मंगळवार, 15 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 9 फेब्रुवारी 2022 (13:15 IST)

अण्णा हजारे : किराणा दुकानातील वाईन विक्रीविरोधात आमरण उपोषणाचा इशारा

वाईन शॉपप्रमाणेच, सुपरमार्केट आणि किराणा दुकानातही वाईन विक्रीची परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने गेल्या आठवड्यात घेतला होता. या निर्णयाबाबत विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत असताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही याप्रकरणात उडी घेतली आहे.
 
किराणा दुकानात वाईन विक्री करण्याचा निर्णय मागे घेतला नाही तर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा अण्णा हजारेंनी राज्य सरकारला दिला आहे.
 
येत्या 14 फेब्रुवारीपासून या निर्णयाविरुद्ध आपण उपोषणास बसणार आहोत, असं स्मरणपत्र अण्णा हजारे यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवून दिलं.
या पत्रात अण्णा हजारे म्हणतात, "केवळ राज्याचा महसूल आणि वाईन उत्पादक आणि विक्रेते यांचे हित पाहून हा निर्णय घेतल्याचं दिसून येतं. पण या निर्णयामुळे लहान मुले व्यसनाधीन होऊ शकतात. महिलांनाही त्याचा त्रास होऊ शकतो, या गोष्टींचा विचार सरकारने केलेला नाही, याची खंत वाटते.
युवा शक्ती ही आपली राष्ट्रशक्ती आहे. ती बरबाद करू पाहणाऱ्या या निर्णयाला विरोध करण्याशिवाय पर्याय नाही. वाईन ही दारू नाही, असा युक्तिवाद सरकारकडून करण्यात येत आहे, हेसुद्धा आश्चर्यकारक आहे, असं अण्णा पत्रात म्हणाले.
 
यापूर्वी आपणास या विषयावर दोन पत्रे पाठवली आहेत. तसंच लोकायुक्त मसुदा समितीच्या बैठकाही टाळण्यात येत आहेत. त्याबाबतही पत्र पाठवलेलं आहे. आपणाकडून एकाही पत्राचं उत्तर देण्यात आलेलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्या एकाही पत्राला कधीच उत्तर देत नाहीत. पण आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडूनही तसंच घडताना दिसत आहे.
 
पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री यांना मी कधीही वैयक्तिक विषयावर पत्र लिहिलेलं नाही. व्यापक हिताच्या सामाजिक प्रश्नांवरच मी पत्र लिहित असतो. तरीही त्याचं उत्तर देणं टाळलं जात असेल तर सरकारला जनतेच्या हिताशी काही देणं-घेणं आहे की नाही, असा प्रश्न उभा राहतो, असंही अण्णा हजारे यांनी म्हटलं.