बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. अधिकमास
Written By
Last Updated : शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020 (14:42 IST)

अधिकमास माहात्म्य अध्याय तिसरा

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ जयजयाजी रघुराया ॥ नमन माझे तुमच्या पायां ॥ करुणा करावी सखया ॥ करा छाया कृपेची ॥ १ ॥
तुमचे कटाक्षें करून ॥ निरसो माझें भव अज्ञान ॥ स्वरूपीं लागो अनुसंधान ॥ हेंचि कृपादान मज द्यावें ॥ २ ॥
मी बुडतों या भवसागरीं ॥ येथूनि मातें काढीं सत्वरी ॥ पुढें जें होणें असेल परी ॥ ते सुखें श्रीहरी होऊ कां ॥ ३ ॥
तरणोपाय तें साधन ॥ मीं तव नेणें आणीक जाण ॥ परी तव चरणीं ठेवूनि मन ॥ आरंभिली हे काळक्रमणा ॥ ४ ॥
श्रोती होऊनि सादर ॥ श्रवण कीजे कथाप्रसर ॥ नूतन कथा म्हणूनि अव्हेर ॥ न कीजे स्वामिया ॥ ५ ॥
नूतन हे पद्यरचना ॥ कथा भाग पूर्वील जाणा ॥ समंत घेतलें पद्मपुराणा ॥ श्लोक जाणा तेथीचे ॥ ६ ॥
नारायण उवाच ॥ न कृशांमृतवत्सां वा वंध्यां रोगान्वितां तथा ॥ न च व्यंगामतिश्रांतां गां दद्यान् ब्राह्मणाय वै ॥ १ ॥
ऐक लक्ष्मी सावधान ॥ मागे निरोपिलें गोदान ॥ परीं तें पाहिजे सुलक्षण ॥ अलक्षण नसावें ॥ ७ ॥
असावी सुंदर पौष्टिक ॥ आणि वरी सवत्सक ॥ दुग्धीं जेवीं बलाहक ॥ वर्षेतोय अपार ॥ ८ ॥
रोड अथवा रोगिष्ट ॥ मृत वत्स नसावें स्पष्ट ॥ किंवा वंध्या असोनि वरिष्ट ॥ कामा नये दानातें ॥ ९ ॥
अथवा रोगी व्याप्त शरीरीं ॥ दुग्ध न देती तिळभरी ॥ ऐसी धेनु दानातें निर्धारी ॥ योग्य सुंदरी नसे पै ॥ १० ॥
लातरी खैरींडी वरी ॥ एकश्रृंगी नसावी तरी ॥ आपुलें पय आपण प्राशन करी ॥ पान्हा चोरी दोहितां ॥ ११ ॥
ऐसियाचें न कीजे दान ॥ दान केलिया कवण पुण्य ॥ जैसे अजागळींचे स्तन ॥ दुग्ध ना शोणित कांहीं ॥ १२ ॥
लक्षणयुक्त धेनु बरवी ॥ सहकुटुंबी ब्राह्मणातें द्यावी ॥ अलंकारयुक्त असावी ॥ दोहनपात्रासहित ॥ १३ ॥
ऐसी दिधलिया दान ॥ तेणें संतोषे जनार्दन ॥ मग ते पावती मोक्षसदन ॥ यासीं संदेह जाण असेना ॥ १४ ॥
अपात्रीं केलिया दान ॥ तरी तें नरकासी कारण ॥ म्हणोनी सत्पात्री ब्राह्मण ॥ पाहोनि दान पैं द्यावें ॥ १५ ॥
बहुक्षीरां च यो गां वै ब्राह्मणायोपपादयेत् ॥ उत्तारयेत्सचात्मानं सप्तसप्त कुलानिच ॥ २ ॥
धेनू ते बहुत दुग्धाची ॥ सुलक्षणीक सवत्साची ॥ दान दिधलिया ऐशाची ॥ तरी पदवीं साची पावेतो ॥ १६ ॥
तयाचा जन्म सफळ झाला ॥ आणी सप्तकुळांचा उद्धार केला ॥ इतर दीन पुरुषाला ॥ दान तयाला घडेना ॥ १७ ॥
म्हणोनियां मलमासी जाण ॥ अगत्य कीजे गोदान ॥ नारी अथवा पुरुष जाण ॥ भाग समान उभयासीं ॥ १८ ॥
गावो यज्ञस्य नेत्रे वै गावोयज्ञस्य वै मुखं ॥ अमृतंह्य क्षयं दिव्यं क्षीरं गावोवहंतिच ॥ ३ ॥
अहो हे धेनू यज्ञाचे नेत्र ॥ आणि यज्ञमुख स्वतंत्र ॥ वरुषे अमृत क्षीरमात्र ॥ जें दुर्लभ सुरातें ॥ १९ ॥
इंद्रादी सुरवर पाहीं ॥ म्हणती अमृत असे पाहीं ॥ परी क्षीर आम्हांतें प्राप्त नाहीं ॥ जें भूलोकी अपार ॥ २० ॥
म्हणोनि समग्र सुरवर ॥ धेनुगात्री प्रवेशले साचार ॥ आणि सरिता अपार ॥ प्रवेशल्या धेनु आंगीं ॥ २१ ॥
यदर्थी श्लोक संमतीचा ॥ असे हो ग्रंथांतरीचा ॥ तोची निवेदितों साचा ॥ अर्थ तयाचा पाहावा ॥ २२ ॥
श्रृंगमूले गवां नित्यं ब्रह्माविष्णु समाश्रितौ ॥ श्रृंगाग्रे सर्वतीर्थानि स्थावराणि चराणिच ॥ ४ ॥
तव आशंका घेऊन सत्वर ॥ श्रोतीं बोलिलें उत्तर ॥ सर्वगात्री सुरवरा ॥ किंकारण प्रवेश ॥ २३ ॥
यदर्थी इतिहास बरवा ॥ श्रोतीं एकचित्तें परिसावा ॥ जो ऐकता सर्व जीवा ॥ संशय फिटे अनायासें ॥ २४ ॥
तरी पौलव्यनामें ऋषीश्वर ॥ तपोबळें मुनिवर ॥ कष्टविलें जें स्वशरीर ॥ तप अपार आचरला ॥ २५ ॥
तयाचि तपसामर्थ्ये ॥ भय उपजले वासवातें ॥ मग प्रेरिता झाला अप्सरातें ॥ तपक्षयातें ऋषीच्या ॥ २६ ॥
अप्सरा म्हणती अमरेशा ॥ तपातें क्षय कीजे कैसा ॥ परम कोपिष्ट ऋषी राजसा ॥ देखतां आम्हा शापील ॥ २७ ॥
तंव आज्ञा देतसे इंद्र ॥ आतां तुम्हीं जावें सत्वर ॥ पुढें असेल जें होणार ॥ तें तें सुखें होऊ कां ॥ २८ ॥
इंद्राचा हा स्वाभाविक गुण ॥ तपातें क्षय करावा जाण ॥ हें पूर्वापार लक्षण ॥ वासवा आंगीं असे पैं ॥ २९ ॥
असो आज्ञा घेऊन अप्सरा ॥ येत्या जाल्या त्या अवसरा ॥ निवास जेथें ऋषीवरा ॥ महाराज पौलव्यातें ॥ ३० ॥
येऊनियां आश्रमानिकटीं ॥ ऋषीतें अवलोकिलें दृष्टीं ॥ तंव तो तपस्वी महाहटी ॥ तपश्चर्ये बसला असे ॥ ३१ ॥
तंव त्या देवांगना जाणा ॥ अवलोकुनि ऋषीराणा ॥ चमकत चमकत सन्निधाना ॥ हास्यवदन अवलोकिलें ॥ ३२ ॥
ध्यान विसर्जुनि मुनी ॥ तयातें देखिले नयनीं ॥ मग पुसे तयालागुनी ॥ किमर्थ कहर मांडिला ॥ ३३ ॥
आम्हीं न मागों कवणातें कांहीं ॥ हा किमर्थ पेटला आमुचे डाई ॥ म्हणोन क्रोधयुक्त तें समई ॥ शाप द्यावया उदित ॥ ३४ ॥
शापोदक करी घेउनी ॥ आव्हानिलें वासवालागुनी ॥ तों येरीकडे काय झाली करणी ॥ इंद्रभुवनी पैं तेव्हां ॥ ३५ ॥
सिंहासनावरी वासवो ॥ तंव खळबळिला तयाचा देहो ॥ चंचळ होताची पहा हो ॥ सभोंवतें अवलोकित ॥ ३६ ॥
शापोदकाचे सामर्थ्य मोठें ॥ इंद्राचें आंगीं उठले कांटे ॥ मग पिशाचवत पळतसें नेटें ॥ जेथें असे कमळासन ॥ ३७ ॥
घाबरेपणीं ते समयीं ॥ ब्रह्मयाचे पदीं मस्तक ठेवी ॥ म्हणे आतां रक्षीये समयीं ॥ करुणा करा दातारा ॥ ३८ ॥
कमळासन म्हणे तेव्हां ॥ अपराध घडला वासवा ॥ तो साकल्प आम्हां निवेदावा ॥ म्हणजे उपाव सुचेल ॥ ३९ ॥
तंव बोले सुरेश्वर ॥ पौलव्य ऋषी तपें थोर ॥ तया छळणा सत्वर ॥ देवांगना प्रेरिल्या मी ॥ ४० ॥
इतका इकडे वृत्तांत झाला ॥ तिकडे ऋषीतें विलंब लागला ॥ म्हणे अजुन इंद्र का नाहीं आला ॥ किमर्थ लागला विलंब ॥ ४१ ॥
काय माझी झाली तपहानी ॥ मलीनता जाली तपालागुनी ॥ म्हणोन ध्यानी विचारुनी ॥ पाहातसे ॥ ४२ ॥
तंव इंद्रातें न देखे निजासनीं ॥ तो तंव गेलासे पळुनी ॥ कमळासनें आश्वासुनी ॥ निजासनीं बैसविला ॥ ४३ ॥
मग ऋषि आणिक उदक ॥ घेता जाला नि:शंक ॥ आव्हानिला कमळनायक ॥ इंद्रासहित ते काळीं ॥ ४४ ॥
तंव आसनी चंचल ब्रह्मदेव ॥ म्हणे फळला तुमचा प्रादुर्भाव ॥ आम्हांसहीत ऋषीराव आव्हानिता झाला शापातें ॥ ४५ ॥
आतां उपाव तरी कवण ॥ जवळी करावा जनार्दन ॥ मग उभयतां तेथून ॥ निघते झाले लगबगें ॥ ४६ ॥
घाबरेपणीं येऊन जाण ॥ नमिते जाले जनार्दन ॥ मग म्हणती तया लागून ॥ रक्षीं भयापासून महाराजा ॥ ४७ ॥
जयजयाजी जनार्दना ॥ जगपाळका विश्वरक्षणा ॥ हे दयानिधी करुणाघना ॥ शरणांगता वज्रपंजरु ॥ ४८ ॥
पतीतपावन हे ब्रीदावळी ॥ ती सत्य करीजे येकाळीं ॥ आम्हीं अपराधी कृपाबळी ॥ आम्हां रक्षी दातारा ॥ ४९ ॥
ऐकुनी ऐसें उत्तर ॥ बोलता जाला कमळावर ॥ कवणें केला तुम्हांतें जोजार ॥ तोचि प्रकार सांगिजे ॥ ५० ॥
तंव बोले कमळासन ॥ पौलव्यऋषी तो तपोधन ॥ तया छळावया लागुन ॥ अप्सरा वासवें पाठविल्या ॥ ५१ ॥
परमक्रोधी ऋषिसज्जन ॥ शापोदकें वासवातें पराभवून ॥ तेणें तो भयाभीत होऊनि जाण ॥ मजजवळी पातला ॥ ५२ ॥
आम्ही आश्वासिलें तत्वता ॥ तो शाप आला मज भोंवता ॥ म्हणोनिया उभयतां ॥ येतों जालों तव दर्शना ॥ ५३ ॥
आतां कळेल तैसें पाहीं ॥ आम्हा रक्षी नाना उपायीं ॥ मग बोलता जाला शेषशाई ॥ ते समयीं सुरेशातें ॥ ५४ ॥
येचविषयीं प्रथम शिकवण ॥ तुम्हांतें निवेदिलीसे जाण ॥ जे न छळावें ब्राह्मणालागून ॥ सहसा जाण सुरेशा ॥ ५५ ॥
ब्रह्मशापें करूनियां ॥ तंव संपत्ति गेली विलया ॥ मग ते सागरीं काढावया ॥ परम कष्ट मज झाले ॥ ५६ ॥
यालागीं कैसा असो ब्राह्मण ॥ परी ते माझेंची मुख जाण ॥ न कळे तयाचें विंदान ॥ कवणे घटी कैसा मी ॥ ५७ ॥
ऐसें बोलत बोलत ॥ क्षण एक अवकाश लागला तेथ ॥ तों येरीकडे पौलव्य काय करित ॥ विचारित निजमानसीं ॥ ५८ ॥
म्हणे अद्याप वरि पाही ॥ उभयतां तें न देखो येकेठायीं ॥ म्हणोन पेटलासे तोडाई ॥ उदक आणिक घेतलें ॥ ५९ ॥
विष्णुसहीत ब्रह्मदेवो ॥ आव्हानिता जाला वासवो ॥ तंव वैकुंठीं देवाधिदेवो ॥ घाबरा झाला निजांगीं ॥ ६० ॥
म्हणें ऋषीचिया भया ॥ आलेत तुम्हीं लपावया ॥ परि संग दोष पाहिया ॥ आम्हां भोंवला तात्काळ ॥ ६१ ॥
मजसहीत तुम्ही दोघे ॥ ऋषीनें उदक घेतले रागें ॥ म्हणोन उठला लागवेगें ॥ कैलासमार्गे पळाला ॥ ६२ ॥
पुढें पळतसे जनार्दन ॥ मागें धापें दाटलें दोघेजण ॥ बापशापाचें भय दारुण ॥ वाहे भगवान स्वआंगें ॥ ६३ ॥
ब्राह्मण शाप परम द्वाड ॥ राजा नहुष केला सरड ॥ नारदाची नारदी लज्जेआड ॥ लपत हिंडे चहूंकडे ॥ ६४ ॥
ऐसे सांगो आतां किती ॥ कथा परिसवू पुढती । ऐसें पळतां त्रिवर्गाप्रती ॥ कैलासपती आटोपिला ॥ ६५ ॥
जोडुनिया करपुटी ॥ नमिते जाले धूर्जटी ॥ वाचा जालीसे हिंपुटी ॥ बोलता ओठी शब्द न ये ॥ ६६ ॥
तव बोले शूळपाणी ॥ किमर्थ आगमन ये स्थानीं ॥ आकर्णूनी ऐसी वाणी ॥ हसुनी बोले माधव ॥ ६७ ॥
मग आद्यंत वर्तमान ॥ निवेदिता झाला जनार्दन ॥ वासवें केलें विघ्न दारुण ॥ आलो धावून या ठायां ॥ ६८ ॥
ऐसे लाघवी याचे शब्द ॥ ऐकूनी हासे वृषभध्वज ॥ उभयतांचें अंतर सहज ॥ एक म्हणोनी ॥ ६९ ॥
आसनें देऊन तिघांसीं ॥ बैसविलें आपणापाशीं ॥ तों येरिकडें काय करी तपोराशी ॥ पौलव्य तो ऋषीराणा ॥ ७० ॥
ध्यानीं विचारी जों मुनी ॥ तंव तिघे न दिसती स्वस्थानीं ॥ शापभयें गेले पळुनीं ॥ लपाले लपनीं कैलासी ॥ ७१ ॥
मग शिवासहित ऋषेश्वरीं ॥ आणीक उदक घेतलें करीं ॥ आव्हानितांच त्रिपुरारी ॥ गेला चांचरी निजासनीं ॥ ७२ ॥
चंचळ देखुनी सदाशिवा ॥ गुंडाळिला भस्मबटवा ॥ हें देखुनी रमाधवा ॥ हास्य तेधवां नाटोपे ॥ ७३ ॥
मग म्हणेजी खट्‌वांगपाणी ॥ हे काय आरंभिली करणी ॥ गार्‍हाणें सांगावया या स्थानीं ॥ आलों धांवुनी महाराजा ॥ ७४ ॥
तुमची तों दिसे ऐसी गती ॥ आतां जावें कवणाप्रती ॥ कवण निवारील यातायाती ॥ म्हणोन चित्ती संदेहो ॥ ७५ ॥
तंव बोले सदाशिव ॥ तुमचा कळला भाव ॥ टाकूनी जावे हा ठाव ॥ ऐसें वाटे मजलागीं ॥ ७६ ॥
मग सखेद होऊन अंतरीं ॥ बोलता जाला मुरारी ॥ पुढें कैसी की जे परी ॥ हें अंतरीं विचारावें ॥ ७७ ॥
शिव म्हणे माधवासीं ॥ विचार न सुचे मानसीं ॥ कांकीं ते दोघेही एकमेकांसीं ॥ अंतरसाक्षी म्हणोनी ॥ ७८ ॥
वाढवावया ब्राह्मणांचे महिमान ॥ म्हणोनि मांडिलें हें निर्वाण ॥ पुढील जाणोनी कारण ॥ महिमान गौतमीचें ॥ ७९ ॥
मग विष्णु विचारून अंतरी ॥ म्हणे ऐकिजे हो त्रिपुरारी ॥ ब्राह्मणाचा उपाय निर्धारी ॥ धेनूवरी चालेना ॥ ८० ॥
तरी पाचारूनी धेनूलागीं ॥ आपण प्रवेशुं तिचे आंगीं ॥ पुढें होईल त्याप्रसंगीं ॥ विलोकुं आंगीं सादर ॥ ८१ ॥
विचार मानला सर्वांते ॥ मग पाचारिलें धेनूतें ॥ संकटी रक्षी आम्हांतें ॥ म्हणोनि बोलते पै जाले ॥ ८२ ॥
तथास्तु म्हणोन पाहीं ॥ धेनू वदली ते समयीं ॥ मग प्रवेश करिते जाले देहीं ॥ ऐका सर्वही श्लोकार्थ ॥ ८३ ॥
श्रृंगमूले गवानित्यं ब्रह्माविष्णुसमाश्रितौ ॥ श्रृंगाग्रे सर्वतीर्थानि स्थावराणि चराणिच ॥ ५ ॥
शिरोमध्ये महादेवः सर्वभूतमयस्थितः ॥ ललाटाग्रे स्थितादेवी नासावंशेच षण्मुखः ॥ ६ ॥
कर्णयोरश्विनौ चैव चक्षुषोःशशिभास्करौ ॥ दंतेषुवायवः सर्वे जिव्हायां वरुणस्थितः ॥ ७ ॥
सरस्वतीच हुंकारे यमयक्षौच गंडयोः ॥ संध्याद्वयंतथोष्ठाभ्यां ग्रीवायामिंद्रसंस्तितः ॥ ८ ॥
साक्षद्वंगाचगोमूत्रं गोमये यमुनास्थिता ॥ त्रयस्त्रिंशत्तु देवानां कोट्योरोम सुसंस्थिताः ॥ ९ ॥
ऐशिया परी सर्व देव ॥ तेतीस कोटीसहित वासव ॥ गंगायमुनादी सर्व ॥ वास सर्व करिते झाले ॥ ८४ ॥
तै पासुनी धेनू आंगीं ॥ वास असेहो नवांगीं ॥ पुढें वर्तलिया प्रसंगीं ॥ अवधान दीजे ॥ ८५ ॥
येरीकडे पौलव्यमुनी ॥ आव्हानितां न देखे कोणी ॥ पुढे अवलोकी जो नयनीं ॥ तो देखे नयनीं धेनूतें ॥ ८६ ॥
अवघें निरखून धेनूतें ॥ तंव धेनु आंगीं सर्व दैवतें ॥ अवलोकितां पावला विस्मयातें ॥ म्हणे आतां कउतें करावें ॥ ८७ ॥
मग विवेक आठवून अंतरीं ॥ तया धेनूतें नमस्कारी ॥ विवेका ऐसा साहाकारी ॥ आणिक नसे क्रोधाते ॥ ८८ ॥
क्रोध आलिया शरीरीं ॥ अनर्थातें उभा करी ॥ तेथें विवेक तो आवरी ॥ निवारी जो अनर्थातें ॥ ८९ ॥
विवेक करूनि पाहाहो ॥ क्रोधें शांत केला देहो ॥ मग तया प्रसन्न महादेवो ॥ सर्व देवांसहीत पै ॥ ९० ॥
पुरवून ऋषीची मनकामना ॥ वाहून नेला वैकुंठभुवना ॥ ऐशीही कथा श्रोतेजना ॥ परिसविली जाणा शास्त्राधारें ॥ ९१ ॥
म्हणोनियां मलमासीं ॥ दान द्यावें धेनूसी ॥ स्त्री अथवा पुरुषासी ॥ लाभ उभयासीं समान ॥ ९२ ॥
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ॥ येहीं दान करावें पवित्र ॥ पाहुनि ब्राह्मण सत्पात्र ॥ यथायोग्य दान दीजे ॥९३ ॥
तया योगें पुण्यवंत देह ॥ पापाचा तो होय क्षय ॥ म्हणोनि सुलभ उपाय ॥ धेनूसेवा निवेदिली ॥ ९४ ॥
अनेन विधिना धेनुं यो विप्राय प्रयच्छति ॥ सर्वकामसमृद्धात्मा विष्णुलोके महीयते ॥ १० ॥
सर्वेषामपि पापानां ज्ञातानामविजानतं ॥ प्रायश्चित्तमिदंप्रोक्तमृषिभिस्तत्वदर्शिभि: ॥ ११ ॥
ऐसिया परी श्रोतियातें ॥ कथा निवेदिली संतातें ॥ न्यून पूर्ण जें तें क्षमामातें ॥ कृपावंतें पै कीजे ॥ ९५ ॥
माझें सरतें हें बोलणें ॥ जैसें खर्‍यामाजी खोटें नाणें ॥ मेळविती जेवी कुजनें ॥ तेवी बोलणें पै माझें ॥ ९६ ॥
व्यासोक्तवाणी खरें नाणें ॥ तोचि श्लोकार्थ अनुभवावें ॥ सरता केला प्राकृतें जाण ॥ नव्हे बोलणें पदरिंचें ॥ ९७ ॥
मी नव्हे कविता कुशळ ॥ नाहीं संकृत वाणी निर्मळ ॥ सर्वांपरि मी अमंगळ ॥ संती सांभाळ पै कीजे ॥ ९८ ॥
नाहीं उद्योग व्यवसाय कांहीं ॥ तपश्चर्या न घडेचि देहीं ॥ म्हणोन काळक्रमणें स्तव पाहीं ॥ उदेला देहीं उद्गारु ॥ ९९ ॥
परि बुद्धिदाता तो समर्थ ॥ शिरावरी माझिया रघुनाथ ॥ वदता वदविता तोचि येथ ॥ बुद्धिदाता निर्धारें ॥ १०० ॥
स्वस्ति श्रीमलमाहात्म ग्रंथ ॥ पद्मपुराणींचें संमत । मनोहरसुत विरचित ॥ तृतीयोध्याय गोड हा ॥ ओवी संख्या ॥ १०० ॥
 
॥ इति तृतीयोध्यायः ॥