मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 8 फेब्रुवारी 2021 (18:55 IST)

उत्तराखंड हिमस्खलन : 18 मृतदेह बाहेर काढण्यात यश, 200 जण बेपत्ता

उत्तराखंडच्या आपात्कालीन विभागाच्या माहितीनुसार, चमौलीमध्ये हिमस्खलनानंतर आलेल्या पुरातून आत्तापर्यंत 25 लोकांना जिवंत वाचवण्यात यश आलं आहे.
 
तर, आत्तापर्यंत 18 मृतदेह हाती लागल्याची माहिती, उत्तराखंड SDRF च्या प्रमुख DIG रिदम अग्रवाल यांनी बीबीसीशी बोलताना दिली.
 
हिमस्खलनानंतर ऋषीगंगा पावर प्रकल्पाचा बांध फुटला.
 
आपात्कालीन विभागाच्या माहितीनुसार या दुर्घटनेत एकून 154 लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे. हे सर्व पावर प्लांटमध्ये काम करणारे कर्मचारी असल्याचं सांगितलं जात आहे.
 
रविवारी सकाळपासून बचावकार्याला सुरूवात करण्यात आली. ITBP, लष्कर आणि स्थानिक प्रशासनाचे कर्मचारी बचावकार्यात उतरले आहेत.
 
आपात्कालीन सेवेचे अधिकारी बीबीसीशी बोलताना म्हणतात, "तपोवनच्या टनेलमध्ये 30-35 कर्मचारी अजूनही अडकल्याची भीती आहे. यासाठी बचावकार्य सुरू झालंय. या टनेलमधून गाळ काढण्याचं काम सुरू आहे. राज्य सरकारचा आपात्कालीन विभाग आणि आयटीबीपीचे जवान बचावकार्य करत आहेत."
 
सोमवारी रात्री टनेलमध्ये पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने काम काहीवेळ थांबवण्यात आलं होतं.
 
ट्विटवर माहिती देताना उत्तराखंडचे पोलीस महासंचालक अशोक कुमार म्हणतात, "दुसऱ्या टनेलमध्ये पाणी पातळी अचानक वाढल्याने बचावकार्य काही काळाकरिता थांबवण्यात आलं होतं. पण, बचावकार्य पुन्हा सुरू करण्यात आलं आहे."
 
उत्तराखंडच्या चमौली जिल्ह्यात रविवार हिमस्खलन झाल्याने ऋषीगंगा पावर प्रकल्पाचं मोठं नुकसान झालं. धौलीगंगा आणि अलखनंदा नद्यांना पूर आल्याने पाणी पातळीत अचानक वाढ झाली.
 
पाण्याची पातळी वाढल्याने तपोवनपासून हरिद्वारपर्यंत हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. नदीकाठच्या गावातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हटवण्यात आलं होतं.
 
उत्तराखंड SDRF च्या प्रमुख DIG रिदम अग्रवाल यांनी बीबीसीशी बोलताना म्हणाल्या, "बचाव पथक टनेलच्या तोंडापर्यंत पोहोचलं आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार टनेलमध्ये काही कर्मचारी अडकले आहेत. आम्हाला विश्वास आहे की काही तासातच आम्हाला कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचण्यात यश मिळेल."