रविवार, 5 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. अधिकमास
Written By
Last Modified: मंगळवार, 15 सप्टेंबर 2020 (17:33 IST)

अधिकमास माहात्म्य अध्याय बाविसावा

श्रीगणेशाय नमः ॥ जय त्रिभुवनसुंदरी आदिमाये ॥ वाग्देविके कविमांदुसरत्‍नह्रदये ॥ तुजविण रिता ठाव पाहे ॥ नसे माये सर्वथा ॥ १ ॥
तरी बैसून माझीये जिव्हाग्रीं ॥ ग्रंथ पाववा शेवटावरी तरीच धन्य संसारीं ॥ नाहीं तरी वृथा वैखरीं माझी हे ॥ २ ॥
ऐका श्रोते भाविकजन ॥ येथींचे ग्राहीक कोण कोण ॥ तयानें लाधलें कोण ॥ इतरां लाजिरवणें अभागिया ॥ ३ ॥
मलमास अति पावन ॥ लक्ष्मी-नारायण संवाद पूर्ण ॥ भावें ऐकतांच श्रवण ॥ तो पावे सदन मोक्षाचें ॥ ४ ॥
श्रीरुवाच ॥ दामोदर दयासिंधो वद दानफलाफलं ॥ मलिम्लुचे विशेषेण कैः कैः कि किं फलं व्रतं ॥ १ ॥
लक्ष्मी वदे हो दामोदरा ॥ दयासिंधो परम उदारा ॥ दान महत्माचिया प्रकारा ॥ वदा साचार स्वामियां ॥ ५ ॥
कवण दाने कवण पुण्य जोडे ॥ सार्थकता कैसेनि घडे ॥ हें वेगळालें फळ निवाडें॥ सांगावें रोकडें स्वामियां ॥ ६ ॥
श्रीविष्णुरुवाच व श्रुणु सुंदरि वक्ष्यामि लोकानुग्रहहेतवे ॥ प्रविधानंतु दानानां फलानि मलमासकं ॥ २ ॥
ऐक भामिनी चतुर देख ॥ तुझे बोल तंव परोपकारक ॥ तरीं दान फळ वेगळालें ऐक ॥ या मलमासा निके अवधारीं ॥ ७ ॥
सुवर्णदान शक्तिनुसार ॥ द्विजाते देती जे देणार ॥ तयावरीं तुष्टें मी सर्वेश्वर ॥ करीं परिहार दरिद्राचा ॥ ८ ॥
तयातें दरिद्राची व्यथा ॥ होऊं नेदीं मी सर्वथा ॥ अंतीं पाववीं मोक्षपंथा ॥ नव्हे अन्यथा हे वाणी ॥ ९ ॥
आतां रौप्यदानाचें फळ ॥ तेंही ऐकहो सकळ ॥ तेणें तुष्टे जाश्वनीळ ॥ आणि सकळ पितृव्याजें ॥ १० ॥
रजतं श्रद्धयोपेतो द्विजेभ्यो वितरत्यणु ॥ पितरस्तस्य संतुष्टा भवंति निखिलेष्टदाः ॥ ३ ॥
आतां मुक्ताफळें आणि पोंवळीं ॥ तेंही ऐक सांगतों बाळी ॥ तयाचीं फळें वेगळालीं ॥ परिसऊं तूंतें जाण पां ॥ ११ ॥
पोंवळीं अर्पितां पावे भुक्ति ॥ मुक्ताफळें लाभें मुक्ती ॥ एवं भुक्ति आणि सुक्ती ॥ लाभरीती जाण पां ॥ १२ ॥
कांस्यपात्र अथवा ताम्रपात्र ॥ विप्रातें अर्चितां विचित्र ॥ तरी भवानीसहित पंचवक्त्र ॥ कृपा करी तयावरी ॥ १३ ॥
वस्त्रदानें संतुष्टे चंद्र ॥ अपूपदानें पाप संहार ॥ अन्नदानें सर्वेश्वर ॥ तुष्टमान सर्वदां ॥ १४ ॥
उदकदान करितां जाण ॥ संतुष्टमान तया वरुण ॥ तयानें प्राप्त करी जीवन ॥ होय अन्नवृद्धीतें ॥ १५ ॥
अन्नदान सर्वात सार ॥ चाले सकळ व्यापार ॥ क्षणभरी अन्न नसलें जर ॥ केवीं व्यापार चालूं शके ॥ १६ ॥
आतां उपानह दान देतां ॥ यम तुष्टमान तयावरुता ॥ पदर्थी भगवंत वचनार्था ॥ आणा सर्वदां मानसीं ॥ १७ ॥
उपानह दान देतां ब्राह्मणातें ॥ मार्गी यम दे सुख तयातें ॥ अश्व दिधलिया दानातें ॥ अश्वरूढ स्वर्गी जाय ॥ १८ ॥
भुकेलियां अन्नदान ॥ तृषार्थि उदकपान ॥ देतां स्वर्गी सुखसंपन्न ॥ यमरावो नेतसे तयातें ॥ १९ ॥
मार्गी जातां ठायीं ॥ अन्न उदक पुरवी सर्वही ॥ यमलोकीं तयाते पाहीं ॥ पुरवी सर्वही अन्नोदक ॥ २० ॥
प्राणी निवर्तलियावरी ॥ द्वादशदिन लागती मार्गावरी ॥ चालतां तेथें यातना भारी ॥ ते गरुडपुराणीं वर्णिलीसे ॥ २१ ॥
म्हणोन येथें जें अर्पावें ॥ तेंची तेथें लागे पावावें ॥ दिधल्याविण तो न पावे ॥ हा निर्धार जाणिजे ॥ २२ ॥
नादत्तमुपतिष्ठतु ॥ ऐसा तो वेद बोलतु ॥ दिधल्याविण नव्हे प्राप्तु ॥ स्वयें बोलतु जनार्दन ॥ २३ ॥
घृताचें दान विप्रालागीं देतां ॥ सूर्य संतुष्टमान तयावरुता ॥ नसे ताप ज्वराची वार्ता ॥ अन्न शांतता तो करी ॥ २४ ॥
तिलपात्राप्रदानेन रुद्रलोके महीयते ॥ ताम्रं वा ताम्रपात्रं वा यो ददाति मलिम्लुचे ॥ ४ ॥
तिळपात्र दान करी जो नर ॥ स्वर्गी सुखावती पितर ॥ न बाधी तया शनैश्चर ॥ पावे सत्वर रुद्र कैलासा ॥ २५ ॥
कमंडलु तोय ताम्रपात्रीं ॥ देतां भावार्थे विप्राप्रती ॥ तेणें तुष्टमान वरुण भूपति ॥ नेत तयाप्रती वरुणलोका ॥ २६ ॥
तेथें बहुत सौख्य तया जना ॥ कांहीं एक नसे यातना ॥ दंपत्यातें करितां वस्त्रदाना ॥ कैलासभुवना तो पावे ॥ २७ ॥
घृतदानात्परंदानं पृथिव्यां नैव विद्यते ॥ सप्त धान्यं द्विजे देयं सह दक्षिणया शुभे ॥ ५ ॥
सप्त धान्य अर्पितां द्विजातें ॥ तेणें पूजिलें सप्तऋषीतें ॥ अरुंधतीसहितयातें ॥ दंपत्य पूजा घडली पैं ॥ २८ ॥
ऐसे नाना दानाचे प्रकार ॥ सांगतां वाढो पाहे विस्तार ॥ परी किंचित गोदानातें तत्पर ॥ होऊन कथा विस्तारिजे ॥ २९ ॥
आणीक आठवलें मजलागोनी ॥ सच्छीद्र अनरसे दानीं ॥ त्रितीनदशक विप्रालागोनी ॥ प्रतिदिनीं अर्पावे ॥ ३० ॥
संपूर्ण जया न घडे एकमास ॥ तरी सायासें अर्पी पांचपर्वास ॥ द्वादशी पौर्णिमा अमावास्येस ॥ व्यतीपात आणि वैधृती ॥ ३१ ॥
हीं मुख्य पर्वें बोलिजे ॥ मागें तूं तें निवेदिलें कमळजे ॥ हे मुख्य आवडीचें खाद्य माझें ॥ तेणें संतुष्टें मी तयावरी ॥ ३२ ॥
आतां गोदान केलियाचा प्रकार ॥ सांगतों ऐका सविस्तर ॥ पूर्वी दक्षिणेस महीस्मृती नगर ॥ असो थोर प्रसिद्ध पैं ॥ ३३ ॥
चारी वर्ण सभोग साधन ॥ शास्त्राधारीं वर्णती जन ॥ नित्य आचरती दानपुण्य ॥ वेदाध्ययन विप्र करिती ॥ ३४ ॥
आधीव्याधी दरिद्र पाहीं ॥ नगरीं धुंडितां न दिसे कांहीं ॥ अपमृत्युची वार्ता नाहीं ॥ जन सर्वही आनंदमय ॥ ३५ ॥
प्रभु तेथीचा धार्मिकरत ॥ पुत्र ऐसी प्रजा पाळीत ॥ लांच न घे न्याय करीत ॥ तोची धन्य भूपती ॥ ३६ ॥
असो ऐसा त्या नगरीचा महिमा ॥ तेथील विप्र एक द्विजशर्मा ॥ वेगळा जो कर्म अकर्मा ॥ चालवी नेम शास्त्राधारें ॥ ३७ ॥
घरीं सदां अग्निहोत्र ॥ कांता भामिनी सुपात्र ॥ पोटीं नाहीं पुत्रकलव ॥ भिक्षान्नें गात्र संरक्षितसे ॥ ३८ ॥
ऐसा तो सत्पात्र विप्रराणा ॥ प्रसंगीं अतीत आलिया जाणा ॥ गृहीं निपजेल जें अन्न ॥ तया लागून अर्पितसे ॥ ३९ ॥
ऐसें करितां बहुत काळवरी ॥ तों कोणी एक ब्राह्मण पुत्र करी ॥ फिरत फिरत तया नगरीं ॥ येऊनियां राहिला ॥ ४० ॥
परी माध्याह्न काळींची वेळा ॥ पोटा पाहिजे अन्नाचा गोळा ॥ म्हणोनिया शोधित चालिला ॥ ग्रामामाजी ते समयीं ॥ ४१ ॥
तंव पुसतसे ग्रामस्थासीं ॥ कोण अन्न अर्पी पांथस्थासी ॥ तयानें गृह दाखवितां त्यासी ॥ द्विजशर्म्यासी भेटला ॥ ४२ ॥
म्हणे माध्यान्ह समयीं क्षुधित ॥ समयीं पातलों मी अतीत ॥ ऐसी ऎकतांची विप्र मात ॥ आला धावत द्विजशर्मा ॥ ४३ ॥
बद्धहस्तें नमिला ब्राह्मण ॥ येरू काय बोले वचन ॥ तोची श्लोक अवधारा पूर्ण ॥ काय वचन बोलिला ॥ ४४ ॥
विप्र उवाच ॥ क्षुधानलेन तप्तानां विषवत्स कलार्चनं ॥ अन्नाद्यौषधमात्राणां दातावश्यं भवेधुना ॥ ६ ॥
म्हणे क्षुधानळें तप्तदेहीं ॥ विषवत् वाटे उपचार सर्वही ॥ तरी अन्न औषधातें दाता होई ॥ आहे किंवा नाहीं दाता तया वदें ॥ ४५ ॥
तथास्तु म्हणोनि आसनीं बैसविला ॥ भोजन देऊनी तृप्त केला ॥ मग स्वागत पुसता झाला ॥ कोठूनि आला परिवार केउता ॥ ४६ ॥
येरू म्हणे तीर्थ भ्रमण करित स्वयें मी एकला फिरत ॥ मातापिता बंधु दुहिता आप्त ॥ पुत्र ना कांतामज लागीं ॥ ४७ ॥
जरी मातें अपंगाल गृहीं ॥ तरीं सेवा करून मी राहीं ॥ कदां वंचनार्थ करून देही ॥ अंतर नेदीं विप्रराया ॥ ४८ ॥
जाणूनि निर्मळ अंतरीं ॥ म्हणे स्वस्थ राहें माझे घरीं ॥ कांहीं न सांगें चाकरी ॥ पुत्रापरी वर्तावे ॥ ४९ ॥
ठेऊन घेतला तयालागून ॥ नाम तयाचें नारायण ॥ सेवा करी न कंटाळे मन ॥ पडिलें कार्य संपादी ॥ ५० ॥
आधीच तीर्थवासी पवित्र ॥ वरी ब्राह्मण तो अग्निहोत्र ॥ निःकपटे सेवा चित्रविचित्र ॥ सेवी गात्र तयाचें ॥ ५१ ॥
ऐसे वर्ततां बहुकाळावरीं ॥ तंव नवल वर्तले परी ॥ विप्रस्त्री होती म्हातारी ॥ जाली गरोदरीं त्यापुण्यें ॥ ५२ ॥
तंव विप्र मनीं बहुत हर्षला ॥ म्हणें संतान न होतें मजला ॥ याचा पायगुण मज लाभला ॥ गर्भ राहिला साठवर्षी ॥ ५३ ॥
ऐसे मानुनियां हर्षास ॥ तंव गर्भा आले पूर्णदिवस ॥ प्रसूत होता विप्रस्त्रियेस ॥ पुत्र तियेस पै जाला ॥ ५४ ॥
मग तो विप्र आनंदें नाचें उडे ॥ म्हणे पाहा आश्चर्य केवढे ॥ आजवरी न पाहिले निवाडें ॥ पुत्रमुख जन्मवरी ॥ ५५ ॥
म्हणोन बहुत सोहळाकरी ॥ साहित्य मेळवाया परोपरी ॥ परंतु दुसरें कोणी नाहीं घरी ॥ रक्षण द्वारीं बैसावया ॥ ५६ ॥
मग नारायणातें म्हणें तेव्हा ॥ द्वारीं रक्षण बैसें सदैवा ॥ मी जातों पारखे गावां ॥ साहित्यालागुनी पैं आतां ॥ ५७ ॥
तरीं उदयीक पांचवा दिन ॥ सटवी पूजा लागे करणें ॥ यालागीं बैसे सावधान ॥ द्वारीं रक्षण विप्रराया ॥ ५८ ॥
ऐसें निवेदुनी तयासी ॥ आपण जाय पारखे ग्रामासीं ॥ मागें द्वारा समीप देशी ॥ बैसे रक्षणासी नारायण ॥ ५९ ॥
रात्र झाली यामिनी दोन ॥ तंव तो पंचमीचा दिवस लक्षून ॥ देवी येती झाली चालून ॥ पुत्राक्षरालागी पाहावया ॥ ६० ॥
सुंदर देदीप्यमान केवळ ॥ परीधान वस्त्र केलें सकळ ॥ त्वरित निरखुनियां बाळ ॥ माघारें तात्काळ परतली ॥ ६१ ॥
इतकें कृत्य तये क्षणीं ॥ नारायण देखून नयनीं ॥ हा तंव पुण्यवंत प्राणी ॥ जाहलें म्हणोन दर्शन ॥ ६२ ॥
मग तियेतें पदरी धरिलें ॥ म्हणे तूं कवण पातलीस ये वेळे ॥ यक्षिणी कीं पिशाच्च बाळें ॥ सांग वहिले मजलागीं ॥ ६३ ॥
येरी झिडकावी तयातें ॥ दूर होई म्हणें ब्राह्मणातें ॥ काय कारण तुज पुसावयातें ॥ सर परता माघारा ॥ ६४ ॥
येरू म्हणे तूं ते सर्वथा ॥ जाऊं नेदी मी तत्वता ॥ तू कवण हे सांग वार्ता ॥ मग आलिया पंथा जाईजे ॥ ६५ ॥
ऐसा दुराग्रह पाहोनी ॥ बोलती जालीते भामिनी ॥ म्हणे तूं पुण्यवान म्हणोनी ॥ दर्शन तुज लागुनी दिधलें ॥ ६६ ॥
मी तंव यक्षिणी देवी ॥ मातें म्हणताती सटवी ॥ पुत्राक्षरें आम्हीं निरखावी ॥ ब्रह्मवरदें करूनियां ॥ ६७ ॥
आतां सोडीं जाऊंदे मातें ॥ येरू म्हणे न घडे निरुतें ॥ काय अक्षर याचिया बाळातें ॥ तें मातें निवेदून सुखीं होई ॥ ६८ ॥
ऐकून तयाचें वचन ॥ देवी वदे तूं ते काय प्रयोजन ॥ जें होणार तें सुखें होतसे जाण ॥ ब्रह्माक्षर कोण टाळूं शके ॥ ६९ ॥
तंव विप्र लागतसे चरणीं ॥ सांग इतुके कृपेंकरूनी ॥ मग आणीक पुसें काहाणी ॥ तंव ते यक्षिणी बोलत ॥ ७० ॥
म्हणे हा विप्रकुमार पाहीं ॥ धनधान्य नसे याचे दैवी ॥ कांता पुत्र तेही नाहीं ॥ उदर निर्वाह केउता ॥ ७१ ॥
तरी तक्रविक्रय करून ॥ चालेल याचें उदरपोषण ॥ शतायुषी असे हा पूर्ण ॥ मरण अकाळी ॥ ७२ ॥
ऐसे वचन ऐकतां ते वेळीं ॥ येरे नमस्कारूनि बोळविली ॥ मनीं म्हणे हे नाथ चंद्रमौळी ॥ केवी कुळीं पुत्र ऐसा ॥ ७३ ॥
केवढा पवित्र विप्रराणा ॥ ऐसा पुत्र तया लागून ॥ काय ऐसें संतान होऊन ॥ निसंतान परी भलें ॥ ७४ ॥
केवढा हर्ष विप्राचे मनीं ॥ जन्मदारभ्य सोहळा देखुनी ॥ प्राण देईल हा ऐकतां क्षणीं ॥ म्हणोन मौनीं न बोलावें ॥ ७५ ॥
गोष्ट ठेविली जीवींचे जीवीं ॥ कोणातें न वदे काळत्रयीं ॥ असो विप्र येऊन स्वगृहीं ॥ सोहळा संपादिला आनंदें ॥ ७६ ॥
द्वादश दिनीं जातकर्म ॥ करिता झाला विप्रोतम ॥ संभ्रमें ठेविलें नाम ॥ बहुत लळा पुत्रावरी ॥ ७७ ॥
ऐसे लोटले बहुत दिन ॥ तों पंचम वर्षी पुत्रनिधान ॥ वाढता झाला तो मागुतेन ॥ कांता जाली प्रसूती ॥ ७८ ॥
ते समयीं कन्ये तें प्रसवली ॥ देखून विप्र आनंदमेळी ॥ म्हणे कृतकृत्य जालों येकाळीं ॥ जालें कुळीं कन्यापुत्र ॥ ७९ ॥
नारायण हा भाग्यें आगळा ॥ याचा पायगुण लाभला भला ॥ ऐसें सौख्य मानिता जाला ॥ परी चिंता नारायणा मानसीं ॥ ८० ॥
म्हणे आतां ही रक्षण पुढती ॥ मी बैसेन द्वार दिशेप्रती ॥ मागुती येतां यक्षिणी सती ॥ पुसेन तिजप्रती वृत्तांतु ॥ ८१ ॥
ऐसा निश्चय निजमनीं केला ॥ मागुती गुरू आज्ञेनें रक्षण बैसला ॥ तों पांचवे दिनीं यक्षिणी तेच वेळा ॥ लक्षून तात्काळ प्रगटली ॥ ८२ ॥
अक्षरें निरखून कन्येचे भाळीं ॥ निघती जाली ते क्षणीं बाळी ॥ तंव येरें पदरीं दृढ धरिली ॥ नमस्कारी भावार्थे ॥ ८३ ॥
म्हणे माते कृपाकरून मजसीं ॥ सांग कन्याक्षरें ती कैसीं ॥ येरी म्हणे वारंवार कां पुससी ॥ मूर्ख होसीरें ब्राह्मणा ॥ ८४ ॥
येरू मागुता चरणीं लागे ॥ कृपा करूनि मजला सांगें ॥ आणीक न मागें कांहीं आंगें ॥ जाण शुभांगें यक्षिणी ॥ ८५ ॥
मग भिडेस्तव यक्षिणी पाहीं ॥ बोलती झाली ते समयीं ॥ म्हणे विवाह तंव दैवीं नाहीं ॥ इचिया विप्रवर्या जाणपा ॥ ८६ ॥
मातापिता आप्तवर्ग ॥ न करिता इचा संसर्ग ॥ ही जारकर्मी विचरोन मार्ग ॥ उदर निर्वाहाते करील ॥ ८७ ॥
त्याहीवरी पूर्ण आयुषी ॥ रोगव्याधी नाहीं शरीरासी ॥ शतवर्षे इचिया कर्मासीं ॥ प्रवर्तती निश्चयेसी जाणपां ॥ ८८ ॥
ऐसे वदोन ते वेळीं ॥ यक्षिणी देवी गुप्त झाली ॥ ऐकोन जीवीं तळमळी ॥ नारायण विप्र ते वेळां ॥ ८९ ॥
म्हणे आहा देवा हें काय ॥ दैवापुढे नाहीं उपाय ॥ केवढा पवित्र विप्रराय ॥ संतान लाहे केवि ऐसे ॥ ९० ॥
असो होणार ते होऊन जात ॥ परी कोणाते न वदेची मात ॥ मनींच ठेविलीसे गुप्त ॥ साधी कार्यार्थ वरीवरी ॥ ९१ ॥
ऐसे कांहीं दिवस क्रमिले ॥ सातवर्षी उपनयन केले ॥ पंच वर्षी कन्यारत्‍न जालें ॥ ऐसें उभयतांतें ॥ ९२ ॥
तंव द्विज शर्मा पावला निधन ॥ कांता करी सहगमन ॥ धन्य ते पतिव्रता सतीरत्‍न ॥ टाकून लहान मुलें दोनीं ॥ ९३ ॥
असो ऐसें वर्तमान जालें ॥ नारायणें उत्तर कार्य सांग केलें ॥ म्हणे आतां येथें राहतां नव्हे भलें ॥ आचरती बाळें ती न देखें मी ॥ ९४ ॥
ऐसा निश्चयी मानसीं केला ॥ उपरी मास चार क्रमिता झाल ॥ मग ग्रामवासी जना सकळा ॥ निरविता जाला कन्यापुत्र ॥ ९५ ॥
आपण प्रयाण आरंभिलें ॥ तंव ती कन्या पुत्र कोल्हाळें ॥ आरडून गळां पडूं लागलें ॥ देखते जाले आबाल वृद्ध ॥ ९६ ॥
देखून तयांची करुणा ॥ अश्रू आले जनाचिया नयना ॥ म्हणती हे भगवान् जनार्दना ॥ ही बाळके केवी जगतील ॥ ९७ ॥
नाहीं तयातें पाळिता पोसिता ॥ नाहीं माता आणि पिता ॥ नाहीं द्रव्याची वार्ता ॥ केवी भगवंता हे केलें ॥ ९८ ॥
ऐसा जनाचा कोल्हाळ ॥ टपटपां अश्रू गाळिती सकळ ॥ नारायण ह्रदयींचा कोमळ ॥ परी फुटके कपाळ पैं यांचें ॥ ९९ ॥
बाळपणीं मेली मातापिता ॥ तारुण्यपणीं दरिद्र अवस्था ॥ त्याहीवरी जारकर्म तत्वतां ॥ जाणून निघता तो जाला ॥ १०० ॥
नारायण गेला निघोनीं ॥ तळमळों लागलीं बाळें दोन्ही ॥ मग जन समुदाय आश्वासुनी ॥ मुनी ॥ प्रतिपाळ दिनरजनी करिताती ॥ १०१ ॥
परी होणार तें न टळेची निश्चित ॥ कोण टाळूं शके ब्रह्मालिखित ॥ तें अनायासें होत जात ॥ न चाले तेथें उपाय ॥ २ ॥
नारायण निघोन गेल्यावरी ॥ एक धेनु असे त्याचें घरीं ॥ तिची सेवा निरंतरीं ॥ विप्रकुमर करीतसे ॥ ३ ॥
जाऊन रानांत पाहीं ॥ तृण आणीतसे लवलाहीं ॥ निजकरें तिचा पैसा सांचवी ॥ क्रय विक्रय लावी तक्रातें ॥ ४ ॥
भगिनीते वय पंच वर्षी ॥ आपण स्वयें दशवर्षा ॥ परी उदर निर्वाह परियेसी ॥ उभयतां सरसी लोटीत ॥ ५ ॥
कन्या मृत्तिका पात्र घेऊनी ॥ उदक आणीतसे प्रतिदिनीं ॥ येरु स्वकरें दह्याची कथली घेऊनी ॥ दधी मथुन करी तक्र ॥ ६ ॥
तयाचा विक्रय करून ॥ लागेल तें आणुनी धान्य ॥ तें उभयतां पचवून ॥ उदर पोषण करिताती ॥ ७ ॥
ऐशी लोटली वर्षे दोन ॥ तो पुढें प्राप्त झालें व्यसन ॥ कोणी एक सभाग्य वेश्या जाण ॥ उतरली येऊन नदीतीरीं ॥ ८ ॥
समागमें गज अश्वरथ ॥ दास दासीही ते बहुत ॥ स्वयें हेही स्वरूपवंत ॥ अप्सरा भासत इंद्राची ॥ ९ ॥
ऐसी ते येतां नदीतीरीं ॥ विप्रकन्या देखिली नेत्रीं ॥ मृन्मयपात्र घेऊन शिरीं ॥ तेही घाबरी पाहातसे ॥ १० ॥
कधींच पाहिला नाहीं समुदाय ॥ म्हणोन तेथें उभी राहे ॥ तंव वेश्येनें लवलाहें ॥ पाचारिलें आपणा पैं ॥ ११ ॥
मग पुसती झाली वर्तमान ॥ म्हणें तूं कवणाची कोण ॥ स्वरूपें दिससी सुंदर पूर्ण ॥ वस्त्र मळीण फाटके ॥ १२ ॥
तूं तें ऐशी दशा प्राप्त जाली ॥ कवणें दुर्जनें तूं तें गांजिली ॥ वर्तमान सांग मजजवळी ॥ मग तें विप्रबाळी बोलत ॥ १३ ॥
मायबापें गेलीं मरून ॥ एक बंधु तोही लहान ॥ मी ब्रह्मकुमारी पतिहीन ॥ दरिद्रें पूर्ण पीडिलेंसे ॥ १४ ॥
ऐसें वर्तमान ऐकूनी ॥ वैश्या द्रवली अंतःकरणीं ॥ मग काहीं एक पदार्थ तिजलागूनी ॥ दिधले काढूनि भक्षावया ॥ १५ ॥
पदार्थी भुलली विप्रकुमारी ॥ मग तैसीच बसली रथावरी ॥ वेश्या निघोन गेली सत्वरी ॥ हें जगनेत्रीं पाहाताती ॥ १६ ॥
परी कोणी न बोलती बोला ॥ म्हणती कन्येचा पांग फिटला ॥ न्यूनता नाहीं अन्नवस्त्राला ॥ पुढें होणाराला कोण पाहे ॥ १७ ॥
तों येरीकडे विप्रकुमारगृहीं ॥ तृण घेऊनि आला लवलाहीं ॥ तों भगिनी न देखे गृहाच्या ठायीं ॥ म्हणोन पाही चहूंकडे ॥ १८ ॥
भगिनीचा वृत्तांत ऐसा झाला ॥ हें ठाऊकें नसेची तयाला ॥ मग ग्रामवासियें पाहिला ॥ तयांनीं कथिला समाचार ॥ १९ ॥
मग अतिक्षीण अंतरीं ॥ होऊन आठवी श्रीहरी ॥ म्हणे माझी पूर्वदशा खरी ॥ फळा आली ये काळीं ॥ २० ॥
मातापितयांचें निधान ॥ पदरीं नाहीं कांहीधन ॥ आम्हीं उभयतां बाळें दीन ॥ अनाथ होऊन पडलों असो ॥ २१ ॥
त्यामाजी हा विघड पडिला ॥ आतां कोणी नसेकीं मजला ॥ ऐसा विलाप करिता जाला ॥ रडों लागला अटाहास्यें ॥ २२ ॥
ऐसें कर्म तया घडोनी आलें ॥ पुढे काय असे वर्तले ॥ तें पाहिजे श्रवण केले ॥ म्हणे पुढली प्रसंगीं ॥ २३ ॥
आतां धेनुसेवा फळली कैसी ॥ तेही श्रवण करा सावकाशी ॥ मुक्ती जाली त्या उभयतांसी ॥ ते सावकाश परिसीजे ॥ २४ ॥
इति श्रीमलमाहात्म ग्रंथ ॥ पद्मपुराणींचे संमत ॥ मनोहरसुत विरचित ॥ द्वाविंशतितमोध्याय गोड हा ॥ २२ ॥ ओव्या १२४ ॥ श्लोक ६ ॥
 
॥ इति द्वाविंशतितमोऽध्यायः ॥