तो वैश्यधर्मा ब्राह्मण पाहे ॥ न साहे प्रतिग्रहीं ॥ १८ ॥
ऐसें कर्म ब्राह्मण आचरतां ॥ तरि तो वैश्य बोलिजे तत्वता ॥ ब्राहणपणाची वार्ता ॥ बोलों नये जाण पां ॥ १९ ॥
पशुसेवा करून नित्य ॥ कृषिकर्मातें आचरत ॥ तेणेंच योगें संसारकृत्य ॥ चालविती निरंतर ॥ २० ॥
तेथे स्नान संध्यातें कैची ॥ अष्टौप्रहर चिंता कृषीची ॥ होय न होय तयाची ॥ करणें घडे तयातें ॥ २१ ॥
म्हणोनि ऐसे जे का ब्राह्मण ॥ ते शूद्रा ऐसे म्हणावे जाण ॥ प्रतिग्रह तया लागून ॥ न द्यावा जाण धर्मिष्टें ॥ २२ ॥
आतां परघात कर्मे करी ॥ नीच यातीची संगती धरी ॥ वाट पाडोनि वस्तु हरी ॥ जीवें मारी प्राणिया ॥ २३ ॥
चौरकर्मे करूनि जाण ॥ उदरनिर्वाह चालवी आपण ॥ दुसर्‍याचे द्रव्य अभिलाषून ॥ उपार्जन चालवी जो ॥ २४ ॥
करितां अभिलाष द्रव्याला ॥ बहुत मनीं संतोषला ॥ म्हणे आज लाभ मोठा झाला ॥ पुढें तयाला सुटका कैची ॥ २५ ॥
ऐसा न करी जो विचारातें ॥ आणि अन्योन्य कर्मी प्रवर्ते ॥ भक्षाभक्षणेंचित्तें ॥ कृतघ्नता सदा वसे ॥ २६ ॥
नाहीं संध्या नाहीं स्नान ॥ नाहीं पितरांचें तर्पण ॥ तेथें कैचा धर्म आणि दान ॥ पर्वकाळ धर्म तोही नेणें ॥ २७ ॥
पापद्रव्य सांचलें साची ॥ सेवा करी नित्य कुटुंबाची ॥ परी नेणें स्वधर्माची ॥ नित्य पापाची वासना ॥ २८ ॥
नित्य अनित्य क्रिया पाहीं ॥ ठाऊकें नसे जया ह्रदयीं ॥ तरी तो ब्राह्मण ऐसा पाही ॥ द्विपाद पशु बोलिजें ॥ २९ ॥
जो ब्राह्मणांचें ऋण घेउनी ॥ पुन: न देत तया परतुनी ॥ मोठा लाभ झाला म्हणोनी ॥ निज मनीं हर्षित ॥ ३० ॥
तरी ब्रह्मस्वहरणा ऐसें पाहीं ॥ मारक विष दुसरें नाहीं ॥ नेऊन घाली अपायीं ॥ रवरव नरकांत पै ॥ ३१ ॥
आधींच ब्रह्मस्व मारक ॥ त्याहीवरी कृतघ्न मारक देख ॥ द्रव्यावरी जो सदा आसक्त ॥ पोट न खाय अन्नातें ॥ ३२ ॥
ऐशियाचें ऋण घेउनी ॥ जो न देई मागुत्यानीं ॥ तरी तो पचे नरकभुवनीं ॥ परी सुटका तया लागुनी असेना ॥ ३३ ॥
येचविषयीं इतिहास ॥ ऐक होऊनी सावकाश ॥ पुराणांतरीं संमतास ॥ पाहावें बरें आदरें ॥ ३४ ॥
ऋण वैर आणि हत्त्या ॥ हें तो न चुके सर्वथा ॥ म्हणोन दृष्टांतासी कथा ॥ आकर्णवूं बरी ॥ ३५ ॥
कोणे एके देशीचा ब्राह्मण ॥ क्षत्रियधर्मी परम निपुण ॥ अश्वावरी आरूढोन ॥ विदेशा लागुनी तो गेला ॥ ३६ ॥
घरीं कुटुंब असे सर्वही ॥ परी धनाशा धरून जीवीं ॥ वरी शूरत्वाची उर्मी पाहीं ॥ आंगीं बैसे तयाच्या ॥ ३७ ॥
म्हणोनि पातला विदेशा ॥ धनालागीं चालिली वयसा ॥ वर्षे क्रमिलीं द्वादशा ॥ द्रव्य आशा बहुतची ॥ ३८ ॥
धनाशा धरूनि बहुत ॥ उपार्जिता जाला नृपनाथ ॥ धन मेळविले बहुत ॥ ऐका गणती तयाची ॥ ३९ ॥
सुवर्णनाणें सातशत ॥ द्रव्य जालेंसे निभ्रांत ॥ मग मनीं उपजला हेत ॥ गृह आशा चित्तांत उद्भवली ॥ ४० ॥
निरोप घेऊन माघारी ॥ परतता जाला निजमंदिरीं ॥ तंव मार्गी काय झाली परी ॥ तेचि निर्धारीं ऐकिजे ॥ ४१ ॥
दूरदेशी विदेश पंथ ॥ मार्ग क्रमी दिवस बहुत ॥ येत येतां एका मार्गात ॥ स्नानातें उतरे मध्यान्हीं ॥ ४२ ॥
वारू उभा करून तेथ ॥ वस्त्रें फेडून समस्त ॥ एकझरा उपसोनि तेथ ॥ स्नान करीत बैसला ॥ ४३ ॥
स्नानसंध्या वरचेंवरी ॥ करून सोडिली सिदोरी ॥ तांबुल घेऊन वरचेवरी ॥ परीधान करी लगबगें ॥ ४४ ॥
लगबग झाली जाण्याची ॥ मनीं आस उद्‌भवली कुटुंबाची ॥ म्हणे आजच भेट घेऊं तयेची ॥ परी गाठोडी धनाची विसरला ॥ ४५ ॥
बैसोन अश्वावर पाहीं ॥ निघता झाला लवलाहीं ॥ द्रव्य आठवून तयाचे ह्रदयीं ॥ हर्षे पाही विसरला ॥ ४६ ॥
तंव तो गेलिया मागे जाण ॥ एक पांथिक बैसला येऊन ॥ तयाने निरखितां ठिकाण ॥ सांपडलें धन अनायासे ॥ ४७ ॥
मग उठोनि अति तांतडी ॥ निघता झाला लवडसवडी ॥ म्हणे पुढे करावी परवडी ॥ स्नान आणि उपहारु ॥ ४८ ॥
म्हणोन तो पंथ क्रमित ॥ तंव आणिक एक शूद्र तेथ ॥ येऊनियां बैसत ॥ सिदोरि सोडीत भक्षावया ॥ ४९ ॥
इकडे मार्गी जातां अश्वावरी ॥ स्मरण करितो अंतरी ॥ तंव द्रव्य न दिसे पदरीं ॥ विसर निर्धारी मज जाला ॥ ५० ॥
म्हणोन तैसाची अश्व पिटित ॥ येता झाला पूर्वस्थळाते ॥ जेथे केलें असे स्नानातें ॥ आला तेथे लगबगे ॥ ५१ ॥
तो तेथे शूद्र असे बैसला ॥ पाहून तयाते बोलता झाला ॥ तुम्हीं येथे केधवां आलां ॥ ते आम्हाला सांगिजे ॥ ५२ ॥
तंव शूद्र बोले ते समयीं ॥ क्षण एक अवकाश जाला पाहीं ॥ मग तो म्हणे या ठायीं ॥ धन तुज सापडलें पै माझें ॥ ५३ ॥
शूद्र म्हणे मी नेणे सर्वथा ॥ तुझा द्रव्यार्थ केउता ॥ येरु वदे शत साता ॥ द्रव्यार्थ माझें सुवर्ण ॥ ५४ ॥
तें तुवां अभिलाषिलें ॥ माझें मज देतां भलें ॥ नाहीं तरी जासी वधिले ॥ मज हस्तें पापिष्टा ॥ ५५ ॥
येरु आण वाहे ते समयीं ॥ मग म्हणे माझा झाडा घेई ॥ महापुरुषा तूं कवणे ठायीं ॥ विसरलासी धनातें ॥ ५६ ॥
ऐसा कलह उभयतां ॥ होत असे हो तत्वतां ॥ शूद्राजवळी न देखे तत्वता ॥ मग प्रवर्तला घाता तयाचिये ॥ ५७ ॥
मग तयातें म्हणे ते वेळे ॥ बरें झालें तें बरें झालें ॥ परी मी स्वसंतोषें आपुलें ॥ अर्धभाग देतों तूंतें ॥ ५८ ॥
अरे माझी द्वादश वर्षाची कमाई ॥ तूं अभिलाषूं नको या ठायीं ॥ येरू आण वाहोनि म्हणे नाहीं ॥ नेत्रीं पाहीं देखिलीं म्यां ॥ ५९ ॥
मग सक्रोध होऊन अंतर ॥ वस्त्रें पुसूनि खड्‍गधार ॥ तात्काळ तयाचें शरीर ॥ छेदिता झाला पै ॥ ६० ॥
क्षतें क्षीण होऊनि अंतरी ॥ म्हणें आता केउता जावें घरीं ॥ मुख स्वकुटुंबातें केवी दाऊं तरी ॥ म्हणोन माघारीं मुरडला ॥ ६१ ॥
इतुका वृत्तांत येथें झाला ॥ पहा लाभ कवणाला कवण मेला ॥ ऐसी ते असे विचित्र लीळा ॥ पुढें कथेला अवधान द्यावें ॥ ६२ ॥
अंतरिक्ष जातां नारदमुनी ॥ इतुका वृत्तांत देखिला नयनीं ॥ मग तैसाच वैकुंठा लागुनी ॥ त्वरें करूनि पातला ॥ ६३ ॥
भावें नमिला देवराणा ॥ इहीं मस्तक ठेविला चरणा ॥ पुसते जाले आगमना ॥ कोठुनी येणें पै झालें ॥ ६४ ॥
नारद म्हणे हो घननीळा ॥ फिरत फिरत आलों भूतळा ॥ परी तेथें देखिजे लीळा ॥ ती दयाळा अवधारीं ॥ ६५ ॥
मग सविस्तर कथन ॥ जालें तें कथी ब्रह्मनंदन ॥ म्हणे लाभ कवणा लागुन ॥ आणि मरण कवण पावला ॥ ६६ ॥
ऐसि अन्यायाची परवडी ॥ तूं निरखिसी कीं आवडी ॥ हे जगामाजी तुझी प्रौढी ॥ बरी न दिसे गोविंदा ॥ ६७ ॥
तूं तव त्रैलोक्याचा नाथ ॥ हा अन्याय नसे अवगत ॥ ही तव करणी अद्‍भुत ॥ बरी न दिसे तुजलागीं ॥ ६८ ॥
ऐकूनिया मुनीचे वचना ॥ हांसें आलें जनार्दना ॥ म्हणे हा अपराध मातें जाणा ॥ न लावावा दयानिधे ॥ ६९ ॥
हे तो ज्याची करणी जैशी ॥ भोगिती जाण हो तैसी ॥ तें दूषण ठेवितां आम्हासी ॥ जाणून होसी अज्ञान ॥ ७० ॥
आतां ऐकिजे कथन ॥ ऋण आणि हत्त्या जाण ॥ न चुके कवणालागून तेंचि कारण अवधारीं ॥ ७१ ॥
जयातें प्राप्त झालें जें धन ॥ तो पूर्वी होता सधन ॥ तयापासूनी घेतलें धन ॥ मेला शूद्र तेणें पै ॥ ७२ ॥
जयानें मारिलें शूद्रासीं ॥ तो जामिन जाला होता त्यासीं ॥ वायदा भरतां दिवसादिवसीं ॥ नेदि द्रव्यासी मागतां ॥ ७३ ॥
मग त्या सावकारें तगादा ॥ जामिनामागें लाविला सदां ॥ येरू पेटलासें द्वंदा ॥ परी तो नुसधा नायके ॥ ७४ ॥
मग देण्याची काळजी भारी ॥ न सोसेची निधारी ॥ म्हणोन पोटीं घातली सुरी ॥ प्राण निर्धारी तेणें दिधला ॥ ७५॥
आतां जो होता सावकार ॥ तोची द्रव्य घेऊन गेला समग्र ॥ ज्याचें गेलें तो होता जामीन थोर ॥ म्हणोन प्रकार हा जाला ॥ ७६ ॥
आपली जामिनगत उगवून ॥ शेखीं त्याचाही घेतला प्राण ॥ पूर्वी त्याचे घरीं सुरी घेऊन ॥ दिधला होता प्राण पैं तेणें ॥ ७७ ॥
तोचि अंतरीं साधून वैर ॥ खड्‍गें तोडिलें तयाचें शीर ॥ हा तंव बोल कवणावर ॥ सांगा मुनि निर्धारें ॥ ७८ ॥
ऐकून विष्णुमुखीची वाणी ॥ तटस्थ जाला नारदमुनी ॥ मग नमस्कार करूनी ॥ ऊर्ध्वपंथें तो गेला ॥ ७९ ॥
ऐसी हे दृष्टांतीं कथा बरवी ॥ श्रोतियातें निवेदिली आघवी ॥ यालागीं जीवीं गोष्टी धरावी ॥ सरती करावी वचनीं हे ॥ ८० ॥
आदौ ब्राह्मणाचें घेऊं नये ऋण ॥ घेतलिया न ठेविजे जाण ॥ तें तो अपायाचें कारण ॥ होय नि:संतान पै तेणें ॥ ८१ ॥
असो आतां हें मागील कथन ॥ आठव देतों तुह्मांलागून ॥ मागें निवेदिला ब्राह्मणधर्म जान ॥ सर्व जनीं परिसिला ॥ ८२ ॥
तरि म्हणाल कैसें कथन ॥ परिसीजे व्यास वचन ॥ माझें पदरींचे न होती जाण ॥ श्लोकी जाण पुराणींचे ॥ ८३ ॥
अश्ववाहनतत्वज्ञः संग्रामे नचभीः क्वचित ॥ आरंभे नीतिमान् शूरःक्षत्रियोसौ प्रकीर्तितः ॥ ४ ॥
लोहकर्मणिः निष्णातः पशूनां परिपालकः ॥ कृषिवाणिज्यकर्ताच सविप्रो वैश्य उच्यते ॥ ५ ॥
स्नेहलाक्षातिलानीली क्षारंक्षीरघृतंमधु ॥ मद्यादि विक्रयीविप्रः सशूद्रः परिकीर्तितः ॥ ६ ॥
भक्ष्याभक्ष्य समोयस्तु समोदारान्ययोरपि ॥ कृत्याकृत्यं न जानाति कृतघ्नो ब्राह्मणः पशुः ॥ ७ ॥
ऐसिया श्लोकाधारें करून ॥ केलें ब्राह्मण धर्माचे निरोपण ॥ म्हणोनी न ठेवा जी दूषण ॥ मजलागूनी स्वामियां ॥ ८४ ॥
ग्रंथगर्भी असे भाव जैसा ॥ तरी वदावा लागे मग तैसा ॥ तरीं ब्राह्मण पाहिजे कैसा ॥ तेही दशा अवधारीं ॥ ८५ ॥
श्रीविष्णु रुवाच ॥ मिताश्यध्यापकश्चैव संतुष्टोविजितेंद्रियः ॥ वेदशास्त्रार्थतत्वज्ञो विप्रोदेवः प्रकीर्तितः ॥ ८ ॥
अकष्ट फलमूलाशी वनवासरतः सदा ॥ कुरुतेहरहः कर्म सविप्रऋषिरुच्यते ॥ ९ ॥
पुराणकथको विप्रो व्यासरूपीहरिः स्वयं ॥ तद्भक्तिं कुर्वतांनृणा गंगास्न नं दिने दिने ॥ १० ॥
इहीं लक्षणीं पाचारूनि ब्राह्मण ॥ तयाची पूजा अगत्य करून ॥ मग यथानुशक्त्या द्यावें दान ॥ अपूपान्नकृतेसी ॥ ८६ ॥
घृतशर्करायुक्त पाहीं ॥ तीन दशक वरी तीनही ॥ दक्षिणेसहीत बरवीं ॥ घृतयुक्त तै दीजे ॥ ८७ ॥
वापीकूप सरोवर जीवन ॥ तेथें करावया प्रात:स्नान ॥ ऐसें मासवरी करितां जाण ॥ घडे पुण्य तें ऐका ॥ ८८ ॥
एव ज्ञात्वानरैः सेव्यः पुराणज्ञो मलिम्लुचे ॥ प्रयागादधिकं पुण्यं तस्य विप्रस्य सेवनात् ॥ ११ ॥
गंगा-यमुना सरस्वती पाही ॥ तें प्रयाग स्नान घडे देहीं ॥ वरी ब्राह्मणपूजा बरवी ॥ स्नेहें करावी आदरें ॥ ८९ ॥
तेणें पुण्यें करूनि जाण ॥ होय पापमळाचें क्षाळण ॥ अपमृत्यु गंडातर दूर होऊन ॥ वैकुंठभुवन तो पावे ॥ ९० ॥
राजा हो अथवा रंक ॥ सर्वास लाभ समान देख ॥ यदर्थी संशय आणिक ॥ न धरावा देख मानसीं ॥ ९१ ।
काळें करूनि तीर्थाचें फळ ॥ शरीर शक्ति यात्रा सफळ ॥ द्रव्यशक्ति यज्ञाचें फळ ॥ सेवा फळ ब्राह्मणाची ॥ ९२ ॥
ब्राह्मण सेवा फळे तत्काळ ॥ आतृप्त भोजन घालितां सकळ ॥ आशीर्वाद देती सुफळ ॥ तोचि फळे भाविका ॥ ९३ ॥
म्हणोनि देवाचें मुख ॥ ते ब्राह्मण जाणिजे देख ॥ यालागीं सेवा अधिक ॥ मासामाजी निर्धारें ॥ ९४ ॥
क्वचित् वेदमंत्रोच्चारी ॥ क्वचित् पुराणज्ञ जरी ॥ तरीं घेतला शास्त्राधारीं ॥ दानाधिकारी असे तो ॥ ९५ ॥
ऐसा इतिहास बरवा ॥ निवेदिला तुम्हां सर्वा ॥ येथें संशयो न धरावा ॥ शास्त्रीं घ्यावा प्रत्ययो ॥ ९६ ॥
स्वस्तिश्री अधिक माहात्म्य ॥ ब्रह्मांड पुराण समंत ॥ मनोहरसुत विरचित ॥ चतुर्थोऽध्याय गोड हा ॥ ९७ ॥
ओवी संख्या ९७ ॥ श्लोक ११ ॥
 
॥ इति चतुर्थोध्यायः ॥