शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 18 जुलै 2020 (22:05 IST)

राम मंदिर उभारण्यासाठीची तयारी पूर्ण

राम मंदिर उभारण्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे भूमिपूजनानंतर मंदिराच्या बांधकामाला सुरूवात होईल. येत्या ३ ऑगस्ट किंवा ५ ऑगस्ट भूमिपूजनाची संभाव्य तारीख असू शकते. पण याबाबत पंतप्रधान कार्यालय अंतिम निर्णय घेईल. राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होण्याचीही शक्यता आहे. असं झालं तर २०१४ साली पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर मोदी पहिल्यांदाच अयोध्येत जातील.
 
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची बैठक संपल्यानंतर महासचिव चंपत राय यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रस्तावित राम मंदिर मॉडेल १२८ फूट उंच आहे, पण ही उंची आता १६१ फूट उंच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गर्भगृहाजवळ ५ घुमट बनवण्यात येतील, असंही चंपत राय म्हणाले.
 
मंदिर निर्माणासाठी मातीची ताकद किती आहे, याचे रिपोर्ट येणं बाकी आहे. यानंतर पाया किती ठेवायचा, याबाबतचा निर्णय घेतला जाईल. ६० मीटर खालून मातीचे सॅम्पल घेतले जातील. या कामासाठी एल ऍण्ड टी कंपनीची निवड केली असल्याचं चंपत राय यांनी सांगितलं. राम मंदिराचं बांधकाम ज्या दिवशीपासून सुरू होईल, तेव्हापासून मंदिर पूर्ण व्हायला जवळपास साडेतीन वर्षाचा कालावधी लागेल.