रविवार, 12 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. मुस्लिम
  3. मुस्लिम धर्माविषयी
Written By वेबदुनिया|

महान पर्व- ईद

मुस्लिम धर्माचे दोन महत्त्वपूर्ण सण म्हणजे ईद उल फितर व दुसरी ईदुज्जुह. ईद उल फितर ईद ही आनंद साजरा करण्याची ईद मानली जाते. आपापसात बंधुत्वाचे संबंध प्रस्थापित करून प्रेम व आनंदाने साजरा केला जाणारा सण 

अशी त्याची ओळख आहे. याउलट ईदुज्जुहा म्हणजे कुर्बानी व त्यागाचे पर्व मानले जाते.

ईद उलल फितर हा अरबी भाषेतील शब्द आहे. ईद या शब्दाचा अर्थ आनंद असा आहे. तर फितर म्हणजे दान करणे. अन्नाच्या स्वरूपात दान केले जाते. फितर हा मुस्लिम शरियत कायद्यातील मापदंड आहे. रमजान महिन्यातील रोजे संपल्यानंतर ईद येते. ईद हा आनंदाचा सण असल्याने ईदच्या दिवसांमध्ये मुस्लिम बांधवांच्या चेहर्‍यावर आनंद खुललेला दिसतो. ईदला नवीन वस्त्र परिधान करून मुस्लिम बांधव ईदगाह किंवा मशिदीत नमाज अदा करायला जातात. अल्लाच्या प्रती नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधव एकमेकांना आलिंगन घेऊन ईदच्या शुभेच्छा देतात. या दिवशी मित्र असो वा शत्रू ते दोघांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देतात.

  ND
ईदच्या दिवशी मुस्लिम धर्मातील महिलावर्गात मोठा उत्साह दिसून येतो. पहिल्या दुसर्‍या रोजापासून घरात त्या शेवया तयार करायला सुरवात करतात. मात्र, हे चित्र आता केवळ ग्रामीण भागातच दिसते, शहरी भागात सगळ्याच गोष्टी रेडीमेड मिळायला लागल्या आहेत. ईदला आपल्या घराला रंगरंगोटी करून आप्तजनांना आपल्याकडे शिरखुर्मा खाण्यासाठी आमंत्रित केले जाते.

ईदच्या शुभ पर्वाला गरीब, अनाथ मुस्लिम बांधव आनंदापासून वंचित राहत असेल तर ती ईद मुस्लिम धर्मासाठी आनंदाची नाही, असे मानले जाते. मुस्लिम धर्मातील तळागाळातील व्यक्तीला ईदच्या पावन पर्वाचा आनंद घेता यावा, यासाठी जकात व फितराची तरतूद मुस्लिम शरियत कायदामध्ये करण्यात आली आहे. जकात हे ईदच्या आधी दिले जाते. कारण त्यांनी ही या वर्षांतून एकदा येणार्‍या महान पर्व- ईदचा आनंद तुटता यावा.