मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला होता. हा दिवस दत्ताचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो.
दत्त जन्म
पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपांत आसुरी शक्ती वाढल्या होत्या. देवगणांनी त्या आसुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण अयशस्वी ठरले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळया रूपात दत्त देवतांनी अवतार घेतला. तो दिवस दत्तजयंती म्हणून साजरा केला जातो.
दत्त जयंती साजरा करण्याची पद्धत
दत्तजयंती साजरी करण्याबाबत शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही.
या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. याला गुरुचरित्र सप्ताह असे म्हणतात.
या दिवशी घरी दत्त गरुंची पूजा करुन, आरती करुन प्रसाद वाटप करावा.
दत्ताचे भजन, कीर्तनादी करावे.
दत्त जन्म कथा
दत्तात्रय हा शब्द दत्त व आत्रेय अशा दोन शब्दांनी तयार झाला आहे. दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्म, मुक्त, आत्मा आहोत, अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा ती अत्रेय म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा.
श्री दत्तात्रयाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित असल्या तरी या सगळ्या कथांमधून श्रीदत्त हे अत्रीऋषी व माता अनुसूया यांचे पुत्र व विष्णूंचा अवतार असल्याचा बोध होतो.
अत्री ऋषींनी पुत्र प्राप्तीसाठी ऋक्ष कुलपर्वतावर घोर तपश्चर्या केली. अत्री ऋषींच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले. या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा-विष्णु-महेश हे तिन्ही देव प्रकट झाले आणि त्यांनी ऋषींना तपाचे कारण विचारले. अत्री ऋषींनी त्यांना विनवले की आपण माझ्या उदरी पुत्र रूपाने जन्म घ्यावा. तेव्हा तिन्ही देवांनी त्यांच्या विनंतीला मान दिला. देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे तीन पुत्र अनुसयेच्या उदरी जन्मला आली.
श्री दत्त जन्माची एक कथा ब्राह्मण पुराणात उल्लेखित आहे. अत्री ऋषींनी ब्रह्मा-विष्णु-महेश यांची पुत्रप्राप्तीसाठी आराधना केली असताना त्यांनी एक रूपवती कन्या प्राप्तीची ही इच्छा दर्शवली. देवांच्या आशीर्वादाने दत्रात्रेय, सोम, दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या अत्री ऋषींना प्राप्त झाली.
याचसोबत दत्तात्रेयांच्या जन्माची आणखी एक कथा प्रसिद्ध आहे की राहूने सूर्याला ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी अंध:कारमय झाली. अत्री ऋषींनी सूर्याला राहूच्या मगरमिठीतून सोडवले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान केली. अत्री ऋषींच्या या कामगिरीमुळे शिव व विष्णु यांनी अनुक्रमे दुर्वास आणि दत्त यांच्या रूपाने अत्रीच्या घरी जन्म घेतला.
तीन प्रमुख पंथ
भारतात शैव, वैष्णव आणि शाक्त हे तीन प्रमुख पंथ आहेत. ती सुमारे बाराशे वर्षांपासून श्री दत्तात्रयाची उपासना करत आहेत. महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय व दत्त संप्रदाय ही पाच संप्रदाय श्री दत्तप्रभुची उपासना करताना दिसतात.
श्री दत्त संप्रदायातील साधक 'अवधूतचिंतन श्री गुरूदेव दत्त' असा जयघोष करत असतात. तर अवधूत हे दत्तात्रयाचे नाव असून या शब्दाचा अर्थ असा की नेहमी आनंदात रमणारा. श्री दत्ताच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी व चार श्वान म्हणजे चार वेदांचे प्रतीक आहे. श्री दत्त गुरूंनी चोवीस गुरु केले होते.
दत्त अवतार
'श्रीपाद श्रीवल्लभ' हा दत्ताचा पहिला अवतार. 'श्री नृसिंह सरस्वती' हा दुसरा अवतार तर 'स्वामी समर्थ हा तिसरा अवतार असल्याचे समजतं. जैन पंथीय श्री दत्तगुरूंची 'नेमिनाथ' म्हणून पूजा करतात तर मुसलमान 'फकिर' म्हणून पूजा करतात.