मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. अयोध्या विशेष
Written By
Last Modified: मंगळवार, 21 जुलै 2020 (12:09 IST)

आता राममंदिर अयोध्येत निर्धारित जागीच बनणार

अखेर अयोध्येत राममंदिर उभारणीचा शुभारंभ करण्याची तारीख निश्चित झाली आहे. 5 ऑगस्ट 2020 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या हस्ते हा शुभारंभ होणार हे आता नक्की ठरले आहे. त्यामुळे देशातील करोडो रामभक्त नागरिकांच्या स्वप्नाची पूर्तता होण्याच्या दिशेने एक ठोस पाऊल पुढे पडलेले आहे. हम मंदिर वही बनाएंगे ही घोषणा आता वास्तवात येणार हे निश्चित झाले आहे.
 
प्रभु श्रीरामचंद्र हे करोडो भारतीयांचे कायम श्रद्धास्थान राहिलेले आहे. आज कथित बुद्धीवादी राम हा खरोखरी अस्तित्वात होता का? रामायण हे खरोखरी घडले का? की रामायण ही एक कथाच होती? असे असंख्य प्रश्न निर्माण करतात. मात्र हे प्रश्न या देशातीलच नव्हे तर जगभरातील लाखो करोडो रामभक्तांच्या श्रद्धेला धक्का लावू शकलेले नाहीत.
 
खरेतर भारतीयांच्या धार्मिक श्रद्धांना धक्का देणे हा अनेक कथित बुद्धीवंतांचा कायमचा उद्योग राहिलेला आहे. जर इतिहास तपासला तर ब्रह्म विष्णू महेश, प्रभू रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण, भगवान शंकर, श्रीगणेश या सर्व देवदेवता किंवा परमेश्वराचा अवतार असलेली मानवी रुपे हजारों वर्षांपासून या भरत भूमीवरील नागरिकांचे दैवत राहिलेले आहेत. साधारणतः आठव्या शतकापासून आपल्यात भरत भूमीवर परकियांनी आक्रमण करणे सुरु केले. त्यापूर्वी या परिसरात या सर्व देवदेवतांची मंदिरे उभारली गेली होती. त्या मंदिरांमागे इतिहासही होता. त्या इतिहासावरही जनसामान्यांची श्रद्धा होती. आठव्या शतकानंतर या देशात परकीय आक्रमणं सुरु झाली. या परकीयांमध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांनी हिंदूंची श्रद्धास्थाने भंग करणे, त्याठिकाणी आपल्या मशिदी किंवा तत्सम प्रार्थनास्थाने उभारणे आणि त्यायोगे स्थानिकांना दुखावणे हा उपक्रम अगदी ठरवून राबवला होता. त्याकाळात अनेक हिंदूंना तलवारीच्या जोरावर त्यांनी मुस्लिम बनवून धर्मविस्तार करण्याचेही उद्योग केले होते. या सर्व प्रकाराचे दाखले खर्या इतिहासात डोकावल्यास उपलब्ध आहेत.
 
मात्र मुस्लिमांनंतर या देशात इंग्रज आले. त्यांनी राज्य करण्यासाठी हिंदू आणि मुस्लिमामध्ये फूट पाडणे हा पहिला उपक्रम राबवला. त्यासाठी त्यांनी या देशात नवी शिक्षणप्रणाली आणून त्यात त्यांच्या सोयीचा नवा इतिहास लिहिला. हाच इतिहास सर्वांना शिकवला गेला. बुद्धिभेद करण्याची ही सुरुवात होती.
 
या बुद्धिभेदातूनच पुढे या देशात हिंदू-मुस्लिम संघर्ष वाढला आणि त्यातूनच देशाचे विभाजन झाले. विभाजनानंतरही देशाची सूत्रे गेली ती इंग्रजधार्जिण्या कथित हिंदूविरोधी बुद्धीवंतांच्याच हातात. त्यामुळे जुनाच इतिहास मागील पानावरून पुढे नेला गेला. त्यातूनच राममंदिरासारख्या समस्या या देशात उभ्या झाल्या. स्वातंत्र्यानंतर या देशात राज्यकर्ते जरी कथित बुद्धीवंत होते तरी त्यांच्यासमवेत सरदार वल्लभभाई पटेलांसारखे संवेदनशील मंत्रीही होते. त्यामुळे अशी मुस्लिमांनी भंग केलेली मंदिरे पुनर्र्निर्मित करण्यास सोमनाथ मंदिराच्या निमित्ताने सुरुवात तर झाली होती. मात्र नंतर ती थांबली.
 
अयोध्येतील राममंदिराबाबतही नेमके हेच झाले. मुस्लिम बादशहा बाबराने हे मंदिर भंग करून त्याठिकाणी बाबरी मशिद उभारली असा दावा अभ्यासक करतात. मात्र या देशातील कथित बुद्धीवंत राज्यकर्त्यांनी हा दावा नाकारला. परिणामी हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले. गेली अनेक वर्षे हे प्रकरण न्यायप्रविष्टच होते. या मुद्यावर 1985 पासून नव्याने संघर्ष सुरु झाला. त्याचे पर्यावसान देशात राजकीय अस्थिरता निर्माण होण्यात झाले. मात्र कोणत्याच सरकारला या प्रकरणात हात घालण्याची हिंमत करावी अशी परिस्थिती निर्माण होत नव्हती.
 
सुदैवाने नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर ती परिस्थिती निर्माण होण्यास सुरुवात झाली. न्यायालयातील मुद्दा आपण न्यायालयातच सोडवू ही भाजप नेत्यांची भूमिका होती. त्यानुसार गतवर्षी नोव्हेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात निकाल देत वादग्रस्त जमीन ही रामजन्मभूमीच आहे आणि याठिकाणी राममंदिरच होते हे मान्य करत या जागेवर राममंदिर उभारणीसाठी हिरवी झेंडी दिली.
 
न्यायालयाने एक पाऊल पुढे जात मंदिर उभारणीसाठी काय केले जावे याचाही आराखडा सरकारला दिला. त्यामुळे काम अधिक सुकर झाले. न्यायालयीन आदेशानुसार केेंद्रसरकारने मंदिर निर्मिती न्यास निर्माण केला आणि या न्यासाच्या माध्यमातून या निर्मितीला 5 ऑगस्ट 2020 रोजी आता शुभारंभ होत आहे. अपेक्षेनुसार पुढील 2-3 वर्षात हे मंदिर पूर्ण व्हावे. त्यानंतर जगभरातील करोडो रामभक्तांना श्रद्धेने त्याठिकाणी दर्शनाला निश्चित जाता येईल.
 
अयोध्येत राममंदिर उभारणीचा शुभारंभ करण्याची तारीख जाहीर होताच देशातील कथित बुद्धीवंतांना पोटशूळ उठणे हे तर सहाजिकच होते. हा पोटशूळ उठायला सुरुवात झाली आहे. या देशातील काही पक्षांनी अल्पसंख्यांकांचे लांगुलनचालन करुन सत्ता मिळवणे हेच ध्येय गेली अनेक वर्षे डोळ्यासमोर ठेवले होते. काही वर्ष त्यांना ते साधले. मात्र आता जनता सावध झाली आहे. याचे प्रत्यंतर 2014 पासून या देशात आले आहे. प्रचंड बदनामी करूनही 2019 मध्ये नरेंद्र मोदी सरकार एकाच पक्षाच्या 303 जागा घेऊन सत्तेत आले त्याचवेळी हे स्पष्ट झाले आहे. मात्र तरीही या मंडळींना मुस्लीमांचे लांगुलनचालन करून आपण पुन्हा सत्तेत येऊ शकू असे भाबडे स्वप्नरंजन करण्यातच आनंद वाटतो.
 
असेच स्वप्नरंजन करायला महाराष्ट्रातील स्वयंघोषित जाणता राजा असलेल्या शरद पवारांनी काल केले. आम्हाला कोरोना कसा संपेल ही काळजी आहे. मात्र काही लोकांना राममंदिर उभारण्यात रस आहे अशा आशयाचे विधान करीत त्यांनी देशातील राज्यकर्त्यांवर टिका केली आहे. त्यांच्या या विधानाला सत्ताधारी भाजपातील अनेकांनी योग्य असे उत्तरही दिले आहे. त्यामुळे त्यांच्या या विधानावर जास्त भाष्य करण्याची मला गरज वाटत नाही. मात्र एकच बाब इथे नमूद करावीशी वाटते.या देशात आजही करोडो नागरिक हे श्रद्धेवर जगतात. आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आला तरी श्रद्धेच्या जोरावर माणूस हिंमत बांधतो आणि संकटांशी सामना करण्यास सज्ज होतो. कोरोनाची महामारी हाही काहीतरी ईश्वरी कोप आहे असे मानणाराही वर्ग आज या देशात सापडेल. त्यांच्या दैवताच्या मंदिराचे पुर्ननिर्माण होण्यास शुभारंभ होतो आहे हा देखील एक शुभशकुन समजून हे श्रद्धाळू कोरोनाशी नव्या हिंमतीने लढण्यास सज्ज होतील आणि कोरोनाला कदाचित संपवतीलही. अन्यथा कोरोनासोबत जगत सुलभ आयुष्य कसे जगता येईल यासाठी तरी ते नव्या दमाने सज्ज होतील याची जाणीव अजाणता का होईना पण या जाणत्या राजाने ठेवावी इतकीच अपेक्षा आहे.
 
काल अयोध्येत राममंदिराचा शुभारभ करण्याची तारीख निश्चित होताच महाराष्ट्रातील सत्ताधारी असलेल्या शिवसेनेच्या एका खासदारानेही मंदिर उभारणीच्या शुभारंभाला उद्धव ठाकरेंना निमंत्रित करणार किंवा नाही याबाबत शंका व्यक्त केली. राममंदिर न्यास उद्धव ठाकरेंना निमंत्रण देईलही मात्र उद्धव ठाकरे त्या निमंत्रणाचा स्वीकार करून त्याठिकाणी जाऊ शकतील काय हा खरा कळीचा मुद्दा आहे. उद्धव ठाकरेंचे तीर्थरूप स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी अयोध्येत राममंदिर व्हावे यासाठी मनोमन ध्यास घेतला होता. 1990 आणि 1992 च्या कारसेवेत बाळासाहेबांच्या आदेशावरून हजारो शिवसैनिक अयोध्येत पोहोचले होते. अयोध्येतील कथित बाबरी मशिद पाडायला सुरुवात केली ती शिवसैनिकांनी असा आरोप माध्यमांमध्ये करण्यात आला होता. त्यावेळी ते दोन तरुण शिवसैनिक असतील तर मला त्यांंचा अभिमान आहे अशी ठाम भूमिका पुढील परिणामांचा विचार न करता बाळासाहेबांनी घेतली होती.
 
मात्र उद्धवपंत तेवढे ठाम राहू शकतील काय? ज्या कथित निधर्मीक भावनेने राजकारण करणार्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत बाळासाहेबांनी आयुष्यभर उभा दावा मांडला होता, त्याच दोन पक्षांसोबत आघाडी करून उद्धवपंतांनी सत्ता काबीज केली आहे. राममंदिर उभारणीत उद्धवपंतांनी अपेक्षेपेक्षा जास्त रस घेतला तर ते शरद पवार आणि सोनिया गांधींना आवडेल काय आणि न आवडल्यास ते उद्धवपंतांच्या खुर्चीखाली फटाके लावणारच नाही असे कशावरून? याची जाणीव उद्धवपंतांनाही आहे. त्यामुळे निमंत्रण आले तरी ते कितपत जातील याबाबत सर्वच साशंक आहेत. सध्या राज्यातील कोरोनाची हाताबाहेर जाणारी परिस्थिती हे सांगायला चांगलेसे कारण आहेच. अर्थात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कितीही विरोध केला तरी उद्धवपंतांनी यावेळीही सहकुटुंब सहपरिवार अयोध्येत मंदिर उभारणीच्या शुभारंभाला निश्चित जावे अशी महाराष्ट्रातील अनेक रामभक्तांची मनोमन इच्छा राहील. ज्या रामललाच्या दर्शनासाठी विधानसभा निवडणूकीपूर्वी उद्धवपंत जाऊन आले, त्या दर्शनाचा उचित लाभ देत प्रभू रामचंद्राने त्यांच्या झोळीत मुख्यमंत्रीपद टाकलेच ना! मग यावेळीही प्रभू रामचंद्र त्यांच्या मदतीला धावून येतील. हा हजारो रामभक्तांचा विश्वास आहे.
 
काल मंदिर उभारणीचा शुभारंभ कधी होणार हे जाहीर होताच राजकारण व्हायला आधी नमूद केल्याप्रमाणे सुरुवात तर झालेली आहेच. अजूनही हे राजकारण चालणारच. 5 ऑगस्टला शुभारंभ झाल्यानंतरही नंतरचे अनेक दिवस नव्हे तर अनेक वर्ष हे कथित बुद्धीवंत या मुद्यावर राजकारण करत राहतील हे निश्चित. मात्र जगभरातील करोडो रामभक्त या शुभारंभाच्या बातमीने निश्चित सुखावले आहेत. राममंदिराला विरोध करणार्या या सर्व कथित बुद्धीवंतांना ते अजाण बालक आहेत असे समजून क्षमा करा अशीच विनवणी हे रामभक्त प्रभू रामचंद्राच्या चरणी करतील याबद्दल कोणाच्याही मनात शंका राहणार नाही.
 
तुम्हाला पटतंय का हे? त्यासाठी आधी तुम्ही तर समजून घ्या राजे हो.....
ता.क. : घ्या समजून राजे हो या लेखमालिकेतील अविनाश पाठक यांचे लेख वाचण्यासाठी त्यांच्या www.facebook.com/BloggerAvinashPathak या फेसबुक पेजवर जाऊन वाचता येतील. 
- अविनाश पाठक 
मो.9096050581