सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019 (15:46 IST)

अॅमेझॉन जंगल आग: 'आपलं घर जळत आहे,' फ्रान्स राष्ट्राध्यक्ष इम्यॅनुएल मॅक्रॉन यांनी जी-7 चर्चेपूर्वी केले सावध

ब्राझीलच्या अॅमेझॉनच्या जंगलात भीषण वणव्यामुळे लाखो झाडं नष्ट झाली आहेत. ही या दशकातील सर्वांत भीषण आग असल्याचं म्हटलं जात आहे.
 
या आगीमुळे आंततराष्ट्रीय स्तरावरचं राजकारण प्रभावित झालं आहे. या आगीवर फ्रान्सने चिंता व्यक्त केली आहे तर ब्राझीलने फ्रान्सला प्रत्यत्तर दिलं आहे.
 
ब्राझीलच्या अॅमेझॉन जंगलातील वणवा हे 'आंतरराष्ट्रीय संकट' असून जी-7 परिषदेत हा मुद्दा महत्वाचा असायला हवा असं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅनुएल मॅक्रॉन यांनी म्हटलंय.
 
"आपलं घर जळतंय" असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय.
 
ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेर बोल्सोनारो यांनी मात्र यावर प्रतिक्रिया देताना म्हटलंय की मॅक्रॉन हा मुद्दा राजकीय फायद्यासाठी वापरत आहेत.
 
ब्राझील सहभागी होत नसलेल्या जी-7 परिषदेत या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी म्हणजे 'वसाहतवादी मानसिकतेचे' उदाहरण आहे असं बोल्सोनारो म्हणालेत.
 
नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्पेस रिसर्च या संस्थेनं प्रसिद्ध केलेल्या उपग्रहाच्या आकडेवारीनुसार ब्राझीलमध्ये आगींच्या घटनांमध्ये तब्बल 85 टक्के वाढ झाली असून त्यामध्ये अॅमेझॉनमध्ये लागलेल्या आगींचा वाटा अधिक आहे.
 
पर्यावरणवाद्यांनी अॅमेझॉनच्या आगीसाठी बोल्सोनारो सरकारला जबाबदार धरले असून बोल्सोनारो यांनी लाकूड व्यावसायिक आणि शेतकऱ्यांना जंगल साफ करण्यासाठी प्रोत्साहित केल्याचा आरोप केला आहे.
 
बोल्सोनारो यांचा दावा आहे की ही आग एनजीओंनी लावली आहे, मात्र आपल्याकडे याबाबत पुरावा नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आग लावण्यात शेतकऱ्यांचाही सहभाग असू शकतो असं त्यांनी मान्य केल्याचं वृत्त रॉयटर्स न्यूज एजन्सीने दिले आहे.
 
नेत्यांचं काय म्हणणं आहे?
इम्यॅनुएल मॅक्रॉन हे या आठवड्याच्या अखेरीस होणाऱ्या जी-7 परिषदेचे यजमान असून त्यांनी इशारा दिला आहे की अॅमेझॉनच्या जंगलांची सध्याची अवस्था हा आंतरराष्ट्रीय पातळीवर काळजीचा मुद्दा आहे.
 
"अॅमेझॉन पर्जन्यवने - पृथ्वीला लागणाऱ्या ऑक्सिजनपैकी 20 टक्के ऑक्सिजन पुरवणारी फुफुस्सं - आगीच्या विळख्यात आहेत." असं ट्वीट करून त्यांनी त्यांनी पुढं म्हटलंय, "जी-7 परिषदेच्या सदस्यांनो, प्राधान्यानं यावर चर्चा करुयात."
 
बोल्सोनारो यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलंय की फ्रेंच राष्ट्राध्यक्ष वैयक्तिक राजकीय फायद्यासाठी ब्राझीलमधील अंतर्गत मुद्द्याचा वापर करून घेत आहेत.
 
त्यांनी म्हटलंय की आपण आगीबाबत चर्चेसाठी तयार आहोत पण ही चर्चा वस्तुनिष्ठ आकडेवारी आणि परस्परांबद्दल आदर करणारी असावी. जी-7 मध्ये यावर चर्चा करण्यास त्यांचा तीव्र विरोध आहे.
 
"अॅमेझॉनचा मुद्दा ज्या भागाशी संबंधित आहे तेथील देश सहभागी नसताना, जी-7 परिषदेत अॅमेझॉनचा चर्चेला घ्यावा हा फ्रेंच राष्ट्राध्यक्षांचा सल्ला म्हणजे वसाहतवादी मानसिकतेचा निदर्शक आहे. 21 व्या शतकात ही मानसिकता चालणार नाही." असं बोल्सोनारो यांनी सोशल मीडियावर म्हटलंय.
 
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अंटोनिया गुटेरेस यांनीही म्हटलंय की अॅमेझॉनमधील आग हा त्यांच्यासाठी अत्यंत काळजीचा विषय आहे.
 
" जागतिक हवामान संकटात असताना ऑक्सिजन आणि जैवविविधतेच्या महत्त्वाच्या स्रोताला धक्का पोहचणे आपल्याला परवडणारे नाही. अॅमेझॉनची संरक्षण केलेच पाहिजे." असं ट्वीट त्यांनी केलं आहे.
 
साओ पावलोहून डॅनियल गल्लास यांचे विश्लेषण
अॅमेझॉनबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यक्त होणारी चिंता ब्राझीलचे राष्ट्राध्यक्षांनी झटकून टाकणे यामध्ये तसं नवीन काहीच नाही.
 
बोल्सोनारो यांच्यापूर्वीही इतर राष्ट्राध्यक्षांनी आंतरराष्ट्रीय एनजीओ आणि युरोपियन नेत्यांच्या मध्यस्थीला धुडकावून लावले आहे.
 
पण बोल्सोनारो यांनी अॅमेझॉनच्या वणव्याला एनजीओ जबाबदार असल्याचा आरोप करत आणखी एक वरची पातळी गाठली आहे.
 
त्यांच्या वक्तव्यानं आंतरराष्ट्रीय समुदायाला जरे धक्का बसला असला तरी ब्राझीलमध्ये त्यांच्या समर्थकांना ते जे बोलतायेत त्यावर 100 टक्के विश्वास आहे.
 
पण या वक्तव्याला छेद देणारा आणि या वादावर प्रभाव पाडू शकणारा एक महत्त्वाचा आवाज आहे ब्राझीलमधील शेतकऱ्यांचा.
 
कोणालाही असे वाटू शकते की अॅमेझॉनमध्ये शेतीसाठी अधिकाधिक जमीन उपलब्ध होण्यासाठी त्यांचा पाठिंबा असेल. पण काही शेतकरी नेत्यांचं म्हणणं आहे की बोल्सोनारो यांनी हे प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्राझीलची प्रतिमा खराब होऊन सोयाबिन आणि बीफच्या निर्यातीवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
 
काही शेतकऱ्यांनी सरकारकडे मागणी केली आहे की सरकारने आपल्या भूमिकेत बदल करावा. हे असे आवाज आहेत ज्यांना बोल्सोनारो टाळू शकत नाहीत.
 
बोल्सोनारो यांनी आग कशी हाताळली आहे?
बोल्सोनारो यांनी म्हटलं की या आगीचा मुकाबला करण्यासाची संपूर्ण क्षमता ब्राझीलकडे नाही, "अॅमेझॉनचे जंगल युरोपपेक्षाही मोठे आहे. एवढ्या मोठ्या भागातील प्रचंड आगीचा मुकाबला कसा करणार?" असा प्रश्न त्यांनी गुरुवारी पत्रकारांना केला. "आमच्याकडे त्यासाठी लागणारी संसाधनं नाहीत", असं ते म्हणाले.
 
सरकार एनजीओंच्या निधीत कपात करत असल्यानं बदला म्हणून त्यांनीच ही आग लावलेली असावी असंही बोल्सोनारोंनी सुचवलंय. "याबाबत सर्वांत मोठा संशय एनजीओंवर आहे." असं ते म्हणालेत.
 
याबाबत काही पुरावा आहे का विचारल्यावर ते म्हणाले, "मी त्यांच्यावर थेट आरोप कुठे केलाय? मी फक्त त्यांच्यावर संशय घेत आहे."
 
वाढत्या आगीबाबत समोर आलेली आकडेवारीही ते धुडकावून लावतात. या हंगामात शेतकरी पुढच्या लागवडीसाठी जमीन मोकळी करण्यासाठी आपल्या जमिनीत आग लावतात असं त्यांचं म्हणणं आहे. अर्थात INPE या संस्थेनं बोल्सोनारो यांचा हा दावा फेटाळून लावला आहे.
 
बोल्सोनारो यांच्यावर टीका का होत आहे?
पर्यावरणवादी बोल्सोनारो यांच्या सरकारच्या धोरणांवर या प्रकरणावरून तीव्र टीका करत आहेत. पर्यावरण संवर्धनापेक्षा विकासाला महत्त्व देत असल्याची टीका त्यांच्यावर होता आहे.
 
बोल्सोनारो यांनी कारभार हातात घेतल्यानंतर अमेझॉन उद्ध्वस्त होण्याची प्रक्रिया वेगानं होत असल्याचं पर्यावरणवाद्यांचं म्हणणं आहे.
 
अमेझॉनच्या आगींबद्दल समोर आलेल्या सॅटेलाईट डेटाने पर्यावरणवाद्यांच्या संतापात आणखी भर घातली आहे.
 
आकडेवारीनुसार ब्राझीलमध्ये यावर्षी 75000 आगीच्या घटना घडल्या आहेत तर 2018 मध्ये हा आकडा 40000 होता.