शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 4 जानेवारी 2020 (17:47 IST)

अब्दुल सत्तार हे गद्दार आहेत, मातोश्रीवर येऊ देऊ नका - चंद्रकांत खैरे

अब्दुल सत्तार गद्दार आहेत, असा आरोप शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. "या गद्दाराला मातोश्रीवर येऊ देऊ नका, असं मी उद्धव ठाकरे यांना सांगणार आहे," असं एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.
 
"सत्तारांच्या लोकांचं मतदान औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत मिळालं नाही, त्यांना मंत्रिपदावर राहाण्याचा अधिकार नाही. अब्दुल सत्तार गद्दार आहेत. ते भाजपकडे का गेले. त्यांनी राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडून येऊन दाखवावं. मी उद्धव ठाकरे यांना त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांना हाकलून द्यावं," असंही खैरे यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेत घडलेल्या घडामोडींना अब्दुल सत्तार जबाबदार आहेत असा आरोपही त्यांनी केलाय.
 
औरंगाबाद जिल्हा परिषदेत नेमकं काय घडलं?
औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या मीना शेळके तर उपाध्यक्षपदी भाजपचे लहानू गायकवाड विजयी झाले आहेत.
 
जिल्हा परिषदेत काँग्रेसचा अध्यक्ष नको, अशी भूमिका अब्दुल सत्तार यांनी घेतली होती. पण माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार अंबादास दानवे यांनी मात्र काँग्रेसला मदत करण्याचे मातोश्रीचे आदेश असल्याचं म्हटलं होतं.
 
त्यातच विद्यमान अध्यक्ष अॅड. देवयानी डोणगावकर यांनी बंडखोरी केली. तर महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून मीना शेळके यांनी अर्ज दाखल केला. निवडणुकीत दोन्ही उमेदवरांना सम-समान 30-30 मतं पडली. परिणामी चिठ्ठ्या टाकून शेळके यांना विजयी घोषित करण्यात आलं. या निवडणुकीत अब्दुल सत्तार यांनी बंडखोरी केल्याचा आरोप खैरे यांनी केला आहे.
 
सत्तार यांचा मंत्रिपदाचा राजिनामा?
शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे नाराज आहेत म्हणून त्यांनी राजीनामा दिल्याची बातमी माध्यमांवर सुरू होती. हे वृत्त खरं आहे का? असं विचारलं असता शिवसेना नेते संजय राऊत यांनी असं स्पष्ट केलं, "अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याबद्दल मुख्यमंत्रीच सांगू शकतील."
 
अब्दुल सत्तार यांची भेट झाल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. "जर तुमची काही नाराजी असेल तर ती मी पक्षप्रमुखांच्या म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या कानावर घालतो असं मी त्यांना सांगितलं होतं," असं संजय राऊत यांनी माध्यमांना सांगितलं. अब्दुल सत्तार यांनी 30 डिसेंबर रोजी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
 
निवडणुकांपूर्वी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड मतदारसंघातून लढली आणि ते विधानसभेवर गेले. त्यांना राज्यमंत्रिपद मिळालं. त्यांना कॅबिनेट मंत्रिपद हवं होतं म्हणून ते नाराज आहेत असं काही माध्यमांनी सांगितलं.
 
त्यांची नाराजी नेमकी कोणत्या कारणामुळे आहे हे सांगण्यास संजय संजय राऊत यांनी काही भाष्य केलं नाही. जर ते नाराज असतील तर त्यांची नाराजी मी पक्षप्रमुखांना सांगेन. इतकंच त्यांनी माध्यमांना सांगितलं.
 
शिवसेना नेते अनिल परब यांच्याकडे हा राजीनामा दिला अशी बातमी होती. हे वृत्त अनिल परब यांनी फेटाळून लावलं आहे. अब्दुल सत्तार यांचा राजीनामा माझ्याकडे आला नाही किंवा कुणाकडे आला असेल असं मला वाटत नाही, असं शिवसेना नेते अनिल परब यांनी सांगितलं. शिवसेनेचे सर्व आमदार कट्टर शिवसैनिक आहेत ते कधीही फुटणार नाहीत, असं अनिल परब यांनी एबीपी माझाला सांगितलं.
 
अब्दुल सत्तार यांच्याशी बीबीसी मराठीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. "अब्दुल सत्तार सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात असलेल्या बैठकीत आहेत," असं त्यांच्या खासगी सचिवांनी बीबीसीला सांगितलं.
 
अब्दुल सत्तार यांच्या कथित नाराजी नाट्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले असे अनेक 'राजीनामास्त्र' आता तुम्हाला पाहायला मिळतील अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली. शिवसेना नेते फुटतील अशी दिवास्वप्न काही लोक पाहत आहेत त्यांच्या पदरी निराशाच येईल असं राऊत म्हणाले. सरकार बनलं पण मलाईदार खात्यांसाठी सध्या भांडण होत आहे. या सरकारच्या पतनाची सुरुवात सरकार बनण्याआधीच सुरू झाली आहे असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
 
पदापेक्षा काम महत्त्वाचं: बच्चू कडू
अब्दुल सत्तार यांच्या कथित राजीनाम्याविषयी बच्चू कडू यांना विचारण्यात आलं. त्यावेळी ते म्हणाले की "सत्तार यांनी राजीनामा दिला की नाही हे अद्याप स्पष्ट नाही. पण पदापेक्षा काम महत्त्वाचं आहे. काम कसं करता येईल याकडेअब्दुल सत्तार लक्ष द्यावे असा सल्ला राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अब्दुल सत्तार यांना दिला, तीन पक्षाचे सरकार असल्याने सत्तार यांनी घाई करू नये पदापेक्षा आपल्याला कामं कोणती आहेत हे सुद्धा पाहिलं पाहिजे असा सल्ला राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सत्तार यांना दिला.