गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. जैन
  3. जैन धर्माविषयी
Written By
Last Updated :सटाणा (जि. नाशिक) , रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (21:21 IST)

मांगीतुंगी येथे आजपासून भगवान ऋषभदेव महामस्तकाभिषेक सोहळा..

mangitungi
सटाणा तालुक्यातील मांगीतुंगी  येथील प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्री आजपासून भगवान ऋषभदेव  यांचा महामस्तकाभिषेक सोहळा सुरु होत आहे. या महामस्तकाभिषेक सोहळ्यानिमित्त जैन कुंभमेळा देखील होणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून जैन बांधव उपस्थित झाले आहेत. या जैन बांधवांच्या उपस्थितीत जैन धर्मियांचे पहिले तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांचा गजर होणार आहे. मांगीतुंगी पर्वतावरील पाषाणात कोरण्यात आलेल्या भगवान ऋषभदेव यांच्या १०८ फूट उंच मूर्तीचा आंतरराष्ट्रीय महामस्तकाभिषेक सोहळा होणार आहे. या भव्य मूर्तीचा महामस्तकाभिषेक सोहळा दर सहा वर्षांनी आयोजित केला जाणार आहे. जैन धर्मियांचे पहिले तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांच्या जगातील सर्वात उंच मूर्तीची निर्मिती मांगीतुंगी येथे झाली आहे. या सोहळ्यानिमित्त मांगीतुंगी क्षेत्र सज्ज झाले आहे.
 
याअगोदर २८ फेब्रुवारी २०१६ रोजी भगवान ऋषभदेव यांचा पहिला महामस्तकाभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला होता. या भव्य मूर्तीची नोंद ‘गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये देखील करण्यात आली आहे. या पावनभूमीवर आजपासून प्रथम सहा वर्षीय महामस्तकाभिषेक सोहळा होत आहे. या सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे.
 
असे आहे मांगीतुंगी क्षेत्र… मांगीतुंगी हा एक किल्ला आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील भिलवाड गावाजवळ हा किल्ला आहे. येथे जैन तीर्थक्षेत्र आहे. येथे जैन धर्मीयांचे पहिले तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांची १०८ फूट उंच मूर्ती साकारण्यात आली आहे. या मूर्तीचा प्राण-प्रतिष्ठा सोहळा आणि महामस्तकाभिषेक सोहळा फेब्रुवारी २०१६ मध्ये संपन्न झाला. ही मूर्ती उभारण्यासाठी प्रथम १२० फूट लांबीच्या कापडावर या प्रस्तावित मूर्तीचे चित्र रेखाटण्यात आले व त्यानुसार ही मूर्ती घडविण्यात आली. त्यासाठी ग्रीक तत्त्वज्ञानासह पाली, संस्कृतसह दहा भाषांतील ग्रंथांचा अभ्यास करण्यात आल्याची माहिती आहे. ही भव्य मूर्ती अतिशय देखणी असून जगातील सर्वात उंच मूर्ती आहे. त्यामुळे मांगीतुंगी हे जैन धर्मीयांचे जागतिक तीर्थस्थळ होत आहे. अत्यंत टणक मानल्या जाणाऱ्या सह्याद्री पर्वतराजीच्या काळ्या बेसाल्ट पाषाणात डोंगर कापून तयार केलेली ही मूर्ती अन्य मूर्तीच्या तुलनेत अधिक टिकाऊ मानली जात आहे. जैन तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांच्या या १०८ फुटी मूर्तीची नोंद गिनीज बुकमध्ये केली आहे.
 
अशी आहे ही मूर्ती … डोक्याचे केस- ५ फूट, मुख- १२ फूट, मान- ४ फूट, कान- १४ फूट, मान ते छाती- १२ फूट, छाती ते नाभी- १२ फूट, नाभी ते टोंगळे- ३६ फूट, टोंगळे- ४ फूट, टोंगळे ते पायाचा घोटा- २९ फूट, तळपाय- ४ फूट, कमळ- ५ फूट, चौथरा- ३ फूट अशा भव्य आकाराची ही मूर्ती आहे.