मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. डॉ.आंबेडकर
Written By
Last Modified: रविवार, 7 फेब्रुवारी 2021 (06:17 IST)

श्रद्धा पंढरपूरच्या ‘पांडुरंगा'वर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाई यांची आज (7 फेब्रुवारी) जयंती. त्यानिमित्त ...
रमाचे वडील भिकूजी आणि आई रुख्माबाई यांची नितांत निष्ठा होती, पंढरपूरच्या पांडुरंगावर आणि रुख्माबाईवर. ते वारकरी संप्रदायाचे होते. हेच संस्कार रमावर झाले. भगवान शंकराच्या नवसानं आपल्याला मुलगा झाला म्हणून त्यांनी मुलाचं नाव शंकर ठेवलं होतं. पण भीमरावांना देवदेवता हे देव देवता मान्य नव्हते. गोलमेज परिषद पूर्ण करून ते लंडनहून भारतात आले आणि चळवळीला पुन्हा संजीवन मिळाले. सगळं काही सुरळीत चालू होतं. एका रात्री रमा आपल्या साहेबांना म्हणाली, ‘आमचा बा नेहमी पंढरपूरला जायचा.' 
‘माहीत आहे मला.' 
‘माझ्या मायचं नाव रुखमाई हुतं.' बाबासाहेब बोलले नाहीत.
‘मला भाऊ झाला तो बी भगवान शंकराच नवसानं.' बाबासाहेब हसले. रमाची देवभोळी श्रद्धा  त्यांना आवडली होती. पण देवाचे पंडे, पंडित ठेकेदार आम्हा अस्पृश्यांना दूर का ठेवतात? हा त्यांच्या मनात जळत असलेला प्रश्न होता. प्रश्न म्हटलं की, त्याची उत्तरं असतातच. नाहीतर प्रश्न निर्माण झाले असते कशाला? पण काही प्रश्न असे असतात त्याची उत्तरं असतात पण कुणाला इतरांना सांगायची नसतात. काही सांगायची असतात पण नकळत सांगायची असतात. आणि काही प्रश्न असे असतात त्यांची अजिबात उत्तरं नसतात. रमाला नेमकं काय सांगायचं, हे बाबासाहेबांनी ओळखलं होतं. 
‘रमा, आषाढी यात्रेला पंढरपूरला जाऊ म्हणतेस.
पण तू पुरतं आपल्याला ओळखलंस का?'
‘काय ओळखायचं त्यात?'
‘इथंच नेमकं चुकतेस तू. अगं आपण कोण?' 
‘आलं धेनात. पण संतचोखा कसा मंदिराच्या बाहीर उभा राहिला. दामू महार आपलाच ना? आला ना विठोबा धावून त्याच्या पाठीशी.'
क्षणभर रमा बोलायची थांबली. भीमराव तिच्या भावभावनांचा अदमास चेहर्यातवर घेत राहिले. दुसर्याच क्षणी रमा म्हणाली, ‘हे जग कोणी घडवलं? देवानं. देवानंच माणसाला जन्म दिला. मरणबी तोच देनार.' बाबासाहेब ऐकत होते कौतुकानं. आपली अडाणी रमा एवढी शहाणी कशी झाली?
‘देवानं फक्त माणूस घडवला आणि माणसानं घडवली जात. जी कधीच जात नाही ती जात.'
बाबासाहेब बेडवरून उठून बसले. 
‘रमा'
‘माझं काही चुकलं का साहेब? चुकलं आसंल तर माफ करा.'
‘नाही नाही रमा. तू अशी बोलतेस की मलाही क्षणभर ऐकत राहावंसं वाटतं.'
‘मला असं वाटतं साहेब, देव सर्वश्रेष्ठच. तोच कर्ता करविता. त्याच्याशिवाय आपल्या शरीराचं घड्याळही बंद पडेल.'
‘रमा अगं किती छान बोलतेस तू.'
‘साहेब, एकच हात जोडून विनंती आहे. मला पंढरपूरला न्या.'
‘अगं पण पंढरपूरला आपल्याला प्रवेश नाही.'
‘मग तुम्ही नाशिकच्या काळाराम गोराराम मंदिरासाठी सत्याग्रह का केला?'
बाबासाहेब अबोल.
‘अमरावतीला अंबादेवीच्या दर्शनासाठी तुम्ही एवढा जिवाचा आटापिटा का केला?'
बाबासाहेब बॅरिस्टर होते. पण अडाणी रमाला उत्तर देण्याची त्यांची तयारी नव्हती. त्यामधून  एक सत्य बाहेर पडलं. पुस्तकं माणसाला साक्षर करतात पण शहाणं करीत नाहीत.
बाबासाहेब हसले. शेवटी बाबासाहेबांनी रमाला परवानगी दिली. पण त्यांनी एकच विचारलं, ‘पंढरीच्या पांडुरंगाला काय मागशील तू?'
‘तुमच्यासाठी दीर्घायुष्य.'
‘रमा...'
‘आणि तुमच्या सर्व सामाजिक कार्यात यश येवो, ही प्रार्थना.' बाबासाहेब हसले. म्हणाले, ‘अगं देव सर्वांचा आहे. मग सवर्णांनी देवाची मक्तेदारी घेतली. हे मला पटलं नाही म्हणूनच मी सत्याग्रह केला. अगं मला सांग, देवदेवतांवर विशिष्ट समाजाची मिरासदारी का असावी? रमा, माझा खरा राग इथे आहे. तू मला समजून घे. खरा देव माणसात आहे. त्या माणसाची सेवा करणंच देवाची पूजा करणं होय. म्हणून तू पंढरपूरचा हट्ट सोड.'
‘ठीक आहे. नाही जाणार पंढरपूरला. आता माझं घर, समाज हेच पंढरपूर.' आणि बाबासाहेब प्रसन्न हसले.
बी. के. तळभंडारे