मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. अधिकमास
Written By
Last Updated : शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020 (14:42 IST)

अधिकमास माहात्म्य अध्याय दुसरा

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ जय सद्‍गुरुनाथ समर्था । तुमचे चरणीं माझा माथा ॥ सदा सर्वदां राहो देई ताता ॥ ऐसा वर दाता देई कीं ॥ १ ॥
नमनीं नमन जरी करावें ॥ तरी नमनरूपी हें जग आघवें ॥ तेथें नमनाचिया नांवें ॥ शून्याकार ॥ २ ॥
शून्याकार जेथें जाला । तेथें भासची अवघा बुडाला ॥ तया भासापलीकडे ठाव स्वामिला ॥ म्हणोनि नमनाला मति नाहीं ॥ ३ ॥
तरी स्फूर्ती स्फुरे अंतरीं ॥ आणि मूर्ति ठसावी बरी ॥ जैसिया कृपेची लहरी ॥ मज दीनावरी असावी ॥ ४ ॥
चित्तीं धरिला जो नेम ॥ तो सिद्धि पावो सुगम ॥ अंतरीं वसूं दे प्रेम ॥ नेई नेम सिद्धी हा ॥ ५ ॥
असो आतां तो स्तुतिवाद ॥ वदू आतां कथानुवाद ॥ जेणें संतोषीय गोविंद ॥ स्तुतिवाद ऐकुनी ॥ ६ ॥
जैसे याचक भिकारी ॥ जाती श्रीमानाचिया द्वारीं ॥ त्याची स्तुती केलियावरी ॥ प्रसन्न अंतरीं तो होय ॥ ७ ॥
मग होऊनियां प्रसन्ना ॥ पुरवी तयाची मनकामना ॥ तेवी स्तुतिवाद्यें लक्ष्मीरमणा ॥ दासाप्रती पाळीत ॥ ८ ॥
मलमासेषु सर्वेषु स्वयंदेवो जनार्दनः ॥ तमुद्दिश्य कृतं यच्च स्वल्पं वा यदि वा बहु ॥ १ ॥
दानं होमं व्रतं स्नानं तपो ब्राह्मण भोजनं ॥ तेन लिप्तेन देहेन स याति नरकं चिरं ॥ २ ॥
मग म्हणे क्षीराब्धिशाई ॥ ऐकें हो कांचनदेही ॥ या मलमासाचे ठाई ॥ काय की जे हो लक्ष्मी ॥ ९ ॥
तरी अल्प अथवा स्वल्प ॥ कांहीं तरी कीजे दान तप ॥ होम अथवा ध्यान जप ॥ शक्तिनुसार पैं कीजे ॥ १० ॥
शक्ति असून जो न करी । तो रवरव भोगी अघोरीं ॥ यांत संदेह निर्धारी ॥ नसे सुंदरी जाण पां ॥ ११ ॥
ऐसें ऐकूनि उत्तर ॥ लक्ष्मी वदे प्रत्युत्तर ॥ हे नाथ दीनोद्धार ॥ प्रश्नाक्षर ऐकिजे ॥ १२ ॥
श्रीरुवाच ॥ निर्धनाश्चदुराचाराः परभाग्योपजीविनः ॥ नरा न किंचिञ्जानंति पशुवद्विचरांतिहि ॥ ३ ॥
विवेको नास्ति येषांवै किंकार्यतैर्मलिम्लुचे ॥ तत्सर्वं ब्रूहि मे देव यद्यहं तववल्ल्भा ॥ ४ ॥
हे स्वामी जगन्निवासा ॥ निर्धनातें उपाव कैसा ॥ दुराचारी पुण्यलेशा ॥ स्वप्नी नेणें कैसा तो ॥ १३ ॥
अविवेकी असती जे प्राणी ॥ पशुवत विचरति जनीं ॥ तया प्राणियाते कैसेनी ॥ मुक्ती घडे स्वामिराजा ॥ १४ ॥
यासीं उपाय केउता ॥ तो सांगिजे कृपावंता ॥ म्हणोन चरणीं ठेविला माथा ॥ मग अनंत बोलत ॥ १५ ॥
विष्णुरु० ॥ व्रते दाने तथा नक्ते याचिते कायशोषणे ॥ सर्वथा नास्तिसामर्थ्यं तैः कार्य द्विजसेवनं ॥ ५ ॥
साधूनां दर्शनंस्पर्शः ॥ कीर्तनं श्रवणं तथा ॥ कर्तव्यं शक्‍तिहीनैस्तु लोकांतर सुखप्रदं ॥ ६ ॥
तरी ऐक हो सुंदरी ॥ द्रव्य नसे जरी पदरी ॥ तरीं कष्टवावें शरीरीं ॥ साधुदर्शनें महालाभु ॥ १६ ॥
देवदर्शनपुराणी ॥ काया कष्टवी जे गोसेवनीं ॥ तयातें न लगे कपर्दिक दानी ॥ तपें करूनि मी तोषें ॥ १७ ॥
येच विषयीं इतिहास ॥ ऐके हो स्वस्थ मानस ॥ जयाचेनि मज संतोष ॥ तोचि प्रकार अवधारीं ॥ १८ ॥
गावः पवित्रमतुलं गावो मंगलमुच्यते ॥ गावोभूमिश्च भूतानि स्थावराणि चराणिच ॥ ७ ॥
या भुवनत्रयाचे ठायीं ॥ गौतमी ऐसै दैवत नाहीं ॥ जीणें कष्टऊनियां देहीं ॥ क्षीरवृष्टी करी जगातें ॥ १९ ॥
तरि प्रत्यही करावें पूजन ॥ न घडे तरि मळमासीं जाण ॥ मासवरी करावें पूजन ॥ तें निरुपण अवधारी ॥ २० ॥
एकमास परियंत जाण ॥ स्वयें नक्‍त करावें आपण ॥ प्रातःकाळीं करून स्नान ॥ देवतार्चन पैं कीं जें ॥ २१ ॥
मग करावें गौतमी पूजन ॥ तया येवढें नसे पुण्य ॥ घालूनि तृणधान्य ॥ भावें चरण वंदावें ॥ २२ ॥
गौपूजे लाविजे भाळीं ॥ तेणें स्नान केलें यमुनाजळीं ॥ उठोनियां प्रातःकाळीं ॥ आधी गौतमी नमावी ॥ २३ ॥
मग गौतमपुत्रा करून वंदन ॥ गोमय सडा संमार्जन ॥ तया योगें पवित्र सदन ॥ होय जाण तयाचे ॥ २४ ॥
तया घरीं लक्ष्मीनिवास ॥ ठाव नसे रोग अपमृत्यास ॥ निरंतर करी निवास ॥ सदैव यश तो लाहे ॥ २५ ॥
ऐसें गौतमीचें पूजन करून ॥ मग सुशीळ सपत्‍नीक द्विज बोलावून ॥ तयाची पूजा अर्घ्यपाद्यादी करून ॥ द्यावें दान तयाप्रती ॥ २६ ॥
सालंकारीं संयुक्‍त करून ॥ दोहनपात्र वस्त्र अलंकार जाण ॥ गळां पुष्पमाळा घालून ॥ घंटा बांधून दान द्यावें ॥ २७ ॥
तये घंटीचा होतां नाद ॥ स्वर्गी सुख पावे पितृवृंद ॥ उतरोनि वैतरणीचा कंद ॥ सुख संवाद तो करी ॥ २८ ॥
पुरुष अथवा हो का नारी ॥ उभयतां लाभाची समान परी ॥ गौतमी ऐसी पवित्र पृथ्वीवरी ॥ दैवत आन असे ना ॥ २९ ॥
गोभ्योयज्ञाः प्रवर्तते गोभ्योयज्ञाः समुत्थिताः ॥ गोभ्योवेदाः समुत्तीर्णाः स षडंगपदक्रमाः ॥ ८ ॥
तृणानिखादंतिवसंत्यरण्ये पिबंतितोयान्य परिगृहाणि ॥ दुह्यंतिवाह्यंतिपुनंति विश्वं गवांरसैर्जीवति जीवलोक: ॥ ९ ॥
स्पृष्टांश्चंगावः शमयंति पापं दत्ताश्च गावास्त्रिदिवंनयंति संरक्षिताश्चोपनयंति वित्तं गोभिर्नितुल्यं धनमस्ति किंचित् ॥ १० ॥
गौतमीवीण न होय यज्ञ ॥ गोक्षीरेंवीण न घडे हवन ॥ पंचामृतावीण न घडे पूजन ॥ श्रीविष्णु महाविष्णूचें ॥ ३० ॥
जया घरीं गौतमीचें पूजन ॥ पवित्र तयाचें सदन ॥ जेथें नसे सडासंमार्जन ॥ जाणावें सदन स्मशान तें ॥ ३१ ॥
पहा ते गौतमी परोपकारी ॥ तृण भक्षून अरण्यामाझारी ॥ स्वइच्छा जळातें प्राशन करी ॥ भार कवणावरी घालीना ॥ ३२ ॥
स्वसदनीं येऊन जाण ॥ क्षीरवृष्टी अमृत समान ॥ तेणें तृप्त होती अबलाजन ॥ ऐसी कृपाघन धेनू ती ॥ ३३ ॥
गोमयें पावन सदन ॥ अंगस्पर्शे पापक्षाळण ॥ गोमूत्रें पंचगव्यातें पवित्रपण ॥ शास्त्रीं जाण बोलिलेंसे ॥ ३४ ॥
प्रायश्चित्त घेतां जनाप्रती । देहाचे दोष दहन होती ॥ मग तें स्वसुखे नांदती ॥ प्रसादे धेनूचिया ॥ ३५ ॥
ऐसें धेनूचें करून पूजन ॥ मग ते ब्राह्मणा द्यावी दान ॥ तेणें पुनीत होती जन ॥ जगजीवन संतोषे ॥ ३६ ॥
कृपाकरून तयावरी ॥ प्राप्त करी निजपुरी ॥ न विसंबे क्षणभरी ॥ ऐसें मुरारी बोलिला ॥ ३७ ॥
ऐसें केलिया गोदान ॥ ते दिनी करावें ब्राह्मण भोजन ॥ षड्रस घृतासहित अन्न ॥ यथेष्ट भोजन पै द्यावें ॥ ३८ ॥
त्रयोदश गुणी तांबूल ॥ वेळा लवंगा सुपरिमळ ॥ चंदन अर्पिजे सुशीतळ ॥ द्विजकुळ तोषवावें ॥ ३९ ॥
मग वस्त्र अलंकार नाना ॥ शक्तिनुसार द्यावी दक्षिणा ॥ तुज प्रीत्यर्थ जनार्दना ॥ म्हणोन चरणां नमावें ॥ ४० ॥
परि येथें अवघड मोठें ॥ तात्काळ मनीं अहंकार उठे ॥ अहंकारें मी तव न भेटें ॥ नेटे पोटें पळे मी ॥ ४१ ॥
म्हणोनी यथासांग कर्म तें घडेना ॥ घडे कर्म तें पुण्यगाठीं पडेना ॥ ऐसें बोलिले साधूवचना ॥ तें अमान्य करवेना माझेनी ॥ ४२ ॥
अहो या साधु वचनासाठीं ॥ मी अवतार धरी कोटी ॥ परी तयाचीं वचनें गोमटीं ॥ पाववी शेवटीं सिद्धीतें ॥ ४३ ॥
यालागीं निरहंकार जाण ॥ करावें जप तप दान पुण्य ॥ तयातें मी जनार्दन ॥ न विसंबे क्षणभरी ॥ ४४ ॥
माझा मज अहंकार जाहला ॥ हयग्रीव जाहलों तये वेळां ॥ म्हणोनि सकल जगाला ॥ करून गलबला सांगतों ॥ ४५ ॥
थोडें करा अथवा फार ॥ परि मनीं न धरा अहंकार ॥ तेणें मी तुष्टें सर्वेश्वर ॥ वाहें भार तयाचा ॥ ४६ ॥
यदर्थी श्लोक गीतार्थाचा ॥ पार्था प्रति निरोपिला साचा ॥ तोचि अभिप्राय येथीचा ॥ मनीं आणा निर्धार ॥ ४७ ॥
मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि ॥ ततः कर्मफलत्यागस्त्यागाच्छातिरनंतरं ॥ ११ ॥
ऐसें फलाशारहित दान ॥ जे करिती मदर्पण ॥ ते प्रिय मज लागुन ॥ बहु बोलुन काय दाऊं ॥ ४८ ॥
जया आवडी मोक्षाची ॥ तेणें पूजा करावी नेमाची ॥ मलमास विशेषाची ॥ सामोग्री पुण्याची अपार ॥ ४९ ॥
यो गंतुं वांच्छति स्वर्ग गोपूजां सकरोति वै ॥ अधिमासे विशेषेण सुभक्त्त्या यवसादिना ॥ १२ ॥
ऐसें हें गो महिमान ॥ तुज म्यां केलें निवेदन ॥ म्हणोनि स्वये जनार्दन ॥ लक्ष्मीप्रति आपण सांगत ॥ ५० ॥
तोचि अभिप्राय आघवा ॥ तुम्हां श्रोतियां बरवा ॥ प्राकृत भाषेचिया गौरवा ॥ किंतु न धरावा मानसीं ॥ ५१ ॥
संमति साक्ष घ्यावी आदरें ॥ माझीं पद्मरचने होती अक्षरें ॥ स्फूर्तीदाता श्री रघुवीरें ॥ तया आधारें वदलों पैं ॥ ५२ ॥
ऐसिया गोपूजनाचें विधान ॥ भावें करिती पूजोनी दान ॥ तयाची यमयातना चुकोन ॥ पावे सदन मोक्षाचें ॥ ५३ ॥
यदर्थी संशय न धरावा ॥ साक्षेपें श्लोक परिसावा ॥ संमतेसीं प्रत्यय पाहावा ॥ पद्मपुराणीचा पै ॥ ५४ ॥
पूजनंसं प्रवक्ष्यामि गवामघनिवारणं ॥ दानं देयं विशेषेण स्वर्गदं सुखदं नृणां ॥ १३ ॥
मग लक्ष्मी म्हणेजी माधवा ॥ ऐसा महिमा सांगतां बरवा ॥ परी संदेह माझिया भावा ॥ तो निरसावा स्वामियां ॥ ५५ ॥
गौतमी देवी अवतारी ॥ आणि प्रचितीस परउपकारी ॥ देवी ती विष्ठाभक्षक निर्धारी ॥ काय म्हणोनिया ॥ ५६ ॥
मग बोले रमाधवो ॥ ऐक याचा अभिप्रावो ॥ शापास्तव पाहाहो ॥ विष्ठाभक्षक ते जाली ॥ ५७ ॥
तरी शाप तो कवणाचा ॥ परिसे भाव पैं येथींचा ॥ सदाशिवे दिधला साचा ॥ शाप साचा तियेतें ॥ ५८ ॥
एकदां आम्हीं आणि चतुरानन ॥ गेलों कैलासा लागुन ॥ परि चतुराननातें अभिमान ॥ सृष्टिकर्ता मी एक ॥ ५९ ॥
तें जाणोनि सदाशिवें ॥ ब्रह्मयातें निवेदिलें बरवें ॥ जे आमुचे मुगुटातें अवलोकावें ॥ आणि सत्त्वर यावें माघारें ॥ ६० ॥
तया देखतां आम्हालागी ॥ निरोपिता झाला महायोगी ॥ आमुचें पदतळ पाहून वेगीं ॥ परतून यावें माघारें ॥ ६१ ॥
ऐसी आज्ञा कैलासनाथें ॥ दिधली आम्हां उभयतातें ॥ अभिमानी जाणोनी ब्रह्मयातें ॥ मुगुट शोधातें तो गेला ॥ ६२ ॥
मग आम्हीं जाऊन पाताळा ॥ शोधिता जालों रसातळा ॥ अतळ वितळ सुतळा ॥ सप्त पाताळा शोधिलें ॥ ६३ ॥
परी ठाव न लागे चरणाचा ॥ खेदखिन्न होऊन तेथें साचा ॥ परतोन आलों न बोलवें वाचा ॥ शिवाजवळी ॥ ६४ ॥
अधोदृष्टी अधोमुख ॥ हें देखून कैलासनायक ॥ मातें आश्वासोनि नावेक ॥ बैस क्षण एक पै आतां ॥ ६५ ॥
तो इकडे ब्रह्मदेवें काय केलें ॥ एकवीस स्वर्ग धुंडाळिले ॥ परी मुगुटाचा अंत न कळे ॥ म्हणे परतोनि जाता भेद न दिसे मजलागीं ॥ ६६ ॥
तंव कुडीबुद्धी उपजली अंतरी ॥ तो धेनु आणि केतकीतें पाचारी ॥ साक्ष द्यावया शिवाजवळी ॥ चला समागमे माझिया ॥ ६७ ॥
ऐसी समागमें घेऊनी ॥ कमळासन आला कैलास भुवनीं ॥ रुद्राक्षातें नमूनी ॥ बोलता जाला पै ॥ ६८ ॥
परम आवेशे बोले तेव्हां ॥ मुगुट पाहुनी सदाशिवा ॥ साक्षी घेऊनि येधवां ॥ दर्शनातें पै आलों ॥ ६९ ॥
साक्ष पुसता चंद्रमौळी ॥ असत्य वदले ते वेळीं ॥ म्हणोनि क्रोधें शापिलीं ॥ दोघातें नीलकंठे ॥ ७० ॥
तैं पासुनी विष्ठाभक्षक ॥ धेनू झाली असे देख ॥ अपूज्य झाला तो केतक ॥ ऐसा कथानक पूर्वीचा ॥ ७१ ॥
तुझिया संशयाची निवृत्ती ॥ जाली की नसे चित्तीं ॥ धेनू सर्वांगी पवित्र म्हणतीं ॥ मुख जाण तें अपवित्र ॥ ७२ ॥
मागुती संशयातें धरून ॥ म्हणे माधवा लागून ॥ तरी सरस्वतीतें निवासस्थान ॥ जिव्हाग्रीं असे कीं ॥ ७३ ॥
ऐसिया कुश्चळस्थानीं ॥ सरस्वतीते निवास काय म्हणुनी ॥ मग बोले मोक्षदानी ॥ ऐक कथनीं तेंची पैं ॥ ७४ ॥
एके दिवशीं एकदां ॥ ब्रह्मदेव चेवला बुद्धिवादा ॥ कामबुद्धीनें पेटला मदा ॥ सरस्वतीसीं ॥ ७५ ॥
हें अंतरीं जाणविलें शिवातें ॥ मग शापिलें तियेतें ॥ अकुळीं घडे वास तूतें ॥ अपवित्र ते गर्वित ॥ ७६ ॥
ऐसा शाप सरस्वतीसी ॥ देता झाला कैलासवासी ॥ म्हणोनियां जिव्हाग्रेसी ॥ निवास तयेसीं पै जाला ॥ ७७ ॥
आतां कलियुगा माझारी ॥ कुपात्रीं ते निवास करी ॥ आणि कुळिवंताचे घरीं ॥ कुळीं उपजे मूर्खपुत्र ॥ ७८ ॥
तथापि विद्या असली किंचित ॥ तरीं गर्वे केला त्याचा नि:पात ॥ तया गर्वानें वाताहत ॥ अकुळीं जन करिताती ॥ ७९ ॥
कुश्चित मनुष्याचे देहीं ॥ विद्याप्राप्त होतां पाहीं ॥ मग बोलों नेदी कवणासही ॥ मदबळें विद्येचेनि ॥ ८० ॥
असो आतां हें प्रस्तुत ॥ पुढें होणारें तें कथिलें निश्चित ॥ परी जे जन शुचिष्मंत ॥ तयानें आपुलें हित साधावें ॥ ८१ ॥
अकिंचन असलिया जाण ॥ पर्वकाळीं न घडे दानपुण्य ॥ ग्रहण आलियाही जाण ॥ नेदी भिजवून अडकारु का ॥ ८२ ॥
म्हणोनिया मलमासीं ॥ भावे सेवावें देवासीं ॥ पूजावें अति आदरेंसी ॥ गोब्राह्मणासीं आदरें ॥ ८३ ॥
ऐसी एक मास करितां पूजा ॥ मज अभार होय अधोक्षजा ॥ कृपाळू होऊनियां पूजा ॥ घालून निवारी पापातें ॥ ८४ ॥
पापे होतां निर्मुक्त ॥ मग सहजची मोक्षप्राप्त ॥ म्हणोनियां हें व्रत ॥ मलगासीं सेवावें ॥ ८५ ॥
इतुका इतिहास बरवा ॥ लक्ष्मीतें निवेदी माधवा ॥ तोचि अभिप्रावो आघवा ॥ तुम्हां पुढें विस्तारिलासे ॥ ८६ ॥
इति श्रीमलमास माहात्म ॥ पद्मपुराणीचें संमत ॥ मनोहरसुत विरचित ॥ द्वितीयोध्याय संपूर्ण ॥ ८७ ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ओंव्या ॥ ८७ ॥
 
॥ इति द्वितीयोध्यायः ॥