मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 8 फेब्रुवारी 2021 (19:20 IST)

अमित शाह : 'मी कधी बंद खोलीत आश्वासनं देत नाही, जे करतो ते खुलेपणानं'

आम्ही वचनावर अटल राहणारे लोक आहोत. आमच्यावर खोटं बोलल्याचा आरोप केला गेला, असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेनेकडून केल्या जाणाऱ्या 'भाजपनं शब्द फिरवला' या आरोपाला उत्तर दिलं.
 
मी काहीही एका खोलीत करत नाही. जे काही करतो ते जाहीरपणे करतो, असं अमित शाह यांनी म्हटलं.
 
अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी केलेल्या चर्चेत मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन दिलं होतं, असा दावा विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेकडून केला जात होता. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दरवाजाआड चर्चा झाली होती, असंही सांगण्यात येत होतं. शिवसेनेच्या याच दाव्यावर अमित शाह यांनी टोला लगावला.
 
भाजप खासदार नारायण राणे यांनी कोकणात खासगी वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटल बांधलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज (7 फेब्रुवारी) या हॉस्पिटलचं उद्घाटन केलं.
 
यावेळी बोलताना अमित शाह यांनी म्हटलं की, नारायण राणेंनी भविष्याची चिंता न करता अन्यायाशी सामना केला. पण आम्ही त्यांच्यावर अन्याय करणार नाही. नारायण राणेंसारख्या नेत्याचा सन्मान कसा करायचा हे आम्हाला समजतं.
'मी पक्षाध्यक्ष असताना राज्यात निवडणूक झाली. जनादेश देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपला मिळाला होता, पण सत्तेच्या मोहापायी ऑटो रिक्षासारखं तीन पायांचं सरकार आलं. पण या रिक्षाची तीन चाकं वेगवेगळ्या दिशेने चालतात,' असा टोलाही अमित शाह यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला.
 
राम मंदिरासाठी तुम्ही भूमिका का घेत नाही? असा प्रश्न अमित शाह यांनी शिवसेनेला विचारला. बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर तुम्ही राजकारणासाठी तत्वांशी तडजोड केली, असंही अमित शाह यांनी म्हटलं.
 
कोकणच्या भूमीला ऐतिहासिक महत्त्व आहे, शिवाजी महाराजांनी इथे आरमाराची स्थापना केली, असं म्हणत अमित शाह यांनी या महाविद्यालयाच्या वाचनालयात देशाचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास, स्वातंत्र्याचा इतिहास संबंधित पुस्तकही उपलब्ध करून द्यावी, असंही त्यांनी म्हटलं.
 
या कार्यक्रमाला अमित शाह यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे उपस्थित होते.
 
अमित शाह यांच्या दौऱ्याविषयी माहिती देताना नारायण राणे 6 फेब्रुवारीला घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं, या महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी सर्व सुख-सुविधा देण्यात आलेली आहे. या अत्याधुनिक मेडीकल कॉलेजचं उद्घाटन अमित शाह यांच्या हस्ते होईल.
 
ते पुढे म्हणाले, "उद्धव ठाकरे सरकार चालवत आहेत, असं कुठेच दिसत नाही. ते मातोश्रीतून बाहेर पडत नाहीत, राज्याची आर्थिक, औद्योगिक स्थिती दयनीय आहे. प्रगत महाराष्ट्र मागे चाललं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात येत आहेत, त्यांच्या पायगुणाने महाविकास आघाडी सरकार जावं आणि भाजपचं कर्तबगार सरकार यावं, ही माझी इच्छा आहे."