सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 2 सप्टेंबर 2020 (10:48 IST)

Adhik maas 2020 मल मास किंवा पुरुषोत्तम मास कधी, केव्हा जाणून घ्या

यंदा वर्ष 2020 मध्ये अधिक मास 18 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर पर्यंत राहील. या वर्षी आश्विन मासाची अधिकता राहील अर्थात् यावर्षी दोन आश्विन मास असतील. 
 
पंचांगानुसारअधिक मास हा काळ 18 सप्टेंबर 2020 ते 16 ऑक्टोबर 2020 असेल.
 
काय असतो मल मास
पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या भ्रमणामुळे, सूर्य हा बारा राशींमधून प्रवास करत कालचक्राचे एक वर्ष पूर्ण करतो असे भासते, त्यास ३६५ दिवस, ५ तास ४८ मिनिटे आणि साडे ४७ सेकंद लागतात. त्या काळात इंग्रजी(ग्रेगरी) कॅलेंडरवरचे बारा महिने पूर्ण होतात. मात्र, चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्यावर आधारलेले १२ हिंदू चांद्र मास(महिने) मात्र ३५४ दिवसातच म्हणजे ११ दिवस आधीच पूर्ण होतात. महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातील चांद्र मास हे अमान्त असतात. उत्तरेला ते पौर्णिमान्त असतात. ज्या हिंदू मासात सूर्य एकाही राशीचे संक्रमण करीत नाही, तो अधिक मास होय. 
 
सौर मास व चांद्र मास यांची सांगड घालण्यासाठी व या अकरा दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी पंचांगात अधिक मासाची व क्षय मासाची योजना करण्यात आलेली आहे. तीन वर्षांत होणारा ३३ दिवसांचा फरक क्षय मास वा अधिक मास टाकून, ही कालगणना सूर्याधारित सौर वर्षाशी जुळवून घेण्यात येते.
 
चैत्रापासून आश्विन महिन्यांपर्यंतचा कोणताही एक महिना अधिक मास म्हणून येऊ शकतो. कारण या महिन्यांतच सूर्याची गती मंद असते, व त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत जायला जास्त वेळ लागतो. क्वचित कार्तिक वा फाल्गुन महिन्यातही अधिक मास येतो. त्या वर्षी एकाच नावाचे दोन चांद्र महिने असतात, अगोदरचा अधिकमास आणि नंतर लगेच येणारा महिना हा निजमास. एखादा विशिष्ट महिना अधिकमास आला की १९ वर्षांनंतर तोच महिना अधिकमास म्हणून येऊ शकतो.