शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. अधिकमास
Written By
Last Updated : बुधवार, 16 सप्टेंबर 2020 (18:39 IST)

अधिकमास माहात्म्य अध्याय अठ्ठाविसावा

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरवे नमः ॥ जयजयाजी करुणामूर्ती ॥ विश्वंभरा विश्वस्फूर्ती ॥ करुणासमुद्रा कृपामुर्ती ॥ निवारीं अधोगती पैं माझी ॥ १ ॥
मी तंव अनाथदीन ॥ प्रार्थितों करुणावचन दयाळुवा कृपाघन ॥ रक्षावे कृपेनें दासातें ॥ २ ॥
मलमाहात्म्य अति पावन ॥ ऐकोत श्रोते भाविक जन ॥ लक्ष्मीनारायण संवाद पूर्ण ॥ परिसा सज्जन आदरें ॥ ३ ॥
लक्ष्मीरुवाच ॥ देव देव ऋषीकेश भक्‍तानामभयप्रद स्त्रीणां केनोपचारेण तुष्टोसि त्वं जनार्दन ॥ १ ॥
लक्ष्मी वदे हो जनार्दना ॥ भक्तप्रतिपाळ अघहरणा ॥ परिसा माझी विज्ञापना ॥ हे नारायणा करुणासिंधो ॥ ४ ॥
तरी स्त्रियांनीं काय करावें ॥ कवण व्रत आचरावें ॥ केवीं मोक्षातें पावावें ॥ देवदेवा सांगावें सर्वही ॥ ५ ॥
स्त्री देहाची आकृती असे जाण ॥ शरीरीं अमंगळता पूर्ण ॥ हरेल कैसें तें कृपाकरून ॥ वदावें जाण स्वामियां ॥ ६ ॥
दुःशीलोर्दुभगोवृद्धो जडोरोगयुतोपिवा ॥ पतिःस्त्रीभिर्नहातव्योलोकेप्सुभिरपातकी ॥ २ ॥
मलीनता प्राप्त झालिया देहीं ॥ स्पर्श न करिती कोणीहीं ॥ जयाच्या कुशी जन्मे देहीं ॥ ते तंव पाई न स्पर्शती ॥ ७ ॥
देवब्राह्मण आणि अग्नि ॥ हे साक्षी ठेऊन पिता अर्पि दानीं ॥ दान घेतलें तोचि भ्रतारधनी ॥ परि देहा लागुनी स्पर्शेना ॥ ८ ॥
ऐसें ऐकूनिया उत्तर ॥ बोलता जाला सर्वेश्वर ॥ श्रृणु सुंदरी ये सोपस्कार ॥ ऐकें उत्तर प्रश्नाचें ॥ ९ ॥
श्रीनारायण उवाच ॥ नारीणां परमोधर्मो भर्तृसेवासमोनहि ॥ पतिशुश्रुषणादेवागताः स्वर्वीतकल्मषः ॥ ३ ॥
सकळ धर्मामाजी उत्तम धर्म जाण ॥ स्त्रियांतें दैवत भ्रतारची पूर्ण ॥ तया वेगळें दैवत आन ॥ केलें साधन जन्मवरी ॥ १० ॥
जन्मवर साधन केलें ॥ शास्त्रपुराणें दैवत पूजिलें ॥ तें तितुकेंहि वाया गेलें ॥ जे नाचरले पतिआज्ञे पैं ॥ ११ ॥
जे पतिवचनातें न मानी ॥ वंचनार्थ करी पतिलागोनि ॥ अनृतसदां असत्यवचनी ॥ तरी निदानीं सुटेना ॥ १२ ॥
याव्यतिरिक्त अनंत पापराशी ॥ त्या हो घडती स्त्रियासीं ॥ काही सायासी किंवा अनयासीं ॥ तरी सुटका तियेसि असेना ॥ १३ ॥
म्हणोनि सर्वीसर्वेश्वर ॥ स्त्रियांते दैवत आपुला भ्रतार ॥ हा तंव वेदेची केला निर्धार ॥ आन विचार नसेची ॥ १४ ॥
पतीची आज्ञा तेचि मान्य ॥ तेंचि दैवत पतिव्रते लागून ॥ पतिवाचून इतर सर्व शीण ॥ नसे कारण अन्य कांहीं ॥ १५ ॥
पहा वाराणसी माजी जाण ॥ लोपामुद्रा पतिव्रता धन्य ॥ जियेचें नाम घेतां पूर्ण ॥ होय क्षाळण महापापा ॥ १६ ॥
ऐसिया धर्मे तेची पतिव्रता ॥ नाहीतरी इतरही कांता ॥ तयांची किंचित वार्ता ॥ तेही सर्वथा निवेदूं ॥ १७ ॥
भ्रतारें मागतां उदक ॥ येरी कूप दावीतसे देख ॥ म्हणे पात्र घेऊनी आणा सम्यक ॥ नाहीं उदक गृहामाजी ॥ १८ ॥
तत्रापि उदक असलिया कोडें ॥ पात्र आणुनि आपटी तयापुढें ॥ क्षुधानळें पीडिता निवाडें ॥ करी बडबड वाउगी ॥ १९ ॥
भलतेंचि करूनी निमित्य ॥ सक्रोधें अन्न पचवीत ॥ खारट आळणी म्हणता तेथ ॥ म्हणे करावे हस्तें आपुलिया ॥ २० ॥
जन्म गेला नाव ठेवितां ॥ रसनेची चवी का सया पाहिजे आतां ॥ कैसि या प्रकारें कीजे क्षुधाशांतता ॥ असे अवगत स्वभावहा ॥ २१ ॥
ऐसिया स्त्रियांतें तत्वतां ॥ त्या म्हणो नये ती पतिव्रता ॥ ऐसियेसी संसारकरितां ॥ जन्म वृथा प्राणियासी ॥ २२ ॥
तरी पतीव्रताधर्मरीती ॥ इतिहास वदे रमापती ॥ तेचि वदों श्रोतियांप्रती ॥ अनुपम्यस्थिती आगळी ॥ २३ ॥
तरी काश्मीरदेशी प्रबळ ॥ धर्मपुरी प्रख्यात प्रज्वळ ॥ तेथील विप्र एक परमसुशील ॥ नाम जाण धर्मशर्मा ॥ २४ ॥
स्नानसंध्याशीळ सत्पात्र ॥ धर्मपरायण अग्निहोत्र ॥ पोटीं नसे पुत्र आणुमात्र ॥ सत्पात्र तयाची ॥ २५ ॥
नामें जाणा ते सुशीळा ॥ पतिव्रता परम मंगळा ॥ उभयतां क्रमित काळा ॥ असे निर्मळा ह्रदयीची ॥ २६ ॥
वयसा उभयतांची समान ॥ साठिची जालीसे गणना ॥ तंव धर्मशर्मा बोले तिये लागून ॥ ऐक वचन भामिनिये ॥ २७ ॥
वसंत ऋतु उष्ण मास ॥ गंगेस चलावें स्नानास ॥ येरी अवश्य म्हणोन तयास ॥ निघती जाली तात्काळी ॥ २८ ॥
पाहूनि गंगोदक निर्मळ ॥ दुजें कोणी नसेचि अढळ ॥ जळी रिघूनियां ते वेळें ॥ स्नान करी तांतडी ॥ २९ ॥
परी बुद्धि कर्मानुसार ॥ ह्रदयीं उदेला कामविकार ॥ विप्र जाला कामातुर ॥ बोले उत्तर स्त्रियेतें ॥ ३० ॥
म्हणे नग्न जलक्रिडा करावी ॥ रति सुखातें विश्रांति द्यावी ॥ ऐसें वाटे माझ्या जीवीं ॥ तरीं आचरावी क्रिया हे ॥ ३१ ॥
तंव येरी वदतसे उत्तरा ॥ म्हणे हें केउतें उदेलें अंतरा ॥ माध्यान पातला भास्करा ॥ वरी गंगातीर हें पवित्र ॥ ३२ ॥
त्याही वय नसे आपुलें ॥ हे तों केवीं मनी उद्‍भवले ॥ मज तो वचन मोडितां नये वहिलें ॥ बोल लागेल पतिव्रतेसी ॥ ३३ ॥
तरी स्वगृहीं चला निधी ॥ मग सारावी हे विधि ॥ येरु म्हणे हें तो न घडे कधीं ॥ नाहीं अवघी कामातें ॥ ३४ ॥
ऐसें तियेतें वदोन ॥ जळक्रीडा करिती जाली नग्न ॥ द्रवो लागलें रेत पूर्ण ॥ ह्रदयीं मदन धुसधुसी ॥ ३५ ॥
मग सारिते जाले रती ॥ शांत केले ते वेळीं सती ॥ धन्य ते पतिव्रता सती ॥ वचन न मोडी भ्रताराचें ॥ ३६ ॥
परी चमत्कार जाला अद्‍भुत ॥ पोटीं धरिती जाली गर्भातें ॥ नवमास भरतांचि तयेतें ॥ जाली प्रसूत कामिनी ॥ ३७ ॥
आश्चर्य करिती सकळजन ॥ म्हणती पहा नवल कोण ॥ वृद्धापकाळीं पुत्रनिधान ॥ देखे कामिनी आदरेंसीं ॥ ३८ ॥
कोणी निंदिती कोणी स्तविती ॥ तंव दोन पुत्र जाले तिजप्रति ॥ शारदा आणि शांती म्हणती ॥ नामें उभयतां ते साजिरी ॥ ३९ ॥
पुत्र उभयतां दोघेजण ॥ दिवसेंदिवस वृद्धिंगत जाण ॥ पंच वर्षे जालिया पूर्ण ॥ पुढें कथन अवधारा ॥ ४० ॥
गंगाजळी जलक्रीडा केली ॥ ते नग्न आणि रति संपादिली ॥ त्याची पापें फळा आलीं तात्काळीं ॥ तनु भाजली उभयतांची ॥ ४१ ॥
उभयतां विप्रकुमारातें ॥ सदासर्वकाळात तप्तता देहांतें ॥ चैन पडेना तयातें ॥ न सुचे अन्नउदक कांहीं ॥ ४२ ॥
लाहें लाहें संतप्त गात्र ॥ उपाय करिती नाना प्रकार ॥ मोह धरून मातापितर ॥ करितां उपचार त्रासले ॥ ४३ ॥
नाना परी उपाय केले ॥ परि व्यथा अधिक प्रबळें ॥ कुमार चरफडती बाळें ॥ दीन वदनें करूनिया ॥ ४४ ॥
शोक करिती मातापिता ॥ केउतें उदेलें हें अनंता ॥ वृद्धापकाळीं पुत्राची वार्ता ॥ देखिली सत्ता तुझिया ॥ ४५ ॥
तेथें ही दशा उद्‍भवली ॥ बाळकष्टी न देखती या काली ॥ महादेवाधिदेवा चंद्रमौळी ॥ वेळ आली मृत्याची ॥ ४६ ॥
ऐसा नानापरी विलाप ॥ करिती उभयतां मायबाप ॥ मग तयातें लाविती लेप ॥ शीतळता चंदनाची ॥ ४७ ॥
उत्तम चंदन आणुनी ॥ मर्दन करिती पुत्रालागुनी ॥ परी सीतळता नव्हेची नयनीं ॥ यथाभूत बाळक तें ॥ ४८ ॥
वार्ता फाकली नगरांत ॥ जनसमुदाय निरखू येत ॥ जे जे उपचार सांगत ॥ ते ते करिती मातापिता ॥ ४९ ॥
परी कांहीं केल्या नव्हें बरें ॥ अधिकच चरफडती कुमारें ॥ वृत्तांत ऎकता नृपवरें ॥ तोही येत धांवूनियां ॥ ५० ॥
नृप धार्मिक पाहीं ॥ देखून आश्चर्य करिती ह्रदयीं ॥ म्हणे माझिया राष्ट्री ऐसा नाहीं ॥ धन्वंतरी आगळा ॥ ५१ ॥
मग रायें शोध केला बहुत ॥ कोणी धन्वंतरी न मिळें तेथ ॥ नाहीं पंचाक्षरी महंत ॥ उपाव न चालत कवणाचा ॥ ५२ ॥
तव एक अपूर्व वर्तलें ॥ गालव ऋषी येतां देखिले ॥ रायें निजासनी बैसविले ॥ पूजन केले यथाविधी ॥ ५३ ॥
मग ऋषीते साद्यंत समाचार ॥ कथिता जाला साचार ॥ म्हणें न चालेची उपचार ॥ विप्रकुमर कष्टताती ॥ ५४ ॥
तें तंव न देखवे माझेनीं ॥ उपाव केला बहुतजनीं ॥ परी शांत नव्हे ज्याचेनीं ॥ कष्टती दोन्हीं मातापितरें ॥ ५५ ॥
ऐसें नृपाचें वाक्य ऐकुनी ॥ बोलता जाला गालवमुनी ॥ म्हणे ऐक नृप चक्रचूडामणी ॥ उपाया लागुनी सांगतो ॥ ५६ ॥
असेल जरी कोणी पतिव्रता ॥ तिचिया हस्तें उदक सिंचिता ॥ तरीं या ज्वरा तें होय शांतता ॥ सौख्यवार्ता बाळकातें ॥ ५७ ॥
ऐसें ऐकता नि उत्तरा ॥ रायें नगरीं पिटिला डांगोरा ॥ जी असेल पतिव्रता सुंदरा ॥ या त्वरा या ठायी ॥ ५८ ॥
नगरीं प्रगट जाली मात ॥ परी कोणी न बोले पतिव्रता सत्य ॥ राजभार्येसहित ग्रामवासी न येत ॥ किशोर उदक स्पर्शावया ॥ ५९ ॥
तंव नृप चाकाटला अंतरीं ॥ म्हणे कोणीही पतिव्रता सुंदरीं ॥ न देखोंची माझिया नगरी ॥ केउता पुढारी परिणाम ॥ ६० ॥
तरीं समग्रांची पापवार्ता ॥ ग्रामवासी राजकांता ॥ आहा हे केउते अनंता ॥ होऊ पाहे घाता बाळकासी ॥ ६१ ॥
आणि सत्वही गेलें नगरीचें ॥ हांसणे जालें सकळिकांचें ॥ ते तंव लांछन जालें जन्माचें ॥ बोलतां वाचें न बोलवे ॥ ६२ ॥
ऐसी चिंता करितां नृपनाथ ॥ तंव आश्चर्य वर्तले अद्‍भुत ॥ एक निषादी त्या समयांत ॥ आली तेथें अवचिता ॥ ६३ ॥
जातीची ते भिल्लिणी ॥ मस्तकीं काष्ठभारा घेउनि ॥ जात असे आपुले मार्गानीं ॥ तंव देखिलें नयनीं अपूर्व ॥ ६४ ॥
ग्रामवासी जनांचा मेळा ॥ अवलोकितसे अबळा ॥ मग मस्तकीचा भारा आपटिला ॥ आली तेथें जनसमुदावो ॥ ६५ ॥
वार्ता ऐकतां कर्णोकर्णी ॥ जे पतिव्रतेमाजी शिरोमणी ॥ असलिया भेटावें नृपालागोनी ॥ जिववावयाही बाळका ॥ ६६ ॥
ऐकत ऐसिया वचनातें ॥ येरी पतिव्रता धर्मातें ॥ ते ठाऊके नसेचि तियेतें ॥ कैसा आचार तोही न कळे ॥ ६७ ॥
परी तियेच नेम असे एक ॥ पतिवचनीं नसे वंचक ॥ सदांसर्वकाळ देख ॥ पति अवज्ञा नसेची ॥ ६८ ॥
स्वप्नीं नेणें परद्वाराते ॥ भाषणही करूं शके कवणातें ॥ ऐसें असतांती तेथे ॥ राजा जवळिकें पातली ॥ ६९ ॥
म्हणे कवण संकट तुम्हां ॥ तें निवेदी नृपसत्तमा ॥ रायें निवेदिलें सर्वही कर्मा ॥ तंव बोले भामानिषदाची ॥ ७० ॥
म्हणे उदक आण लवलाही ॥ मी तव पतिव्रता धर्म नेणें कांहीं ॥ परी कर्ता सर्व शेषशाई ॥ पाहे नवाई नृपवरा ॥ ७१ ॥
उदक घेऊनियां करीं ॥ काय बोले ते अवसरीं ॥ पतिअवज्ञा जन्मवरी ॥ केली नसे जाणपां ॥ ७२ ॥
नेणें परपुरुषाची वार्ता ॥ हे तंव ठाऊक असे जगन्नाथा ॥ ऎसें वदोनियां तत्वता ॥ उदक शिंपी बाळातें ॥ ७३ ॥
तव चमत्कार जाला अद्‍भुत ॥ तात्काळ ताप जाला शांत ॥ बाळ खडबडून उठत ॥ चरण वंदीत निषादीचे ॥ ७४ ॥
ऐसा चमत्कार पाहून जयजयकार करिती सर्वजन ॥ मग रायें वस्त्रालंकारें करून ॥ निषादीला लागून गौरविलें ॥ ७५ ॥
वरी एकग्राम तत्वता ॥ देता जाला नृपनाथा ॥ ऐसी निषादी पतिव्रता ॥ देखून समस्तां आश्चर्य ॥ ७६ ॥
ऐसें पतिव्रतेचें कथन ॥ लक्ष्मी तें वदे नारायण ॥ तेंचि तुम्हां कथिले संपूर्ण ॥ आचरा सर्वज्ञ सर्वतें ॥ ७७ ॥
म्हणोन सकळ धर्मामाजी धर्म ॥ स्त्रियेतें भ्रतारसेवेचा नेम ॥ तयाच्या वचनीं प्रेम ॥ धरूनि वर्ते सर्वदा ॥ ७८ ॥
मग तियेतें करणें नलगे आन ॥ कांही एक जपतपसाधन ॥ आपुला भ्रतार तोची नारायण ॥ पावे मोक्ष सदनतें पैं ॥ ७९ ॥
यालागीं सकळजनीं ॥ वर्तावें भावार्थ धरूनी ॥ मग तयातें उपेक्षिना कोणी ॥ यम पायधुनी माथा वंदी ॥ ८० ॥
स्वस्ति श्रीमलमहात्म्य ग्रंथ पद्‍मपुराणींचें संमत ॥ मनोहरसुत विरचित ॥ अष्टविंशतितमो ऽ ध्याय गोड हा ॥ २८ ॥ ओव्याः ८० ॥ श्लोक ३ ॥
 
॥ इति अष्टविंशतितमोऽध्यायः ॥