शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019 (10:37 IST)

राज ठाकरेंच्या पाठीशी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस का उभी राहत आहे?

श्रीकांत बंगाळे
राज ठाकरे सरकारच्या विरोधात बोलत आहेत, म्हणून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य असो की, मनसेनं जाहीर केलेल्या 22 ऑगस्टच्या आंदोलनाला राष्ट्रवादीनं दिलेला पाठिंबा असो, राष्ट्रवादी काँग्रेस राज ठाकरेंच्या पाठीशी उभं राहताना दिसत आहे.
 
येणारी विधानसभा निवडणूक लक्षात घेतल्यास राष्ट्रवादीच्या या भूमिकेचा काही राजकीय अर्थ आहे का? या प्रश्नाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
 
शहरी भागात जनाधार मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस राज ठाकरेंच्या पाठीशी उभं राहत आहे, असं मत ज्येष्ठ पत्रकार आशिष जाधव व्यक्त करतात.
 
ते सांगतात, "राष्ट्रवादीचा काँग्रेसचा जनाधार ग्रामीण भागात आहे. पक्षाची शिवस्वराज्य यात्राही ग्रामीण भागातून सुरू आहे. या पक्षाला शहरी भागात जनाधार नाही. पुणे, मुंबई, नाशिक या शहरांमध्ये जनाधार हवा असेल, तर तसा चेहरा या पक्षाकडे नाही. त्यामुळे राज ठाकरेंना पाठिंबा देऊन हा पक्ष त्यांच्या लोकप्रियतेचा वापर शहरी भागात पक्षवाढीसाठी करत आहे."
 
हाच मुद्दे पुढे नेत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे सांगतात, "राष्ट्रवादीला भाजप-सेनाविरोधात एक आघाडी उभी करायची आहे आणि राज ठाकरे यांच्या सहभागाशिवाय ही आघाडी सक्षम होणार नाही. कारण भाजपला शहरी जनतेचा पाठिंबा आहे, तर राष्ट्रवादीला ग्रामीण जनतेचा. एकीकडे भाजपचा ग्रामीण जनाधार वाढत आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा कमी होत आहे. राज ठाकरे यांना शहरी-निमशहरी भागात पाठिंबा आहे. त्यामुळे ते सोबत आल्यास हा वर्ग पाठीशी येईल, अशी राष्ट्रवादीला आशा आहे."
 
'मोदीविरोध प्रमुख मुद्दा'
राष्ट्रवादी काँग्रेस राज ठाकरे यांच्या पाठीशी आहे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध करण्यासाठी त्यांना नवा चेहरा आहे, ज्याला स्वीकारार्हता आहे, असं मत राजकीय विश्लेषक मृणालिनी नानिवडेकर व्यक्त करतात.
 
त्यांच्या मते, "राष्ट्रवादी काँग्रेसनं राज ठाकरे यांना दिलेला पाठिंबा म्हणजे भाजपविरोधी भूमिकेला पाठिंबा असा त्याचा अर्थ होतो. राज ठाकरे यांना आलेली ईडीची नोटीस याचं राजकारण होणार हे नक्कीच आहे. शिवाय राज यांना असलेल्या टीआरपीचा विरोधी पक्ष फायदा उचलणार हेही तितकंच खरं आहे. त्यामुळे या अशा परिस्थितीत राज यांच्या पाठीशी उभं राहून राष्ट्रवादी लोकांपर्यंत पोहोचत आहेत."
 
'राष्ट्रवादीलाच मनसेसाठी प्रयत्न करावे लागणार'
काँग्रेसमधील नेत्यांचा मनसेला आघाडीत घेण्यास विरोध आहे, अशी चर्चा आहे, यावर ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे सांगतात, "काँग्रेसमधील मोठा प्रवाह असा आहे, ज्याला राज ठाकरे सोबत हवे आहेत. काहींचा विरोध असेल, पण बहुतेकांना ते सोबतच हवेत."
 
"राज ठाकरे यांच्या उत्तर भारतीयांविरोधाच्या भूमिकेमुळे त्यांना आघाडीत घ्या, असं काँग्रेसचे नेते उघडपणे बोलू शकत नाहीत. त्यामुळे मग त्यांना आघाडीत घ्यायचं असल्यास राष्ट्रवादी काँग्रेसलाच प्रयत्न करावे लागणार आहेत," असं चोरमारे सांगतात.
आशिष जाधव यांच्या मते, "राष्ट्रवादीनं येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडे 144 जागांची मागणी केली आहे. राष्ट्रवादी स्वत:च्या कोट्यातून शहरी भागातल्या जवळपास 40 जागा मनसेला द्यायची शक्यता आहे, तशी चर्चा सध्या सुरू आहे."
 
'प्रभावी नेत्याची गरज'
राज ठाकरे यांच्याइतका थेट बोलणारा, वारे फिरवण्याची क्षमता असणारा कोणताच नेता राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याकडे नाहीये. त्यामुळे मग भाजप-सेनेला ताकदीनं सामोरं जाण्यासाठी राष्ट्रवादी राज ठाकरेंना पाठिंबा देत आहेत, चोरमारे सांगतात.
तर जाधव यांच्या मते, "ईडीच्या चौकशीमुळे राज ठाकरे केवळ नकारात्मक चर्चेत आले नाहीत, तर उलट यामुळे त्यांचं राजकीय पुनर्वसन होण्याची चिन्हं आहेत."
 
"येत्या विधानसभा निवडणुकीत या दोघांना एकत्र यायचं आहे. मनसेशिवाय राष्ट्रवादीला आघाडीमध्ये काँग्रेस, जनता दल, शेतकरी कामगार पक्ष हवे आहेत. यात राष्ट्रवादीला मनसेमध्ये विशेष रस असण्याचं करण्याचं म्हणजे मनसेचा मुंबई, नाशिक, पुणे या शहरांमध्ये प्रभाव आहे. आघाडीमध्ये मनसे आल्यास या शहरांमध्ये आघाडीचं संख्याबळ वाढू शकतं," आसबे सांगतात.