बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. डॉ.आंबेडकर
Written By
Last Updated : मंगळवार, 6 डिसेंबर 2022 (11:47 IST)

महापरिनिर्वाण दिन : जेव्हा अत्रे म्हणाले, 'या महान नेत्याच्या मृत्यूने मृत्यूचीच कीव वाटतीये'

Author,नामदेव काटकर
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर 5 डिसेंबर 1956 च्या रात्री झोपले आणि त्याच झोपेत मध्यरात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 6 डिसेंबरची सकाळ बाबासाहेबांच्या निधनाची वार्ता घेऊनच उजाडली.
 
 शोषित-वंचितांच्या हक्कांसाठी उभं आयुष्य खर्ची घालणाऱ्या बाबासाहेबांच्या निधनानं संपूर्ण देश हळहळला. बाबासाहेबांच्या निधनाच्या वार्ता देशासह जगभर वाऱ्यासारखी पसरली आणि सर्वत्र एकच हंबरडा फुटला.
 
 दिल्लीतल्या ‘26,अलिपूर रोड’या निवासस्थानी बाबासाहेबांचं निधन झालं. तिथून त्यांचं पार्थिव नागपूर मार्गे मुंबईत आणलं गेलं.
 
 बाबासाहेबांचं पार्थिव मुंबईत आल्यानंतर प्रचंड गर्दी जमली. अंत्ययात्रेला ‘न भूतो न भविष्यति’संख्येत लोक आले. अनुयायांच्या हुंदक्यांच्या टाहोनं मुंबापुरीचा आसमंत व्यापला गेला.
 
‘26,अलिपूर रोड’ते ‘चैत्यभूमी’अशी बाबाबासाहेबांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यादरम्यान कोणत्या विशेष घटना घडल्या, कुणी-कुणी अंत्यदर्शनसाठी उपस्थिती लावली आणि अंत्ययात्रा नेमकी कशी होती, याबाबत विस्तृतपणे आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
 
 तत्पूर्वी, आपण बाबासाहेबांचं निधन झाल्याचं कळताच, दिल्लीत काय घडामोडी घडल्या आणि पार्थिव मुंबईत नेण्याचं कधी ठरलं, हे जाणून घेऊ.
 
 बाबासाहेबांचं निधन झाल्याचं कळलं आणि...
6 डिसेंबर 1956 च्या सकाळी नेहमीप्रमाणे सविता (माईसाहेब) आंबेडकर बाबासाहेबांना उठवायला गेल्या. सकाळच्या सात-साडेसात वाजले होते.
 
बाबासाहेबांचा एक पाय उशीवर टेकलेला होता. दोन-तीन वेळा हाक मारून पाहिल्यानंतरही बाबासाहेब उठले नाहीत, म्हणून हाताने हलवून उठवण्याचा प्रयत्न केला आणि बाबासाहेबांचं झोपेतच निधन झाल्याचं त्यांना कळलं.
 
दुसऱ्या क्षणाला माईसाहेबांनी हंबरडा फोडला आणि त्याच थरथरत्या आवाजात माईसाहेबांनी सुदामाला हाक मारली. सुदामा माईसाहेब आणि बाबासाहेबांच्या मदतीसाठी ’26, अलिपूर रोड’ निवासस्थानी राहत असत.
 
सुदामा धावतच बाबासाहेबांच्या खोलीत आले. त्यानंतर माईसाहेबांनी तातडीनं डॉ. मालवणकरांना फोन लावला. हे डॉ. मालवणकर बाबासाहेबांचे स्नेही आणि डॉक्टर होते. त्यांनी कोरामाईन इंजेक्शन देण्याचा सल्ला दिला. मात्र, बाबासाहेबांचा मृत्यू होऊन अनेक तास उलटून गेले होते. त्यामुळे इंजेक्शन देणं शक्य झालं नाही.
 
त्यानंतर माईसाहेबांनी सुदामा यांना गाडी घेऊन नानकचंद रट्टूंना बोलावण्यासाठी पाठवलं. नानकचंद रट्टू हे बाबासाहेबांचे जवळपास 17 वर्षांपासूनचे सहकारी होते. दिल्लीत बाबासाहेबांना हवं-नको ते सर्वकाही नानकचंद रट्टू पाहत. ते आदल्या रात्रीच म्हणजे 5 डिसेंबरला बाबासाहेबांनी सांगितलेली पत्र टाईप करून घरी परतले होते.
 
सुदामा गाडी घेऊन नानकचं रट्टूंना आणण्यासाठी गेले आणि तातडे घेऊन आले. रट्टू आल्यानंतर तेही ओक्साबोक्सी रडू लागले. काही वेळानं माईसाहेब आणि नानाकचंद रट्टूंनी बाबासाहेबांच्या निधनाची वार्ता प्रसारित करण्याचा निर्णय घेतला.
 
त्यानुसार नानकचंद रट्टूंनी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (PTI), यूएनआय, आकाशवाणी केंद्र आणि सरकारी खात्यांना फोन करून बाबासाहेबांच्या निधनाची वार्ता कळवली.
 
वणव्यासारखी ही वार्ता सर्वदूर पसरली आणि हजारो अनुयायी ’26, अलिपूर रोड’ या दिल्लीस्थित निवासस्थानाकडे येऊ लागले.
 
दिल्ली विमानतळापर्यंत पार्थिव आणताना अंत्ययात्रेचं रूप
नानकचंद रट्टूंनी सरकारी खात्यांना बाबासाहेबांच्या निधनाची वार्ता कळवली होती. त्यामुळे नेहरूंच्या मंत्रिमंडळातील मंत्री, खासदारही ‘26, अलिपूर रोड’ निवासस्थानी आले. माईसाहेबांनी बाबासाहेबांचं पार्थिव सुदामा आणि नानकचंद रट्टूंच्या मदतीने हॉलमध्ये ठेवला होता.
 
स्वत: पंडित जवाहरलाल नेहरूही अंत्यदर्शनासाठी आले. माईसाहेब त्यांच्या ‘डॉ. आंबेडकरांच्या सहवासात’ या आत्मचरित्रात लिहितात की, ‘नेहरूंनी माझे सांत्वन केले. साहेबांच्या वयाबद्दल, प्रकृतीबद्दल, आजारपणाबद्दल, कधी व कसे निधन झाले वगैरेची अत्यंत आस्थेने चौकशी केली. मी त्यांना सविस्तर माहिती दिली.’
 
त्यानंतर केंद्रीय मंत्री बाबू जगजीवनराम अंत्यदर्शनासाठी आले. ते बाबासाहेबांना मानत असत. त्यांनी अंत्यसंस्कार कुठे करणार याबाबत विचारणा केली. त्यावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्याचे माईसाहेबांनी सांगितल्यावर पार्थिव नेण्यासाठी निम्म्या किमतीत विमान उपलब्ध करून देण्याची व्यवस्था जगजीवनराम यांनी केली.
 
6 डिसेंबरला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 26, अलिपूर रोड निवासस्थानीच बाबासाहेबांचं पार्थिव अंत्यदर्शनसाठी ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर एका सजवलेल्या ट्रकवर पार्थिव ठेवून सफदरजंग विमानतळाच्या दिशेनं नेण्यात आलं. बाबासाहेबांच्या पार्थिवाशेजारी माईसाहेब आंबेडकर, भदंत आनंद कौसल्यायन, सोहनलाल शास्त्री, नानकचंद रट्टू इत्यादी लोक पार्थिवाशेजारी होते.
 
दिल्लीतल्या सफदरजंग विमानतळावरून रात्री 10.30 वाजता विमान सुटणार होते. संसद भवनापर्यंत पार्थिव ठेवलेल्या ट्रकमागे हजारोंच्या संख्येत लोक चालत होते. दिल्लीतल्या निवासस्थानापासून सफदरजंग हा जवळपास अर्धा ते पाऊणतासाचा रस्ता गाठण्यासाठी रात्रीचे दहा वाजले. विमानताच्या आवारातही मोठ्या संख्येत अनुयायी जमा झाले होते.
 
पार्थिव घेऊन विमान दिल्लीतून मुंबईत
बाबासाहेबांचं पार्थिव घेऊन विमान दिल्लीहून मुंबईच्या दिशेनं रात्री साडेदहा वाजता निघालं. माईसाहेब, नानकचंद रट्टू, आनंद कौसल्यायन यांच्यासह एकूण दहा-एक जण विमानात होते. हे विमान नागपुरात थांबवण्यात आलं. तिथे बाबासाहेबांना वंदन करण्यात आलं आणि विमान मुंबईच्या दिशेनं उडालं.
 
विमान रात्री 1 वाजून 55 मिनिटांनी (7 डिसेंबर 1956) मुंबईतील सांताक्रूझ विमानतळावर उतरलं.
 
बाबासाहेबांचं पार्थिव मुंबईत आणलं जाणार आहे, हे कळल्यावर राज्यासह देशभरातून लोकांचे थवेच्या थवे मुंबईत आले होते. आपला मायबाप गेल्याची भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आणि बोलण्यात होती.
 
सांताक्रूझ विमानतळावरून रात्री 2.25 वाजता रुग्णावाहिकेत पार्थिव ठेवून, रुग्णवाहिका राजगृहाच्या दिशेनं निघाली. सांताक्रूझ ते दादर या रस्त्यादरम्यान मध्यरात्रीच्या वेळीही रस्त्याच्या दुतर्फा लोक फुलं घेऊन उभी होती आणि रुग्णवाहिका जवळ येताच तिच्यावर फुलं टाकून ढसाढसा रडत होती, असं चांगदेव खैरमोडे बाबासाहेबांवरील चरित्रात सांगतात.
 
रात्रीचा वेळ असूनही राजगृहावर रुग्णवाहिका पोहोचायला दोन तासांचा अवधी गेला. पहाटे 4.35 वाजता राजगृहावर बाबासाहेबांचं पार्थिव घेऊन रुग्णवाहिका राजगृहावर पोहोचली, तेव्हा राजगृहाला लोकांनी वेढा घातला होता. हजारोंच्या संख्येत लोक जमा झाले होते.
 
मृतदेह कुठे ठेवावा, यावर चर्चा सुरू झाली, तेव्हा भाऊराव गायकवाड आणि शंकरानंद शास्त्रींनी सांगितलं की, राजगृहाच्या पोर्चमध्येच पार्थिव ठेवावं, जेणेकरून लोकांना नीट दर्शन घेता येईल. मग आधी राजगृहात पार्थिव नेण्यात आलं आणि नंतर बाहेर पोर्चमध्ये ठेवण्यात आलं.
 
माईसाहेब तिथं आल्या, तेव्हा त्या रडत होत्या. चांगदेव खैरमोडे लिहितात की, ‘माईसाहेबांना रडताना पाहून लोक तुच्छतेने टोचून बोलत होते. ते मी स्वत: ऐकले.’
 
दोन रांगा पुरुषांसाठी आणि दोन रांगा स्त्रियांसाठी करून, दर्शन घेण्यास सांगितलं गेलं. नप्पू रोडवरील रांगा राजगृहापासून दक्षिणेला फाळके रोडपर्यंत, तर खारेघाट रोडच्या रांगा किंग जॉर्ज (आताचं राजा शिवाजी) स्कूलच्या बाजूने सरकत होत्या. अर्धा मिनिट उभं राहून अनुयायांना पुढे सरकवावं लागत होतं.
 
सकाळी साडेआठच्या सुमारास मुंबईचे तत्कालीन महापौर मिरजकर आणि कम्युनिस्ट नेते डॉ. रा. बा. मोरे हे हार घेऊन अंत्यदर्शनासाठी आले. ‘बाबासाहेब, दलितांचे राज्या स्थापण्याच्या आधीच निघून गेलात,’ असं तेव्हा मिरजकर म्हणाल्याची नोंद खैरमोडे करून ठेवतात.
 
त्यानंतर 7 डिसेंबरलाच दुपारी एक वाजता बाबासाहेबांचं पार्थिव सजवलेल्या ट्रकवर उंच आसनावर ठेवण्यात आलं. दिल्लीहून ज्या सुटात बाबासाहेबांना आणण्यात आलं होतं, तेच सुट अंत्ययात्रेदरम्यानही होतं. सव्वा एक वाजता राजगृहातून पार्थिव हलवण्यात आलं आणि अंत्यात्रेला सुरुवात झाली.
 
मुंबई थांबली होती...
बाबासाहेबांच्या निधनामुळे मुंबईतील जवळपास दोन लाख कामगारांनी जवळपास बंदच पाळला होता. 25 कापड गिरण्या पूर्णपणे बंद, तर 5 गिरण्या अंशत: चालू होत्या. परळ, माटुंग्यातील रेल्वे वर्कशॉप संपूर्णत: बंद ठेवण्यात आले होते.
 
बाबासाहेबांच्या अंत्यदर्शनासाठी बॉम्बे पोर्ट ट्रस्ट (बीपीटी) च्या गोदीतील सुमारे 25 हजार कामगार आले होते.
 
भारत सरकारनं 10 खास अधिकारी अंत्यदर्शनसाठी पाठवले होते, तसंच सांत्वनासाठी पाठवले होते. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि हंगामी राज्यपाल छगला यांनीही शोकप्रदर्शन करणारे संदेश पाठवले होते.
 
मुंबई हायकोर्टातील हंगामी प्रमुख न्यायमूर्ती एन. एच. सी. कोयाजी आणि औद्योगिक न्यायालयात प्रेसिडंट एम. आर. मेहेर आंबेडकरांना श्रद्धांजली अर्पण केली.
 
चौपाटीवर जनसागर
बाबासाहेबांच्या अंत्ययात्रा राजगृहावरून खोदादाद सर्कल, परळ ट्राम नाका, एल्फिन्स्टन ब्रिज, गोखले रोड, रानडे रोड अशा मार्गाने शिवाजी पार्कजवळील चौपाटीवर पोहोचली. लाखोंच्या संख्येत लोक अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. मुंबईनं एवढी मोठी अंत्ययात्रा क्वचित पाहिली होती.
 
मिरवणुकीदरम्यान अंत्ययात्रा सयानी रोड आणि गोखले रोडच्या नाक्यावर आली, तेव्हा मागासवर्ग खात्याचे मंत्री ग. दे. तपासे, बांधकाम मंत्री नाईक-निंबाळकर, उपमंत्री भ. दा. देशमुख, मुंबई सरकारचे मुख्य चिटणीस एम. डी. भन्साळी हेही सहभागी झाले. तसंच, मंधू दंवडते, हॅरीस, आर. डी. भंडारे. बा. चं. कांबळे इत्यादी मंडळीही अंत्ययात्रेत सहभागी झाली.
 
चौपाटीवर व्यासपीठ बनवण्यात आलं होतं. तिथं बाबासाहेबांचं पार्थिव ठेवण्यात आलं. पार्थिवाच्या बाजूला माईसाहेब आंबेडकर, पुत्र यशवंतराव आंबेडकर आणि पुतणे मुकुंदराव उभे होते.
 
जळत्या मेणबत्त्या घेऊन इथेच बुद्ध भिक्षूंनी भिक्षू आनंद कौसल्यायन यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक विधी पूर्ण केला. हे दृश्य पाहून अंत्यविधीसाठी जमलेल्या जनसागरातून एकच हंबरडा फुटला.   
 
यानंतर आनंद कौसल्यायन यांनी भाऊराव गायकवाडांना भाषण करण्यास सांगितलं. गायकवाडांनी बाबासाहेब मुंबईत 16 डिसेंबरला बौद्ध धर्माची दीक्षा देण्यास येणार होते, या पुनरुच्चार केला. त्यानंतर लाखो अनुयायांनी पार्थिवासमोरच बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.
 
यानंतर कौसल्यायन यांनी आचार्य प्रल्हाद केशव अत्रेंना भाषण करण्यास सांगितलं.
 
‘असा युगपुरुष शतकाशतकांत तरी होणार नाही’
आचार्य अत्रे आपल्या भाषणात म्हणाले, “मराठी पत्रकार आणि लेखकांच्या वतीने भारतातील एका महान विभूतीला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मी उभा आहे. या महान नेत्याच्या मृत्यूने मृत्यूचीच कीव वाटू लागली आहे. मराणानेच आज आपले हसू करून घेतले आहे. मृत्यूला काय दुसरी माणसे दिसली नाहीत? मग त्याने इतिहास निर्माण करणाऱ्या या नरपुंगवावर, एका महान जीवनाच्या या ग्रंथावर, इतिहासाच्या एका पर्वावरच का झडप घातली?
 
“महापुरुषांचे जीवन पाहू नये असे म्हणतात. पण त्यांचे मरण पाहण्याचे भाग्य आपल्याला लाभले. आकाशातील देवांनाही हेवा वाटावा, असे भाग्य त्यांना लाभले. भारताला महापुरुषांची वाम कधी पडली नाही. परंतु असा युगपुरुष शतकाशतकांत तरी होणार नाही.
 
“झंझावाताला मागे सारणारा, महासागराच्या लाटांसारखा त्यांचा अवखळ स्वभाव होता. जन्मभर त्यांनी बंड केले. आंबेडकर म्हणजे बंड. असा बंडखोर, शूरवीर, बहाद्दर पुरुष आज मृत्यूच्या चिरनिद्रेच्या मांडीवर कायमचा विसावा घेत आहे. त्यांचे वर्णन करण्यास शब्द नाहीत.”
 
पु. ल. देशपांडेंनी केलं अंत्यसंस्काराचं धावतं वर्णन
चंदनाच्या चितेवर डॉ. बाबासाहेबांचं शव ठेवण्यात आलं. त्यानंतर शवाला सशस्त्र पोलीस दलाने त्रिस बंदुकीने बार काढून मानवंदना दिली. बिगुलाच्या गंभीर स्वरात त्यांच्या देहाला यशवंतरावांच्या हस्ते संध्याकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी अग्नी दिला.
 
अखिल भारतीय नभोवाणीने या अंत्यसंस्काराचे धावते वर्णन ध्वनिक्षेपित केले. हे धावते वर्णन ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी केले होते. पु. ल. देशपांडे त्यावेळी आकाशवाणीत नोकरीला होते.
 
बाबासाहेबांच्या शवाला अग्नी देताच संपूर्ण परिसरत ओक्साबोक्सी रडू लागला. चितेवर कापूर आणि तूप घालण्यात आलं होतं. त्यामुळे ज्वाला उफाळल्या आणि बाबासाहेबांचा पार्थिव देह कायमचा अनंतात विलीन झाला.
 
बाबासाहेबांचे सहकारी आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते चांगदेव भगवानराव खैरमोडेंनी बाबासाहेबांचे 12 खंडांचे चरित्र लिहिलंय. यातील शेवटच्या म्हणजे 12 व्या खंडात शेवटचं वाक्य वास्तव सांगणारंच होतं. ते वाक्य आहे – ‘सूर्य मावळल्यानंतर काजव्यांचे साम्राज्य सुरू होते, अगदी तशीच स्थिती लागलीच निर्माण झाली.’
Published By -Smita Joshi