सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. अष्टगणेश
Written By

अष्टगणेश : गजानन

गजानन: स विज्ञेय: सांख्येभ्य: सिद्धीदायक:।
लोभासुरप्रहर्ता वैं आखुगश्च प्रकीर्तित:।।
गजानन अवतार सांख्यब्रह्म धारक आहे. त्याला लोभासुर आणि मूषक वाहन असेही म्हटले आहे. धनाधिपती कुबेरापासून लोभासुराचा जन्म झाला. तो अत्यंत पराक्रमी आणि प्रतापी होता. लोभासुराने दैत्य गुरू शुक्राचार्याकडे जाऊन त्यांना प्रणाम केला. आचार्यांनी त्याला पंचाक्षरी मंत्राची दीक्षा देऊन तप करण्यासाठी प्रेरणा दिली. गुरूला आदरपूर्वक प्रणाम करून तो वनात निघून गेला. त्याने पंचाक्षरी मंत्राचा जप करत शंकराचे ध्यान करण्यास सुरवात केली. दीर्घकाळ अखंड तप केल्यानंतर शंकर त्याच्यासमोर प्रकट झाले.

लोभासुराने त्यांना प्रणाम केला आणि त्यांची स्तुती करू लागला. त्यांनी त्याला निर्भयतेचा वर दिला. निर्भय लोभासुराने सर्व प्रमुख असुरांना एकत्र करून त्यांच्या मदतीने पृथ्वीवर आपले एकछत्री राज्य स्थापित केले. नंतर त्याने स्वर्गावरही आक्रमण करून वज्रायुधाचा पराभव केला आणि स्वर्गाधिपती बनला. पराभूत झालेल्या सुरेंद्राने आपली व्यथा विष्णूला सांगितली. श्री विष्णूने या असुराचा नाश करण्यासाठी युद्ध केले. परंतु विष्णूचाही त्याच्यासमोर निभाव लागला नाही. तेही पराभू्त झाले.

विष्णू किंवा अन्य देवतांचे रक्षक महादेव आहेत असे समजून लोभासुराने आपला एक दूत त्यांच्याकडे पाठविला आणि सांगितले की, 'आपण पराक्रमी लोभासुराशी युद्ध करा अन्यथा कैलास त्याच्यासाठी मोकळा करा'. भगवान शंकराने त्याला दिलेला वर आठवला आणि ते दूर वनात निघून गेले. लोभासुराच्या आनंदाला पारावार उरला नाही. राज्यातील सर्व धर्म-कर्म समाप्त झाले. अत्याचार, पापांचे आकांडतांडव सुरू झाले. ब्राह्मणांना त्रास देण्यास त्याने सुरवात केली.
WD
रैभ्याने देवांना गणेशोपासना करण्यास सांगितले. सर्व देवांनी गजमुखाची आराधना सुरू केली. हे पाहून मूषकरूढ गजानन प्रकट झाले आणि त्यांनी लोभासुराला पराजित करण्याचे आश्वासन देवतांना दिले. नंतर गजाननाने शिवाला लोभासुराकडे पाठविले. तेव्हा शिवाने त्याला सांगितले की, 'तू गजमुखाला शरण ये आणि शांततापूर्ण जीवन व्यतीत कर, अन्यथा युद्धासाठी तयार हो. शिवाय गजमुखाचे महात्म्यही सांगितले. गुरू शुक्राचार्यांनीही त्याला गजाननाला शरण जाण्यास सांगितले.

लोभासुराने गणेश म्हणजे काय ते समजून घेतले आणि तो गणेशाला भजू लागला. गजाननाने त्याला आशीर्वाद दिला. देव, ऋषीमुनी आणि ब्राह्मण सर्वजण सुखी झाले. सर्वजण गजाननाचे गुणगाण गाऊ लागले.